Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २७ मार्च २००९

बाजारावर तेजीची गुढी
‘सेन्सेक्स’ १० हजारांपल्याड
मुंबई, २६ मार्च/ व्यापार प्रतिनिधी
सलग चौथ्या दिवशी वरच्या दिशेने घोडदौड सुरू ठेवत, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने आज पुन्हा एकदा १०,००० ची पातळी सर केली. बाजारावर तेजीवाल्यांची पकड हळूहळू मजबूत होत असून, आजची ३३५ अंशांची कमाई म्हणजे बाजारावर रोवली गेलेली तेजीची गुढीच असल्याचा मतप्रवाह बाजारात जोर पकडत आहे. देश-विदेशातून येत असलेल्या सकारात्मक बातम्यांमुळे शेअर बाजाराचा मूड पालटत चालला असून, गेल्या चार दिवसातील सातत्यपूर्ण चढता क्रम त्याचा प्रत्यय आहे, असे शेअर बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे. गेल्या चार दिवसांमध्ये सेन्सेक्सने ९९६६.६८ अंशांवरून सुरुवात करीत तब्बल १०३६.४२ ची कमाई केली आहे.

राहूल महाजन निवडणुकीच्या आखाडय़ात?
ईशान्य मुंबईतून अपक्ष लढण्याची शक्यता

समर खडस
मुंबई, २६ मार्च

प्रमोद महाजन यांच्या निर्घृण हत्येनंतर महाजन कुटुंबीयांना भाजपने जणूकाही वाऱ्यावर सोडून दिल्यासारखीच परिस्थिती निर्माण झाल्याची उघड चर्चा होऊ लागली आहे. पुनम महाजन यांना तिकीट नाकारल्यामुळे गोपीनाथ मुंडे प्रचंड नाराज आहेत. मुंडे यावेळी तितक्याच दमदारपणे पक्षाचा प्रचार करतील, असे परिवाराला वाटत नाही. या सगळ्या पाश्र्वभूमीवर आता ‘बिग बॉस’ या मालिकेमुळे गाजावाजा झालेले राहूल महाजन हे ईशान्य मुंबईतून लोकसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढविण्याची शक्यता असल्याचे राहूल यांच्या निकटवर्तीय वर्तुळातून समजते.

राणेंचे ठंडा ठंडा कूल कूल!
मुंबई, २६ मार्च/प्रतिनिधी

जिभेवरील ताबा सुटल्याने काँग्रेसमध्ये दोन महिन्यांपूर्वी कमालीचे अडचणीत आलेल्या नारायण राणे यांच्यातील आक्रमक, फटकळ नेत्याचे ‘ठंडा ठंडा कूल कूल’ काँग्रेसी नेत्यात परिवर्तन झाल्याचा प्रत्यय आज पत्रकार परिषदेत आला. काँग्रेसने स्वबळावर लढले पाहिजे असे विलासराव म्हणतात. तुम्ही सहमत आहात का? राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केले आहे. एका आघाडीचे पंतप्रधानपदाचे दोन उमेदवार कसे, प्रमोद महाजन यांची कन्या पूनम यांना उमेदवारी मिळायला हवी होती का? तुमचा निवडणुकीला उभा असलेला पुत्र डॉ. निलेश उद्धट असल्याचा आरोप होतोय. त्याला काय टीप देणार? अशा एक ना अनेक ‘आऊटसाईड दी ऑफ स्टंप बॉल’वर राणे यांनी बेफिकीर फटका मारला नाही किंवा एल.बी.डब्ल्यू झाले नाहीत.

ताऱ्यांच्या ‘शेवटा’चा माग काढण्यात शास्त्रज्ञांना यश!
वॉशिंग्टन, २६ मार्च/पी.टी.आय.

सूर्यापेक्षा १० ते १०० पट अधिक वस्तुमान असलेल्या ताऱ्यांचा शेवट कृष्णविवर बनण्यात होतो या सध्या प्रचलित असलेल्या सिद्धान्ताला बळकटी देणारे प्रत्यक्ष निरीक्षणावर आधारित संशोधन करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. आपल्या सूर्याच्या ५० पट मोठय़ा असलेल्या एका ताऱ्याच्या स्फोटाचे या शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष निरीक्षण केले आहे. आपल्या सूर्यासारख्या ताऱ्यांमधील हायड्रोजनरूपी इंधन जेव्हा संपुष्टात येते तेव्हा ते अन्य मोठय़ा ताऱ्यांच्या तुलनेत शांतपणे जळत नष्ट होतात. परंतु सूर्यापेक्षा आठपट अथवा त्याहून अधिक मोठे असलेल्या ताऱ्यांचा शेवट अधिक ‘लक्षणीय’ स्वरूपात होतो.

