Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट चाहत्यांना सुवर्णसंधी - स्मिथ
जोहान्सबर्ग, २५ मार्च/पीटीआय

 

आयपीएल क्रिकेट स्पर्धेद्वारे येथील चाहत्यांना विविध देशांमधील खेळाडूंचे अव्वल दर्जाचे कौशल्य पाहण्याची संधी मिळणार आहे, असे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ याने आज येथे सांगितले.गतवर्षी विजेतेपद मिळविणाऱ्या राजस्तान रॉयल्स संघाकडून स्मिथ खेळला होता. आयपीएल स्पर्धेत मी गतवर्षी सहभागी झालो होतो,एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या संघामधील खेळाडू या स्पर्धेत एकत्र खेळतात त्यावेळी त्यांच्यात समन्वय असतो. एकदिलाने ते खांद्याला खांदा लावून खेळतात. त्यांच्या शैलीचा, खेळाचा आनंद भारतामधील प्रेक्षकांनी अतिशय उत्साहाने लुटला. माझ्यासाठी हा अनुभव खूपच संस्मरणीय होता, असे सांगून स्मिथ म्हणाला, जेव्हा मी या स्पर्धेनंतर आफ्रिकेत परतल्यावर येथेही प्रेक्षक या स्पर्धेविषयी चर्चा करताना आढळले. या स्पर्धेविषयी येथील प्रेक्षकांना खूपच उत्सुकता वाटत आहे. या स्पर्धेद्वारे भारतीय संस्कृतीचा प्रसार होण्यास मदत होणार आहे व आमच्या प्रेक्षकांनाही त्याचा अनोखा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.
या स्पर्धेद्वारे आमच्या देशात क्रिकेटचा प्रसार होण्यासाठी चालना मिळणार आहे. आमच्या देशात अप्रतिम निसर्गसौंदर्य आहे. आमच्या देशातील विविध प्रांतांमध्ये पर्यटनास या स्पर्धेद्वारे चालना मिळणार आहे व त्यांना स्वत:ची आर्थिक स्थिती भक्कम करण्याची संधी मिळेल असेही स्मिथने सांगितले.
गतवर्षी या स्पर्धेत स्मिथने फलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. यंदाही तो राजस्तान रॉयल्स संघाकडून खेळणार असून मायदेशात त्याचे स्थान महत्वाचे राहील.
गतवर्षी एक खेळाडू म्हणून मी आमचा कर्णधार शेन वॉर्नच्या आज्ञेप्रमाणे खेळलो होतो. यंदा माझ्यावर थोडेसे दडपण असणार आहे कारण मी माझ्या चाहत्यांसमोर खेळणार आहे. यंदा माझ्यावर कर्णधारपदाची जबाबदारी येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ही जबाबदारी आल्यास मी निश्चितपणे आत्मविश्वासाने पार पाडीन असेही स्मिथने सांगितले.
या स्पर्धेत नवोदित परंतू चमकदार खेळाडू जे पी दुमिनी याला मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळणार आहे. तो म्हणाला, भारतासारख्या क्रिकेट पंढरीत खेळण्याची संधी मिळाल्यामुळे मला विशेष आनंद झाला होता. मात्र आता ही स्पर्धा भारतात होणार नसल्याने मी निराश झालो आहे. ही स्पर्धा होणार आहे यातच मला समाधान आहे.