Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९

पालिकेच्या घडय़ाळाचा काटा बंद
ठाणे/प्रतिनिधी

कासारवडवली पोलीस ठाण्याच्या अनधिकृत बांधकामावर २४ तासात बुलडोजर फिरविण्याची नोटीस देऊन ठाणे महापालिका प्रशासनाने पोलीस आयुक्तांना जशास तसे उत्तर देण्याचे धाडस दाखविले. प्रत्यक्षात मात्र पालिकेच्या घडय़ाळाचे काटे बंद पडले म्हणून की काय, सात दिवस उलटूनही अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली नाही. उलटपक्षी ध्वनिप्रदूषणाचा गुन्हा पालिकेच्या ठेकेदारावर दाखल करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आली. नागरिकांच्या मागणीवरून घोडबंदर रोडवर बांधण्यात आलेल्या कासारवडवली पोलीस ठाण्याचे बांधकाम पूर्णपणे अनधिकृत आहे. या बांधकामाला आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी तीन महिन्यासाठी तात्पुरती परवानगी देऊन अभय दिलेले आहे. या परवानगीला वर्ष उलटून गेले आहे.

ठाण्यात चैत्र नवरात्रोत्सव कला महोत्सव
ठाणे/प्रतिनिधी

श्री आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २७ मार्चपासून सुरू होणाऱ्या चैत्र वासंतिक नवरात्रोत्सवात नवकुण्डात्मक सहस्रचण्डी महायज्ञ, कलाभक्ती महोत्सव आणि २६ नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यात हुतात्म्यांना श्रद्धांजली देणाऱ्या याद करो कुर्बानीह्ण या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष राजन विचारे यांनी दिली. आनंद दिघे यांच्या प्रेरणेने २० वषार्ंपूर्वी ठाण्यातील शिवाजी मैदानात पहिला मोठा यज्ञ संपन्न झाला होता. ती परंपरा सुरू ठेवत चैत्र नवरात्रोत्सवाला नवनवीन आयाम निर्माण करण्यात आले आहे.

‘सारांश सावरकर’ ग्रंथ म्हणजे उमलत्या पिढीचा मार्गदर्शक - राम शेवाळकर
डोंबिवली/प्रतिनिधी -
सावरकर विचार स्मृतिशेष होत असताना नीरज देव यांनी ‘सारांश सावरकर’ या ग्रंथातून उमलत्या पिढीला सावरकर विचार, त्यांचे सतेजत्व पटवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे, असे गौरवोद्गार अखिल भारतीय कीर्तन कुलाचे अध्यक्ष डॉ. राम शेवाळकर यांनी रविवारी येथे केले. ‘सारांश सावरकर’ या ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले . ‘स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळ मुंबई आणि महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखा’ यांच्या पुढाकाराने हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे.

‘युज अ‍ॅन्ड थ्रो’ संस्कृतीला पायबंद घालण्यासाठी ‘मेड इन चायना’ची निर्मिती
डोंबिवली/प्रतिनिधी

चीनमधील सेझमधून उत्पादित होणारा माल हा ‘युज अ‍ॅन्ड थ्रो’ पद्धतीचा आहे. मग आपल्याकडेही ‘सेझ’ निर्माण करून तीच परिस्थिती निर्माण करायची आहे का? सेझ निर्माण करा, पण ते पडिक जमिनीवर कोकणातील सपाट सुपिक जमिनीवर मुंबईपासून हाकेच्या अंतरावरच ते उभारले पाहिजेत आणि त्यासाठी आग्रह का? अजून आपण विजेच्या भारनियमनाचा प्रश्न सोडवू शकलो नाही, सेझमधे काम करणारा कुशल कामगार तयार करू शकलो नाही. दूरदृष्टी न ठेवता फक्त धनदांडग्यांचे हित साधण्यासाठी हे प्रकल्प आकाराला येणार असतील तर त्याचा विचार आजच्या तरुण पिढीने करण्याची गरज आहे आणि आजची तरुण पिढी कृतिशील असल्याने ती याचा गांभीर्याने विचार करीत आहे, अशी मते ‘मेड इन चायना’ या चित्रपटातील कलावंतांनी येथे व्यक्त केली.

