Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

कोलकाता नाइट रायडर्सच्या कर्णधारपदासाठी गांगुलीसह तीन जण स्पर्धेत
कोलकाता, २५ मार्च / पीटीआय

 

दक्षिण आफ्रिकेत १८ एप्रिलपासून होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रात कोलकाता नाइट रायडर्स संघाने सौरव गांगुलीला कायमस्वरुपी कर्णधारपद देण्यात येणार नसल्याचे आज स्पष्ट केले आहे. या निर्णयाने गांगुलीला मोठा धक्का बसला असून कायमस्वरूपी कर्णधारपदावरून त्याला पायउतार व्हावे लागणार आहे. बुकॅनन गांगुली याच्या फिटनेसवर चांगलेच नाराज होते. त्यामुळे त्यांनी गांगुली बरोबरच वेस्य इंडिजचा ख्रिस गेल, न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्कुलम, ऑस्ट्रेलियाचा ब्रॅड हॉज यांना विभागून देण्याचे ठरविले आहे. या निर्णयामुळे भारतीय क्रीडा रसिक खास करून गांगुलीचे चाहते नाराज होण्याची शक्यता आहे. या निर्णयाुमळे मी गांगुलीला कर्णधारपदापासून दूर करीत आहे असे म्हणणे अयोग्य ठरेल, असे बुकॅनन यांनी सांगितले . ते पुढे म्हणाले की, काल या विषयावर मी गांगुलीशी चर्चा केली आणि संघासाठी एकच कर्णधार नसावा या निर्णयावर आम्ही येऊन पोहचलो. त्यामुळे आमच्या संघात कायमस्वरूपी कर्णधार नसेल. एकापेक्षा जास्त कर्णधार नेमणे ही नवीन संकल्पना असून त्याला कीतपत यश मिळेल हे पहावे लागेल.
संघात चांगले नेतृत्वगुण असलेले ख्रिस गेल, ब्रेंडन मॅक्कुलम,ब्रॅड हॉज आणि सौरव गांगुली असल्याने त्या सर्वाना संधी देण्याचे मी ठरविले आहे. त्याचबरोबर बंगालचा कर्णधार लक्ष्मी़रतन शुक्लासुद्धा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या सर्वाची विचारसरणी निरनिरळी असल्याने या सर्वाना कप्तानी करण्याची संधी देण्याचे मी ठरविले असून त्यामागे गांगुलीला वगळण्याचा कोणताही उद्देश नसल्याचे बुकॅनन यांनी सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की, माझ्या आणि गांगुलीम़ध्ये कोणतेही वाद नाहीत. हा वादंग येथील प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेला आहे. या निर्णयाने नाराज झालेला गांगुली म्हणाला की, बुकॅनन हे संघाचे प्रशिक्षक असून त्यांची विचारसरणी वेगळी आहे. माझे लक्ष्य हे संघासाठी जास्तीत धावा करून विकेट्स घेणे हे असेल. गांगुलीने त्यांचे म्हणणे संपविण्यापूर्वी बुकॅनन म्हणाले की, सौरव हा कोलकाताचा राजा आहे. प्रसारमाध्यमे जर या निर्णयाला वेगळे वळण देत असतील तर त्यांनी त्यांना जे योग्य वाटते ते करावे, आमच्यावर याचा काहीही परीणाम होणार नाही.