Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९

सामूहिक विवाहाला आचार संहितेचा ‘अंतर’पाट
बुलढाणा / यवतमाळ, २५ मार्च / प्रतिनिधी

‘मियाँ बिबी राजी तो क्या करेगा काजी’ अशी एक म्हण आहे. लग्न करायला वर-वधू तयार असतील तर कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही. कायदेशीर एकच अडचण आहे, ती म्हणजे मुलाचे वय २१ आणि मुलीचे वय १८ पेक्षा कमी नको. असे असले तरी पंतप्रधान पॅकेज अंतर्गत होणाऱ्या सामूहिक विवाहाला आचारसंहितेने ‘अंतरपाट’ धरल्याने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणारे शेकडो विवाह पुढे ढकलण्यात आले आहेत. पंतप्रधान पॅकेज अंतर्गत शुभमंगल सामूहिक विवाह योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहोळे आयोजित करणाऱ्या संस्थांना प्रति जोडपे दोन हजार रुपये आणि लग्न करणाऱ्या वधू-वरांना दहा हजाराचे अनुदान दिले जाते. मात्र, सध्या निवडणूक आचारसंहिता आहे.

चंद्रपुरात बहुजन मतांचे धृवीकरण महत्त्वाचे
चंद्रपूर, २५ मार्च/ प्रतिनिधी

चंद्रपूर मतदारसंघात भाजपचे हंसराज अहीर व काँग्रेसचे नरेश पुगलिया लोकसभा निवडणुकीत पाचव्यांदा परस्परांविरुध्द उभे ठाकले असून यावेळी शेतकरी संघटनेचे वामनराव चटप रिंगणात असल्याने बहुजन मतांचे धृवीकरण कसे वळण घेते यावरच या निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे. १९९६ च्या निवडणुकीत नरेश पुगलिया लोकसभेच्या रिंगणात बंडखोर म्हणून उतरले, तेव्हा काँग्रेस आजच्याप्रमाणेच दोन गटात विभागली गेली होती. पुगलियांनी ८३ हजार मते घेऊन अहिरांना लोकसभेचा मार्ग मोकळा करून दिला. हाच प्रतिस्पर्धी आपल्याला भविष्यात घरी बसवेल हे त्यावेळी पुगलियांच्या स्वप्नातही नव्हते. १९९८ मध्ये काँग्रेसचे सर्व गट एकत्र आले आणि या लढतीत पुगलियांनी दीड लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवला.

उमेदवारी मिळूनही हरिभाऊंचा जीव टांगणीला!
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ

न.मा. जोशी, यवतमाळ, २५ मार्च

‘यवतमाळ-वाशीम’ लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यात बाजी मारणाऱ्या माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची उमेदवारी कापण्यासाठी माजी खासदार उत्तमराव पाटील गटाने सोमवारी रात्री १० वाजेपर्यंत जंग जंग पछाडले आणि हरिभाऊ राठोड यांची झोप उडवून त्यांचा जीव टांगणीला ठेवण्यात यश मिळवले. सोमवारी रात्री एक वाजता दिल्लीहून हरिभाऊंना दूरध्वनीवरून ‘पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी तुम्हालाच दिली आहे’, असा संदेश दिला तेव्हा कुठे हरिभाऊंचा जीव भांडय़ात पडला, पण तरीही त्यांना उर्वरित रात्र झोप लागली नाही.

इंदिरा हत्येनंतरच्या लाटेत, रावांच्या विरोधात!
नोस्टाल्जिया

जिल्ह्य़ातील राजकारणाची खडान्खडा माहिती असली तरी लोकसभा निवडणूक लढण्याचा इरादा नाही.. पण, स्वतच्या पक्षाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सर्वच जागा लढण्याचा श्रेष्ठींना होरा.. यातून नागपूर जिल्ह्य़ात म्हणजेच रामटेक लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी आग्रह.. किंबहुना आदेश.. परिणामी मैदानात उतरलो.. प्रतिस्पध्र्याशी थेट ओळख किंवा संपर्क नाही.. पण, नाव ऐकलेले होते.. तेही कॉलेजमध्ये असताना.. १९८४ च्या निवडणुकीतील शंकरराव गेडाम यांचे हे प्रतिस्पर्धी म्हणजे पी.व्ही. नरसिंहराव..