नवोदित कवींची काव्यवाचन स्पर्धा शहापुरात रंगली!
शहापूर/वार्ताहर :
शहापूरच्या जाणीव प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या काव्यवाचन स्पर्धेत उदयोन्मुख नवोदित कवींनी एकाहून एक सरस अशा रचना सादर करून आपल्या प्रतिभेचे दर्शन घडविले. शहापूर पंचायत समितीच्या शेतकी भवनात ‘जाणीव प्रतिष्ठान’ने उदयोन्मुख कवींसाठी काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन केले होते. या काव्यमैफिलीसाठी कवी किरण येले, कवी संदेश ढगे, कवी भाऊ विशे यांची उपस्थिती उदयोन्मुख कवींसाठी व श्रोत्यांसाठी वसंतातील फुटणाऱ्या पालवीप्रमाणे ठरली.

सी. रामचंद्र यांच्या गाण्यांची सुरेल मैफल
ठाणे/प्रतिनिधी :
येथील कला माध्यम संस्थेच्या वतीने अलिकडेच सहयोग मंदिर सभागृहात सी. रामचंद्र यांच्या सदाबहार गाण्यांचा ‘शोला जो भडके’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
‘अलबेला’ चित्रपटातील धीरे से आजा अखियन मे निंदीया या अजरामर लोरीने मैफलीस सुरुवात झाली. संपदा गोस्वामी यांनी हे गाणे सादर केले. कैसे आऊ जमुना के तीर, मेरे मनका बावरा पंछी, ये जिंदगी उसीकी है, राधा ना बोले ना बोले, अपलम चपलम, गोरे गोरे वो बाके छोरे अशी एकाहून एक सरस गाणी त्यांनी सादर केली. त्यानंतर अनन्या भौमिक यांनी इना मिना डिका, मेरे पिया गये रंगून, तू छुपी है कहा, शाम ढले खिडकी तले, देख हमे आवाज ना देना, भोली सुरत दिल के खोटे अशी सदाबहार युगुल गीते अनन्या भौमिक आणि नीलेश निरगुडकर यांनी सादर केली. अजित प्रधान यांनी अभ्यासपूर्ण निवेदनाने या मैफलीत अनोखे रंग भरले. सुभाष मालेगांवकर यांनी कार्यक्रमाचे संगीत संयोजन केले. किशोर ताम्हाणे (गिटार), दिगंबर ढोलक (तबला), भजनासिंग (ऑक्टोपॅड), उमाकांत परब (साइड ऱ्हिदम) यांनी उत्तम साथसंगत केली. कला माध्यमने असेच संगीतमय कार्यक्रम सादर करावेत, असे आवाहन रसिकांनी अध्यक्ष रमेश पाटील यांना केले. ‘ये मेरे ़वतन के लोगों’ या अजरामर देशभक्तीपर गीताने या मैफलीची सांगता झाली.

