Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
विविध

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा विस्तार हवा पण नव्या सदस्यराष्ट्रास ‘व्हेटो’ नको!
अमेरिकेची भूमिका
वॉशिंग्टन, २५ मार्च/पी.टी.आय.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा विस्तार करण्यास अमेरिकेने पाठिंबा दिला आहे मात्र नव्या सदस्यराष्ट्रांना ‘व्हेटो’चा अधिकार देण्यास मात्र विरोध दर्शविला आहे. भारतासह काही देशांनी सुरक्षा परिषदेच्या सदस्यत्वासाठी आग्रह धरला आहे. आंतरराष्ट्रीय संघटना विभागाचे हंगामी उपमंत्री जेम्स वॉर्लिक यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्तारास आमचा पाठिंबा आहे पण नव्या सदस्यदेशाला व्हेटोचा अधिकार देण्यास आमचा विरोध आहे.’

भारत, चीनचे आव्हान पेलण्यासाठी काटकसर अनिवार्य - ओबामा
वॉशिंग्टन, २५ मार्च/पी.टी.आय.

अमेरिकी अर्थव्यवस्थेपुढे आज घडीला अब्जावधी डॉलर वित्तीय तुटीचा धोका उभा असताना भारत व चीन हे दोन्ही देश अमेरिकेपुढे मोठे आव्हान आहे. आपण खर्चकपात न केल्यास भारत व चीन हे दोघेही अमेरिकेच्या पुढे निघून जातील असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी देशवासीयांना दिला. व्हाईट हाऊसमध्ये मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बराक ओबामा यांनी सांगितले की, आर्थिक मंदीच्या सावटातून बाहेर पडण्यासाठी अनेक महिने लागण्याची शक्यता आहे.

बेनझीर भुत्तो हत्यातपासासाठी संयुक्त राष्ट्रांचे पथक पुढील महिन्यात पाकिस्तान भेटीवर
इस्लामाबाद, २५ मार्च/पी.टी.आय.
बेनझीर भुत्तो यांच्या हत्याप्रकरणी प्राथमिक तपास करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे खास पथक एप्रिलमध्ये पाकिस्तानला भेट देणार आहे. सध्या या पथकासाठीच्या अधिकाऱ्यांची निवड अंतिम टप्प्यात असून पाकिस्तानातील समकक्ष अधिकाऱ्यांच्या मदतीने स्वतंत्रपणे हा तपास केला जाणार आहे. आफ्रिकेतील मार्क क्वार्टरमन यांच्या नेतृत्वाखालील हे पथक याआधी मार्चच्या दुसऱ्या आठवडय़ात पाकिस्तानला भेट देणार होते.

पाकिस्तानात निदर्शकांवर पोलिसांचा गोळीबार
एक ठार, आठ जण जखमी

इस्लामाबाद, २५ मार्च/पी.टी.आय.

तालिबानी दहशतवाद्यांच्या कारवायांनी ग्रस्त असलेल्या पाकिस्तानमधील वायव्य सरहद्द प्रांतामध्ये निर्वासित छावणीतील अपुऱ्या सुविधांबद्दल नाराजी व्यक्त करीत सरकारविरोधात निदर्शने करणाऱ्या विस्थापितांवर पोलिसांनी आज केलेल्या गोळीबारात एक ठार व आठ जण जखमी झाले. बजौर या आदिवासी भागामध्ये तालिबानी दहशतवाद्यांविरोधात लष्कराने सुरु केलेल्या कारवाईमुळे अनेक स्थानिक नागरिकांना विस्थापित व्हावे लागले आहे.

अल्पवयीन मुलीने केला आई-वडील व भावाचा खून
राजकोट, २५ मार्च/पी.टी.आय.

पोरबंदर येथे एका अल्पवयीन मुलीने आपले आई-वडील व भाऊ अशा तिघांना ठार केल्याची माहिती आज पोलिसांनी दिली. जीवाचा थरकाप उडविणारी घटना गेल्या १ मार्च रोजी घडली. या अल्पवयीन मुलीचे वडील हे पोलिस कॉन्स्टेबल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करण सुवा (४०) हे आपल्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्यावर बंदुकीने गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

पाकिस्तानात निदर्शकांवर पोलिसांचा गोळीबार
एक ठार, आठ जण जखमी
इस्लामाबाद, २५ मार्च/पी.टी.आय.