हरिभाऊ राठोड यांच्या प्रचाराचा भर वाशीम जिल्ह्य़ावर
वाशीम, २५ मार्च / वार्ताहर

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हरिभाऊ राठोड यांनी वाशीम शहरामध्ये जनसंपर्क कार्यालय आणि निवासस्थान घेतले आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांशी हरिभाऊ राठोड व त्यांचे निकटवर्तीय ‘समन्वय’ साधत असून वाशीम जिल्ह्य़ात हरिभाऊ राठोड जनसंपर्कावर जास्त भर देणार असल्याचे वृत्त आहे.

कर्जवसुलीच्या नोटीसमुळे शेतकरी अडचणीत
मूर्तीजापूर, २५ मार्च / वार्ताहर

थकित राहिलेल्या कर्जाचा भरणा ३१ मार्चपूर्वी करावा अन्यथा केंद्र सरकारने दिलेली कर्जमाफी परत पाठविण्यात येईल. कर्जाचा बोझा खात्यावर टाकण्यात येऊन संपूर्ण कर्ज वसूल करण्यात येईल, अशा आशयाच्या नोटिसा अकोला जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेने नुकत्याच बजावल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून जिल्हा प्रशासनाने टंचाईची स्थिती म्हणून जाहीर केलेल्या सोयी सवलतींबाबतची घोषणाच पोकळ ठरल्याचे उघड झाले आहे. अकोला जिल्हाधिकारी मुथ्थुकृष्णन संकरनारायणन् यांनी १६ फेब्रुवारीला मूर्तीजापूर तालुक्यात दौरा करून पाणी टंचाईसह एकंदर सर्वच बाबींचा आढावा घेतला. मूर्तीजापूर तालुक्यातील सर्व १६४ महसुली गावे टंचाईच्या स्थितीत असल्याचे जाहीर करून त्यानुषंगाने कर्जमाफीसह अनेक सोयी सवलती त्यांनी घोषित केल्या. हा तालुका अंतिम सर्वेक्षणामध्ये ५० टक्यांपेक्षा कमी पैसेवारीमध्ये आला आहे. शासन निर्णयानुसार अशा स्थितीत संपूर्ण शासकीय तसेच बँकेच्या कर्जवसुलीला स्थगिती देण्यात येते. शासनाने पैसेवारीनुसार महसूल शेतकऱ्यांना कागदोपत्री दिलासा दिला. मात्र, तो जिल्हा बँकेने काढलेल्या नोटीसमुळे कोरडाच ठरला आहे, अशी मूर्तीजापूर तालुका शेतकरी संघर्ष कृती समितीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यासंदर्भात शेतकरी संघर्ष कृती समितीने अमरावती विभागीय आयुक्त, राज्याचे सहकारमंत्री, जिल्ह्य़ाचे पालकमंत्री, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
गडचिरोली, २५ मार्च / वार्ताहर

लोकसभा निवडणुकीसाठी गडचिरोली- चिमूर या मतदारसंघात १६ एप्रिल २००९ रोजी होणाऱ्या मतदानासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाची पूर्वतयारी झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अतुल पाटणे यांनी शनिवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी देवाशीष चक्रवर्ती यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी पाटणे यांनी गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण निवडणूक तयारीची माहिती त्यांना दिली. यावेळी जिल्हाधिकारी पाटणे यांच्यासमवेत उपजिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी किरण कुळकर्णी, राष्ट्रीय सूचना केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी शिवशंकर टेंभुर्णे उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक नियंत्रण कक्ष ‘हायटेक’ झाला असून दूरध्वनी व एसएमएसद्वारे प्रत्येक पोलींग बूथ व मतदानासंबंधी संपूर्ण माहिती उपलब्ध होणार असल्याचे पाटणे यांनी सांगितले. त्यासाठी २४ तास कार्यरत असणारा वेगळा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात उघडण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. मतदारांना स्वत:चा मतदान क्रमांक, बुथ क्रमांक, मतदान केंद्र याविषयी माहिती मिळवायची असल्यास मोबाईल वरून नियंत्रण कक्षाला एसएमएस पाठविल्यास माहिती उपलब्ध होईल. याव्यतिरिक्त १०५ क्रमांकावर दूरध्वनी करून हवी ती माहिती प्राप्त करून घेता येईल, असेही पाटणे यांनी सांगितले.

