Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

आशियाई पॉवरलिफ्टिंगसाठी संदीप आवारीला हवी मदत
मुंबई, २५ मार्च/ खास प्रतिनिधी

 

जमशेदपूर येथे नुकत्याच झालेल्या नॅशनल फेडरेशन कप पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदकासह ‘स्ट्राँगमन ऑफ इंडिया’ हा किताब मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या संदीप आवारी याची उदयपूर येथे मे २००९ मध्ये होणाऱ्या ‘आशियाई पॉवरलिफ्टींग’ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
ठाणे येथे सामान्य परिस्थितीत वाढलेल्या संदीपने सलग तीनवेळा राष्ट्रीय विजेतपद पटकावले असून राज्य व राष्ट्रीय पातळीवर आज त्याचा दबदबा निर्माण झाला आहे. छत्तीसगड येथे गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रीय सिनियर अजिंक्यपद स्पर्धेत संदीपने महाराष्ट्राला तब्बल चार सुवर्णपदके पटकावून दिली होती. गेल्यावर्षी स्ट्राँग मॅन ऑफ इंडियाच्या शर्यतीत उपविजेतेपद मिळविणाऱ्या संदीपने यंदा जमशेदपूर येथील राष्ट्रीय स्पर्धेत ‘स्ट्राँग मॅन ऑफ इंडिया’चा किताब पटकावला. हा किताब मिळविताना संदीपने स्कॉट प्रकारत ३३० किलो, बेंच प्रकारात १८० किलो तर डेडलिफ्ट प्रकारात ३२० किलो वजन उचलले. २००२ पासून पॉवरलिफ्टिंगमधील कारकीर्दीला प्रारंभ केल्यापासून त्याने आजतागायत मागे वळून पाहिलेले नाही. जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर सातत्याने ठसा उमटवताना ७५ सुवर्ण पदके पटकावली आहेत. २००२ ते २००८ या काळात सातत्याने जिल्हास्तरावर अजिंक्यवीर ठरलेल्या संदीपने सलग पाच वर्ष राज्य विजेतेपद आणि गेली तीन वर्षे सलग राष्ट्रीय विजेतेपद मिळवले आहे. दोन वर्षांपूर्वी कॉमनवेल्थ स्पर्धेतील विजेत्याने ७४५ किलो वजन उचलले होते. त्यावेळी आर्थिक परिस्थितीअभावी तेथे जाऊ न शकलेल्या संदीपने राष्ट्रीय पातळीवर ८०० किलो वजन उचलले होते. आता संदीपची मे मध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी ८२.५ किलो वजनी गटासाठी निवड झाली असून स्पर्धेत विजयी होण्याचा विश्वास व्यक्त करताना आंतराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचविण्याचे आपले स्वप्न असल्याचे संदीपने सांगितले. आपल्या वाटचालीत ‘आयपीएफ’चे सचिव सुब्रतो दत्ता व दिपाली कुलकर्णी यांची मोलाची मदत झाल्याचे तो आवर्जून सांगतो. या स्पर्धेच्या तयारीसाठी संदीपला आर्थिक मदतीची गरज असून दानशूर लोकांनी ९९३०४६०८०८ येथे संपर्क साधावा.