तालिबानी दहशतवाद्यांच्या कारवायांनी ग्रस्त असलेल्या पाकिस्तानमधील वायव्य सरहद्द प्रांतामध्ये निर्वासित छावणीतील अपुऱ्या सुविधांबद्दल नाराजी व्यक्त करीत सरकारविरोधात निदर्शने करणाऱ्या विस्थापितांवर पोलिसांनी आज केलेल्या गोळीबारात एक ठार व आठ जण जखमी झाले. बजौर या आदिवासी भागामध्ये तालिबानी दहशतवाद्यांविरोधात लष्कराने सुरु केलेल्या कारवाईमुळे अनेक स्थानिक नागरिकांना विस्थापित व्हावे लागले आहे. त्यांच्यासाठी नौशेरातील जालोझाई येथे निर्वासित छावणी उभारण्यात आली आहे. मात्र अपुऱ्या सुविधांमुळे तेथे राहणारे हे विस्थापित हैराण झाले आहेत. सरकारने चालविलेल्या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल विस्थापितांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आज निदर्शने केली. इस्लामाबाद व पेशावर यांना जोडणाऱ्या जीटी रोडवरील वाहतूक या निदर्शकांनी बंद पाडली. निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेकही केली. पोलीस व निदर्शकांमध्ये चकमकही उडाली. या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी प्रथम लाठीमार केला. त्याचा काही परिणाम होत नाही हे पाहून पोलिसांनी अश्रूधूराच्या नळकांडय़ाही फोडल्या. सरतेशेवटी जमावाला काबूत आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्यात निदर्शकांपैकी एक ठार व आठ जण जखमी झाले. बजौरमध्ये तालिबानी दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या लष्करी कारवाईत आपल्या घरांची नासधूस होत असल्याचे निदर्शकांनी म्हटले आहे. ही लष्करी कारवाई बंद करण्यासाठी सरन्यायाधीश इफ्तिकार चौधरी यांनी जातीने लक्ष द्यावे अशी मागणी निदर्शकांनी केली.

जेड गुडीचे दफन वधुवेशात होणार!
लंडन, २५ मार्च/पी.टी.आय.

अलीकडेच दिवंगत झालेली ब्रिटनमधील रिअ‍ॅलिटी टीव्ही तारका जेड गुडी हिचे दफन तिच्या इच्छेनुसार तिने तिच्या विवाहाच्या वेळी घातलेल्या वधुवेशात केले जाणार आहे. आपले दफन आपल्या वधुवेशातच केले जावे, अशी इच्छा जेड गुडीने व्यक्त केली होती. त्यानुसार तब्बल ३,५०० पौंड किमतीचा हा वधुवेश तसेच लग्नात तिने घातलेली ‘वेडिंग रिंग’सुद्धा तिला चढविला जाणार आहे. याव्यतिरिक्त तिने स्वत: निवडलेली आपल्या मुलांची, फ्रेडी आणि बॉबीची छायाचित्रेही तिच्यासोबत कबरीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. मृत्युपूर्वी काही दिवस जेड गुडीने या छायाचित्रांची निवड केली होती. जेड गुडीचे दफन येत्या ४ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. तिची आई जॅकी आणि पती जॅक ट्वीड हे या दफनविधीची तयारी करीत आहेत. दफनविधीचा हा ‘सोहळा’ आंतरराष्ट्रीय प्रसारमामध्यमांद्वारे जवळपास सगळ्या जगापर्यंत पोहोचेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सामूहिक बलात्कारप्रकरणी उपनिरीक्षक अटकेत
भोपाळ, २५ मार्च/पी.टी.आय.

बलात्काराची तक्रार नोंदविण्यास गेलेल्या अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील उपनिरीक्षक नरेंद्र सिंग ठाकूर याला काल अटक झाली. आणखी दोन पोलिसांनीही आपल्यावर बलात्कार केल्याचा या तरुणीचा आरोप असून त्यांचा शोध घेतला जात आहे. सिमारिया खेडय़ातील या तरुणीचा प्यारेलाल पटेल या व्यक्तिशी दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र नवऱ्याला सोडून ती नंतर हिमाचल प्रदेशात गेली. तिथे भुरे महाराज उर्फ भय्या पुराणिक याने तिच्यावर पाच महिने अत्याचार केले. त्याची तक्रार नोंदविण्यासाठी ही तरुणी या पोलीस ठाण्यात गेली असताना हा प्रकार घडल्याचा तिचा आरोप आहे.

‘युरोपीय देशांप्रमाणे भारत-पाक ऐक्य शक्य’
जालंधर, २५ मार्च/पी.टी.आय.

युरोपीय देशांप्रमाणे भारत आणि पाकिस्तानात धोरणात्मक ऐक्य शक्य असून हे दोन शेजारी देश मित्रत्वाचे संबंध स्थापू शकतात, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आज येथे केले. डीएव्ही इन्स्टिटय़ूटच्या विद्यार्थ्यांशी ते बोलत होते. ते म्हणाले युरोपीय देशांत कित्येक युद्धे झाली, अमेरिका व रशियातही टोकाचा तणाव होता. तरीही हे देश आज मित्रत्व स्थापू शकतात, तर भारत आणि पाकिस्तानातही तसे शक्य आहे. वारंवार होणारे दहशतवादी हल्ले आणि आर्थिक पेच पाहता भारत महासत्ता बनू शकतो काय, या प्रश्नावर ते उद्गारले, अडचणी येतातच पण आपण आपले ध्येय न विसरता काम करीत राहिले पाहिजे.