Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
व्यक्तिवेध

मुंबई पोलीस दलात सुरेश पेंडसे आणि विनायक वाकटकर या जोडगोळीला जेवढे अमाप यश मिळाले आणि लौकिक लाभला, तेवढा आजवर कुणाला क्वचितच लाभला असेल. १९६९ ते १९७७ हा या जोडगोळीचा काळ म्हणजे त्यांच्या कारकीर्दीतला आणि गुन्हे प्रकटीकरण विभागाचा सुवर्णकाळ होता. यूसुफ पटेल याच्यावर झालेल्या हल्ल्यातून टोळीयुद्धाला झालेली सुरुवात, रामन राघव प्रकरण, कृष्णा देसाई हत्या, गोदरेज दंगल या सर्व प्रकरणांचा तपास करताना या जोडगोळीचा लौकिक वाढत गेला. पेंडसे आणि वाकटकर हे एकाच महाविद्यालयाचे म्हणजे पुण्यातील एस. पी. कॉलेजचे विद्यार्थी असल्यापासूनचे मित्र. पण त्यांना एकत्र काम करतानाही कधी स्पर्धा आणि मत्सराचा स्पर्श झाला नाही. श्रीकांत सिनकरांच्या अनेक

 

रहस्यकथांमध्ये या जोडगोळीचेच किस्से ठासून भरलेले आहेत. विनायक वाकटकर यांचे गेल्याच आठवडय़ात ८९ व्या वर्षी निधन झाले. पेंडसे हेदेखील आज हयात नाहीत. मात्र या जोडगोळीने तत्कालीन उपायुक्त रमाकांत कुलकर्णी यांच्या नेतृत्त्वाखाली केलेला उत्कृष्ट तपास म्हणजे मुंबई पोलिसांना उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवणारा होता. पेंडसे-वाकटकर यांच्याशिवाय मुंबई पोलिसांचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही. अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांचा छडा लावण्यात वाकटकर यांनी मोलाची कामगिरी बजावली. अली यावर जंग हे राज्यपाल असताना राजभवनात झालेली चोरी असो वा औंध संस्थानात शंभर तोळ्यांच्या सोन्याच्या नागाची चोरी असो, या गुन्ह्य़ांची उकल वाकटकर यांनी प्रचंड मेहनतीने केली. कृष्णा देसाई खून प्रकरण, जोशी-अभ्यंकर खून, रंगा-बिल्ला अशा अनेक प्रकरणांच्या तपासात वाकटकरांचा सक्रिय सहभाग होता. कृष्णा देसाई खून प्रकरणात थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्यासाठी पेंडसे-वाकटकर यांच्यावर दबाव आल्याचे सांगितले जाते. परंतु ठाकरे यांच्याविरुद्ध पुरावा नसल्याने तसे करता येणार नाही, हे त्यांनी वरिष्ठांना ठासून सांगितले. वाकटकरांनी मानवत हत्याकांडाचा केलेला तपासही तेव्हा खूपच गाजला. १९६९ मध्ये यूसुफ पटेलने तस्करीत हाजी मस्तानची लाखो रुपयांची फसवणूक केली. त्यामुळे हाजी मस्तानने पटेलचा काटा काढण्यासाठी करीमलालाला १० लाखांची सुपारी दिली. करीमलालाने थेट पाकिस्तानातून भाडोत्री मारेकरी आणले. यूसुफ पटेल या हल्ल्यातून वाचला. पटेलच्या अंगरक्षकाने एका मारेकऱ्याला पकडले. त्या जोरावर करीमलाला आणि पुण्याला पळून गेलेल्या मारेकऱ्याला रातोरात पकडून त्याच्याकडून परकीय बनावटीचे पिस्तुल हस्तगत करणाऱ्या वाकटकर यांनी, नंतर हाजी मस्तानलाही गजाआड करण्यात यश मिळविले. मात्र पटेलनेच कोर्टात मौन धारण केल्याने करीमलाला व मस्तान सुटले, ही बाब अलाहिदा असली तरी या कट्टर गुंडांना गजाआड करण्याचे धैर्य त्यांनी दाखविले होते. एका सायकलचोराने विक्रमी संख्येत सायकली चोरून पोलिसांच्या नाकीनऊ आणले होते. पोलीस ठाण्यातून सायकली गायब होत होत्या. गुन्हे प्रकटीकरण शाखेत काम करणाऱ्या पोलीस शिपायांच्या सायकली चोरल्या, तेव्हा वाकटकर खवळले. त्यांनी स्वत:च पाळत ठेवून त्या सायकलचोराला ना. म. जोशी मार्ग येथे जाऊन पकडल्याचे किस्से त्यांचे त्यावेळचे सहकारी सांगतात. करडय़ा शिस्तीच्या, परंतु तितक्याच प्रेमळ, हाताखालच्या शिपायांमध्ये प्रंचड प्रिय असलेल्या या हुशार अधिकाऱ्याला उत्कृष्ट तपासाबद्दल अनेक सन्मान मिळाले, राष्ट्रपती पदकाचेही ते मानकरी ठरले. निवृत्तीनंतर मुंबईत त्यांनी सोन्याची पेढी उघडली. रानडे रोडवरील विक्रम ज्वेलर्समध्ये वाकटकरांना अनेकजण पाहायचे. त्या वयातही त्यांची तीक्ष्ण नजर अनेक वाईट गोष्टी अधोरेखित करीत होती. वाकटकर यांचा गुन्हेगारी जगतात प्रचंड दरारा होता. कुठेही ते एकटे तपासाला जात असत. त्यावेळी गुन्हे प्रकटीकरण शाखेचा पसारा कमी होता. गुन्हेगारीचे स्वरूप वेगळे होते. परंतु एकाही प्रकरणाची उकल झाली नाही वा ते प्रकरण लवकरात लवकर न्यायालयात गेले नाही असे कधीही झाले नाही. उलट वाकटकरांनी तपास केलेल्या प्रकरणातील काही अपवाद सोडले तर न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावल्या आहेत. वाकटकरांच्या निधनाने मुंबई पोलिसांतील एक सोनेरी पान गळून पडले आहे.