हिंदुत्ववाद्यांनाच पाठिंबा देण्याचे सेना मेळाव्यात आवाहन
अचलपूर, २५ मार्च / वार्ताहर

देशाला दहशतवाद्यांच्या तावडीतून कायमचे मुक्त करण्यासाठी हिंदुत्ववादी नेत्यांनाच जनतेने पाठिंबा द्यावा, असे आवाहन शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले. याप्रसंगी खासदार अनंत गुढे, तुषार भारतीय, नाना नागमोथे, डॉ. अनिल भोंडे, सुधीर सूर्यवंशी, साहेबराव काढोळे गजानन कोल्हे, दिगांबर डहाके, उपस्थित होते. खासदार अनंतराव गुढे यांच्या वाढदिवसानिमित्त राजू शर्मा व बाल धृव गणेश मंडळातर्फे ५३ किलोचा हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. लढाई जिंकायची असेल तर सेनापतीसह सर्व मावळ्यांनी दक्ष राहण्याची गरज आहे, असे अनंत गुढे म्हणाले. भाजपचे तुषार भारतीय यांनी यावेळी ‘प्रहार’ संघटनेवर टीका केली. याप्रसंगी गजानन कोल्हे, नाना नागमोथे, सुधीर सूर्यवंशी यांची भाषणे झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाप्रमुख नरेंद्र पडोळे यांनी केले, तर संचालन राजू शर्मा, विनय चतुर यांनी केले. गजानन कोल्हे, संजय जैस्वाल, माणिक देशपांडे, विनय चतुर, राजेश शर्मा, अवधुत हरले, प्रमोद भोंडे, नंदु काळे, नंदु राऊत, पन्ना गौर, नितीन भुयार, मनोहर कोशलकर, रामदास हागे, पवन हिरुळकर, किशोर लांबाडे, मंदा भारती, वर्षां हिरुळकर, लीला महतम, सुषमा, नीलिमा हजारे, विमल लाडोळे, मंगला मुळतकर वगैरे यावेळी उपस्थित होते.

अडसूळ प्रसारमाध्यमांवर उखडले
परतवाडा, २५ मार्च / वार्ताहर

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे तीर मर्माला झोंबल्याने सेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी प्रसारमाध्यमांवर आगपाखड केल्याची घटना रविवारी येथे घडली. मात्र, खासदार गुढेंच्या मध्यस्थीने पुढील वाद टळला. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर येथील रंगोली लॉन्समध्ये सेनेच्या वतीने प्रीतिभोज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सेनेचे अमरावतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ व खासदार अनंत गुढे यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला. ‘आपली उमेदवारी सेनेने अमरावतीत आयात केल्याची चर्चा आहे’ या उल्लेखामुळे अडसुळांचा पारा एकाएकी चढला. ‘मी कुठेही उभा राहू शकतो. माध्यमांनी माझ्याविरुद्ध अपप्रचार चालवला आहे. मी त्याची फार दखल घेत नाही’, असे उत्तर त्यांनी दिले. यानंतर शब्दाने शब्द वाढत गेला. स्थानिक पत्रकार आणि अडसूळ यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पाहून खासदार अनंत गुढे यांनी मध्यस्थी करून सारवासारव केली व प्रकरण शांत झाले. यावेळी सेनेचे उप जिल्हाप्रमुख ओमप्रकाश दीक्षित, अचलपूर तालुका प्रमुख नरेंद्र पडोळे, बंडू घोम यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. मात्र राज्यात सेना-भाजप युती असताना भाजपचा एकही पदाधिकारी वा कार्यकर्ता येथे उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

