Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

आयपीएलला उशीर झाल्याने पीटरसन-फ्लिन्टॉफला फटका
लंडन, २५ मार्च/पी.टी.आय.

 

इंडियन प्रीमियर लिगमधील सर्वात महागडे खेळाडू म्हणून बोलबाला झालेल्या इंग्लंडच्या केव्हिन पीटरसन आणि फ्लिन्टॉफ यांना आयपीएल स्पर्धा आठ दिवस उशिरा सुरू होणार असल्याने मोठा फटका बसणार आहे. स्पर्धा आठवडाभर उशिरा सुरू होणार असल्याने हे दोघेही या स्पर्धेत केवळ १४ दिवसच खेळू शकणार आहेत आणि त्यामुळेच त्यांना दीड लाख पौंडाचा (२१९५११ अमेरिकन डॉलर्स) फटका बसणार आहे. या वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या या स्पर्धेसाठी पीटरसन बंगलोर रॉयल चॅलेंजर्सचे नेतृत्व करणार आहे तर अँड्रय़ू फ्लिन्टॉफ चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करणार असून खेळाडूंच्या लिलावात १.५५ दशलक्ष डॉलर्समध्ये त्यांची खरेदी करण्यात आली होती.
भारत सरकारकडून आयपीएलसाठी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यास असमर्थता व्यक्त झाल्याने कालच ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. यजमानपदाच्या शर्यतीत इंग्लंडचादेखील समावेश होता; पण या काळात इंग्लंडचे हवामान बेभरवशाचे असते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या गळ्यात यजमानपदाची माळ पडली. मात्र ही स्पर्धा १० एप्रिलऐवजी १८ पासून सुरू होत असल्याने ही इंग्लिश जोडी तीनऐवजी दोन आठवडेच या स्पर्धेत खेळू शकेल. त्यामुळेच दोन आठवडय़ांसाठी त्यांना साडेचार लाख पौंडसऐवजी तीन लाख पौंडस् मिळणार आहेत.
आय.पी.एल. स्पर्धेत दोन आठवडे खेळल्यानंतर पीटरसन आणि फ्लिन्टॉफ हे मायदेशात परतणार असून नंतर इंग्लंड संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळणार आहे. आय.पी.एल.च्या उशिरा सुरू होण्यामुळे पीटरसन-फ्लिन्टॉफला त्याचा आर्थिक फटका बसणार असल्याने त्याची झळ हॅम्पशायर व लँकेशायर कौंटीलाही सोसावी लागेल. कारण त्यांच्या कौंटीच्या करारानुसार या खेळाडूंना मिळणाऱ्या एकूण मानधनातील १० टक्के रक्कम या कौंटींना मिळणार आहे. ही स्पर्धा भारतातच खेळविण्यात आली असती तर आपल्याला ते अधिक आवडले असते असे फ्लिन्टॉफ याने म्हटले आहे.
ही इंडियन प्रीमियर लिग असून भारतात तेथील खेळपट्टय़ांवर आणि भारतीय चाहत्यांसमोर खेळण्याचा आनंद वेगळाच असतो. आता ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होणार असली तरी भारतात खेळण्याची सर त्याला येणार नाही, असे फ्लिन्टॉफने म्हटले आहे.