रशियन चीअर्स गर्ल्सचे नृत्य; आयोजकांविरुद्ध गुन्हा
भिवंडी/वार्ताहर :
क्रिकेटजगतात आयपीएलचे भूत नाचत असतानाच तालुक्यातील अंजुर-दिवे गावात आर. सी. पाटील फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत तोकडय़ा कपडय़ातील रशियन चीअर्स गर्ल्स नाचविल्याने पोलिसांनीच फाऊंडेशनच्या अध्यक्षांसह संचालकांवर गुन्हे दाखल केले असून त्यांना अद्याप अटक न केल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अलीकडेच काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या आर. सी. पाटील यांच्या नावाने अंजुर-दिवे ग्रामपंचायत हद्दीत गेल्या सात वर्षांंपासून आर. सी. पाटील फाऊंडेशनच्या वतीने क्रिकेट सामने भरविले जात आहेत. २३ मार्च रोजी स्पर्धेचा अंतिम सामना आयोजित केला होता. या दरम्यान तोकडय़ा कपडय़ातील रशियन चीअर्स गर्ल्स नाचविण्यात आल्या. त्याबाबतची परवानगी आर. सी. पाटील फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नव्हती. या विरोधात नारपोली पोलिसांनी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण पाटील तसेच संचालक महादेव घरत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुढीपाडव्याला भिवंडीत स्वागतयात्रा
भिवंडी/वार्ताहर :
गुढीपाडव्याला मराठी नववर्षांचे स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी भिवंडी शहरामध्ये टिळक चौक मित्रमंडळाच्या वतीने नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येते. या वर्षी देखील सालाबादप्रमाणे ब्राह्मण आळी, गणपती मंदिर येथून सकाळी ६.३० वा. स्वागतयात्रेला सुरुवात होणार आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरून स्वागतयात्रा काढण्यात येणार असून या यात्रेचा समारोप निळकंठेश्वर मंदिर येथे होणार आहे. या स्वागतयात्रेत शहरातील सर्वधर्मीय, सर्व समाजातील लोकांनी तसेच शालेय विद्यार्थीवर्गाने लेझीम पथकासह तसेच त्यांच्या पालकांनी पारंपरिक वेष परिधान करून स्वागतयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन टिळक चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष रामदास पाटील यांनी केले. त्याचप्रमाणे पद्मश्री अण्णासाहेब जाधव हायस्कूल व रोटरी क्लब, भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने धामणकर नाका येथून देखील नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. पद्मश्री अण्णासाहेब जाधव हायस्कूल येथील विद्यार्थी हे फार मोठय़ा प्रमाणात स्वागतयात्रा काढण्यात येत असते. विद्यार्थी वर्गात राष्ट्रीय एकता, सामाजिक बंधुभाव याची जाणीव विद्यार्थीवर्गाला करून सदर स्वागतयात्रेचे आयोजन केले जाते, अशी माहिती पद्मश्री अण्णासाहेब जाधव शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर गोसावी यांनी दिली.

क्रिएटिव्ह कार्यशाळा
प्रतिनिधी :
उन्हाळा सुट्टीत इयत्ता सहावी ते आठवीच्या मुलांसाठी मुक्तांगणने डोंबिवलीत ‘क्रिएटिव्ह कार्यशाळेचे’ आयोजन केले आहे. ही कार्यशाळा २० ते २३ एप्रिल असे एकूण चार दिवस पूर्ण वेळ आहे. या क्रिएटिव्ह कार्यशाळेत निवडक मुलांनाच प्रवेश आहे. या कार्यशाळेत आपल्या मनातील भाव-भावनांचा शोध कसा घ्यावा? त्या व्यक्त करण्यासाठी विविध माध्यमांचा प्रभावीपणे वापर कसा करावा, याचे तंत्र मुलांना खेळातून उलगडणार आहे. मुले खेळता-खेळता त्या-त्या माध्यमाची अंतर्गत शक्तीही शोधणार आहेत. विचार करण्याच्या विविध पद्धतींची ओळख करून घेऊन आपल्या मनातले वेगळे विचार, विविध माध्यमातून कसे मांडावेत, याचा प्रत्यक्ष अनुभवच मुले घेतील. सादरीकरणासाठी पपेटस्, नाटक, चित्रकला व लेखन या चार माध्यमांचा विचार केला आहे. ‘कार्यशाळेत मुलांवर कुठलीही सक्ती न करता, मुलांनी मोकळ्या वातावरणात स्वत:ची व्यक्त होण्याची पद्धत स्वत:च शोधावी यासाठी त्यांना मदत करणे’ हे कार्यशाळेचे सूत्र आहे. या कार्यशाळेची संकल्पना राजीव तांबे यांची असून यासाठी त्यांना सचिन गावकर व नीता प्रभू मदत करणार आहेत. प्रवेशासाठी मुक्तांगणच्या तिलोत्तमा थिटे यांच्याशी संपर्क साधावा. संपर्कासाठी दूरध्वनी- ९९६९२७६५३४.