गडचिरोलीतून भारिप-बमसं उमेदवाराची लवकरच घोषणा
गडचिरोली, २५ मार्च / वार्ताहर

मित्रपक्ष आणि पुरोगामी विचारसरणीच्या सामाजिक संघटनांच्या सहकार्याने भारिप बहुजन महासंघ महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवणार असून गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून पक्षाच्या उमेदवाराची घोषणा येत्या एक-दोन दिवसात केली जाणार असल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघासाठी भारिप बहुजन महासंघातर्फे निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे आलेले अर्ज पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले. यात आदिवासी विकास स्वायत्त परिषदेचे दिवाकर पेंदाम, हिरालाल येरमे, जिल्हा परिषद सदस्य मंदा गायकवाड, नारायण जांभुळे, अ‍ॅड. दडमल यांचा समावेश असून या विषयासंदर्भात पक्ष पातळीवर विचारविनिमय सुरू आहे, असेही राऊत म्हणाले. यावेळी भारिप-बमसंचे जिल्हा सरचिटणीस नसीर जुम्मन शेख, आरमोरी विधानसभा प्रमुख हंसराज बडोले, परमहंस मेश्राम, सीताराम टेंभुर्णे, पुरुषोत्तम गायकवाड, बी.डी. मेश्राम, वगैरे पदाधिकारी उपस्थित होते.

रिपाइंचा काँग्रेस-राकाँ उमेदवाराला पाठिंबा
भंडारा, २५ मार्च / वार्ताहर

साकोली येथे नुकत्याच झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या भंडारा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं युतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे एकमताने ठरले. तसेच भंडारा जिल्ह्य़ातील तीन विधानसभा मतदारसंघापैकी भंडारा विधानसभा मतदारसंघात रिपाइंचाच उमेदवार उभा करावा, ही मागणी युतीच्या नेत्यांकडे लावून धरण्याचेही ठरले. याच सभेत पक्षशिस्त पाळत नसलेल्या एस.के. भादुडी यांना पक्षात ठेवायचे नाही, असेही ठरले. ही सभा जिल्हाध्यक्ष म.दा. भोवते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सदर बैठकीला जिल्हा महासचिव असित बागडे, अ‍ॅड. वामनराव खोब्रागडे, कार्याध्यक्ष वसंत हुमणे, सचिव मदन बागडे, कोषाध्यक्ष म.वा. दहिवले आदी उपस्थित होते.

चंद्रपूरच्या कराटेपटूंचे यश
चंद्रपूर, २५ मार्च / प्रतिनिधी

येथील ज्युडो कराटे असोसिएशन संस्थेमार्फत गेल्या अनेक दिवसांपासून ज्युडो कराटे या क्षेत्रातील उत्कर्ष वरघने याने दिल्ली, हैदराबाद, राजुरा, नागपूर, चंद्रपूर येथील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कराटे स्पध्रेमध्ये उत्कृष्ट कराटेपटू म्हणून अनेक स्वर्णपदक मिळवले. वरील स्पध्रेतील या २००८-०९ वर्षी मिळवून त्याने चंद्रपूर जिल्हय़ाचे नाव व विद्यालयाचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले. त्याकरिता चंद्रपूर जिल्हय़ाचे निवासी जिल्हाधिकारी सुरेश जाधव यांनी तसेच उपजिल्हाधिकारी मनकावडे यांनी छोटेखानी कार्यक्रमात उत्कर्ष वरघने उत्कृष्ट कराटेपटू म्हणून त्याचा पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी क्रीडा संघटनेचे व कराटेपटू उत्कर्ष वरघनेचे मार्गदर्शक सोमेश्वर येलचलवार तसेच कुंदन पेंदोर, मनोज वरघने उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी उत्कर्ष वरघनेला कमीत कमी वयामध्ये ज्युडो कराटे या खेळातील उत्कृष्ट कराटेपटू म्हणून स्वर्णपदक पटकावून चंद्रपूर जिल्हय़ाचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचवल्याबद्दल शाबासकी दिली व अशीच प्रगती करीत रहा म्हणून मनोगत व्यक्त केले. वरील झालेल्या कार्यक्रमातील विस्तृत माहिती चंद्रपूर जिल्हा ज्युडो कराटे असोसिएशनचे अध्यक्ष सोमेश्वर येलचलवार यांनी केले आहे.

