Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

डॅनियल व्हेटोरीवर जबाबदारीचे ओझे
नेपियर, २५ मार्च / पीटीआय

 

कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून जबाबदारी पार पाडताना न्यूझीलंडचा कर्णधार डॅनियल व्हेटोरीची चांगलीच दमछाक होत आहे. भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत पराभूत होण्यापासून संघाला वाचविण्याचे मोठे आव्हान व्हेटोरीवर आहे. व्हेटोरी म्हणतो की, शारीरिकदृष्टय़ा मी फिट आहे. मानसिकदृष्टय़ा मात्र फिट राहणे कधीही सोपे नसते. एकाचवेळी कर्णधार व अष्टपैलू खेळाडू म्हणून जबाबदारी पार पाडणे हे मोठे आव्हान असते. ही जबाबदारी आनंदाने पार पाडता येत असली तरी त्यात विश्रांतीची संधी हवी. न्यूझीलंडने एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत पराभव स्वीकारल्यानंतर पहिली कसोटीही गमाविली. त्यामुळे व्हेटोरीकडून क्रिकेटचाहत्यांच्या अपेक्षा प्रचंड उंचावल्या आहेत. किवी संघाने आपली कामगिरी सुधारावी अशी स्वाभाविक अपेक्षा क्रिकेटचाहते व्यक्त करीत आहेत.
व्हेटोरी त्यासंदर्भात म्हणतो की, जसा आम्हाला निकाल हवा आहे, तसाच त्यांनाही अनुकूल निकाल हवा आहे.
न्यूझीलंड संघाने दडपणाखाली न राहता संघर्ष करावा आणि विजय मिळवावा, अशी त्यांची माफक इच्छा आहे. हॅमिल्टनमध्ये आम्ही जो प्रयत्न केला, तो पुरेसा नव्हता.
व्हेटोरी म्हणतो की, उरलेल्या कसोटी सामन्यांमध्ये आम्हाला आमची कामगिरी प्रचंड उंचवावी लागणार आहे. आम्हाला खेळपट्टीवर तळ ठोकावा लागेल. सुमारे १२० षटके फलंदाजी करणारे फलंदाज आम्हाला हवे आहेत. कारण आमच्या फलंदाजांनी जर ही कामगिरी केली नाही तर आमच्या गोलंदाजांना विश्रांतीची संधीच मिळणार नाही.
आमच्याकडे दर्जेदार फलंदाजांची फळी आहे. केवळ आम्हाला अधिक काळ खेळपट्टीवर जम बसवावा लागेल. त्यासाठी पहिल्या सहा फलंदाजांवर सारी मदार असेल.
व्हेटोरीने सांगितले की, भारतीय खेळाडूंनी आपल्या योजना, आपले डावपेच अगदी अचूकपणे राबविले. त्यामुळे त्यांना या मालिकेत वरचष्मा मिळविता आला. आलेल्या प्रत्येक संधीचा त्यांनी अचूक लाभ उठविला. आम्हाला त्यांची चाल त्यांच्यावर उलटवून टाकायला हवी. व्हेटोरीची मदार ऑफ स्पिनर जितन पटेलवर आहे.
कायले मिल्सऐवजी खेळणाऱ्या जितन पटेलकडे आमचे लक्ष आहे. त्याने गेल्या सामन्यात पाच विकेट्स घेतल्या त्याची पुनरावृत्ती त्याने यावेळीही करावी अशी आमची अपेक्षा आहे.