भ्रमणध्वनी संच बदलून देण्याचा ग्राहक मंचचा आदेश
गोंदिया, २५ मार्च / वार्ताहर

जुन्या भ्रमणध्वनी संचाऐवजी नवीन संच एक महिन्याच्या आत तक्रारकर्त्यांला द्यावा, असा आदेश एका प्रकरणात ग्राहक मंचाने दिला आहे. खरेदी केलेल्या नवीन भ्रमणध्वनी संचात बिघाड झाल्याची तक्रार करूनही वितरकाने बदलून दिला नाही. त्यामुळे हे प्रकरण ग्राहक मंचात गेले.
मोगर्रा येथील सुरेंद्र पुरणलाल येरले यांनी ३१ऑक्टोबर ०८ ला राकेश आनलाईन येथून भ्रमणध्वनी संच खरेदी केला. दोन महिन्यांत या संचात बिघाड झाला. सुरेंद्रने दुरुस्तीसाठी तो संच राकेशला दिला. दुरुस्ती होऊ शकत नाही, असे प्रमाणपत्र देऊन संच बदलवून देण्यासाठी स्वस्तिक ब्रदर्स या वितरकाकडे पाठविले. त्यांनी भ्रमणध्वनी संच असलेला रिकामा डबा आणण्यास सांगितले.
मात्र, भ्रमणध्वनी संच उपयोगासाठी काढल्यानंतर डबा निरुपयोगी असल्याने सुरेंद्रने तो टाकून दिला होता. यावरून वितरकाने संच बदलून देण्यास नकार दिला होता. सुरेशने ग्राहक मंचाकडे तक्रार केली.

चिखलदरा परिसरात पती-पत्नीची हत्या
अमरावती, २५ मार्च / प्रतिनिधी

चिखलदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचडोंगरी गावाजवळ पती-पत्नीची हत्या करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली. रामदास भूरा भेलकर (३५) आणि चंद्रकला रामदास भेलकर (३०) अशी मृतांची नावे आहेत. चंद्रकलाचा मृतदेह हा एका छोटय़ा विहिरीत आढळला तर, रामदासला एका झाडावर फासावर लटकविण्यात आले. काटकुंभजवळील दहेंद्री गावातील रामदास भेलकर व त्याची पत्नी चंद्रकला हे दोघे पायी चालत गावात पोहोचत असताना अज्ञात लोकांनी चंद्रकलावर अतिप्रसंग करून तिला विहिरीत ढकलून दिले आणि तिचा पती रामदास याची गळफास लावून हत्या केली, असा घटनाक्रम समोर आला आहे. चिखलदरा पोलिसांनी अद्याप हत्येचा गुन्हा नोंदविलेला नाही. तथापि, सकृतदर्शनी हे हत्येचे प्रकरण असावे, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. पाचडोंगरीपासून दोन किलोमीटर अंतरावर कोरडा जंगलात या दोघा पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले. चंद्रकलाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. तिच्या डोक्यावर जखमा आढळून आल्या. रामदास भेलकरचा मृतदेह झाडावर गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. आज सकाळी गावकऱ्यांना त्यांचा मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना त्याची सूचना दिली आणि काही वेळानंतर चंद्रकलांचा मृतदेह एका छोटय़ा विहिरीत आढळून आला.

मूर्तीजापूर तालुक्यातील तीन तीर्थक्षेत्रांचा विकास
मूर्तीजापूर, २५ मार्च / वार्ताहर

ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मूर्तीजापूर तालुक्यातील लक्षेश्वर संस्थानसह तीन तीर्थक्षेत्रांचा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत विकास केला जाणार आहे. जिल्हा सर्व साधारण आर्थिक योजनेंतर्गत २००८ व ९ या वर्षांसाठी प्राप्त निधीतून ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी प्राप्त निधीतून लाखपुरी येथील लक्षेश्वर संस्थान, सिरसो येथील पुंडलिक बाबा संस्थान (पुंडलिकनगर) आणि दुर्गवाडा येथील संत मुर्कोजी महाराज संस्थानाकरिता कार्यादेश काढण्यात आले आहेत. जिल्ह्य़ातील अशा एकंदर १२ तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी १ कोटी ३० लाखाचा निधी अकोला जिल्हा परिषदेला प्राप्त झाला असून त्यामध्ये मूर्तीजापूर तालुक्यातील तीन तीर्थक्षेत्राच्या विकास खर्चाचा समावेश आहे.