जग ऑनलाइन होत असताना आपला आवडता ‘लोकसत्ता’ तरी मागे कसा राहील? आता खास निवडणुकांच्या रणधुमाळीत आपलाही आवाज थेट जगभरात पोहोचविण्यासाठी आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू होतो आहे, लोकसत्ताचा ब्लॉग. www.loksatta.com या ‘लोकसत्ता’च्या होमपेजवर उजव्या बाजूस आपल्याला निवडणुकांचे वृत्त देणारी ‘इंडियन पोलिटिकल लीग’ ही लिंक दिसेल. त्यावर क्लिक् केल्यानंतर तुम्हाला निवडणुकीच्या संदर्भातील लेख वा खास बातम्या दिसू लागतील. तिथे सुरुवातीसच ‘ब्लॉग नोंदवा’ या बटणावर क्लिक् केल्यानंतर थेट ब्लॉग ओपन होईल. लोकसत्ता डॉटकॉम ही वेबसाईट युनिकोडमधील असल्याने त्यावर आपले नाव, विषय आणि प्रतिक्रिया सारे काही मायमराठीत लिहिता येईल. ..आणि आपला आवाज पोहोचेल थेट जगभरात.. तर आता व्हा लोकसत्ता ब्लॉगर!

जॉर्ज यांना पाठिंबा नाही- भाजप
नवी दिल्ली, २६ मार्च / पी.टी.आय.

जद (यू) ने उमेदवारी नाकारल्याने बिहारमधील मुजफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा रालोआचे माजी समन्वयक जॉर्ज फर्नाडिस यांनी केली असली तरी त्यांना भाजपचा पाठिंबा राहणार नाही, असे पक्षप्रवक्ते बलबीर पुंज यांनी आज पत्रकारांना सांगितले. रालोआचा घटक पक्ष असलेल्या जद (यु) सोबत भाजपची युती असल्याने फर्नाडिस यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुजफ्फरपूरमध्ये जद युच्या उमेदवारासाठीच भाजपचे कार्यकर्ते काम करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. बिहारमध्ये भाजप १५ तर जनता दल युनायटेड २५ जागांवर लढणार आहे. फर्नाडिस यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना पक्षाने उमेदवारी नाकारली असली तरी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली होती.

जोपर्यंत आनंद मिळतो आहे तोपर्यंत खेळणार -सचिन
नेपियर, २६ मार्च/पी.टी.आय.

सचिन तेंडुलकरच्या बॅटमधून पुन्हा एकदा धावांची बरसात होत असल्याने सध्यातरी निवृत्तीविषयी बोलण्याच्या मूडमध्ये तो दिसत नाही. जोपर्यंत या खेळातून आनंद मिळतो आहे तोपर्यंत मी खेळतच राहणार असल्याचे त्याने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २९ हजारपेक्षा अधिक धावा आणि त्यात ८५ शतके ठोकणाऱ्या सचिनसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये साध्य करण्यासारखे काहीही शिल्लक नाही. मात्र तरीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची प्रेरणा कायम असून चांगली कामगिरी होत आहे तोपर्यंत मी खेळतच राहीन असे सचिन म्हणतो..
आपल्या कारकिर्दीत चढ-उतार आले आणि कितीतरी आव्हानांचा सामना मला करावा लागला आहे; पण हा जीवन चक्राचाच भाग असून ते चक्र मला पूर्ण करायचे आहे असे सचिन म्हणतो. स्वप्नांच्या मागे धावण्यावर माझा ठाम विश्वास असून जोपर्यंत भारतासाठी खेळणे शक्य आहे तोपर्यंत मी खेळणार आहे. हा खेळ आपल्याला अतिशय प्रिय असल्याने अन्य कुठल्या प्रेरणेची मला गरजच नाही. करोडो क्रीडाप्रेमी भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करीत असतात आणि या अपेक्षांचे ओझे आपल्याला सदैव चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा देत राहतो, असे सचिनने म्हटले आहे.

पेडर रोडवरील वाहतूक एक दिशा मार्ग होणार!
मुंबई, २६ मार्च / प्रतिनिधी

पेडर रोडवर मलनिस्स:रण वाहिनीच्या दुरुस्तीचे काम पालिकेने हाती घेतल्यामुळे पेडर रोड एक दिशा मार्ग करण्यात आला आहे. किमान २५ दिवस हा रस्ता बंद राहणार आहे. पेडर रोडवरील एम. एल. डहाणूकर मार्ग ते कल्याणजी वीरजी चौकापर्यंत हे काम होणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. हाजी अली जंक्शन येथे जाण्याकरीत आता बँन्ड स्टँड जंक्शन ते वाळकेश्वर रोड, बी. जी. खेर मार्ग- हँगिंग गार्डन- ताडेदव किंवा भुलाभाई देसाई मार्ग या मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. बी. जी. खेर मार्ग हा तीन बत्ती जंक्शन ते केम्प्स कॉर्नर तसेच एल. डी. रुपारेल मार्ग हा बी. जी. खेर मार्ग ते नेपियन्सी रोड असा एक दिशा करण्यात आला आहे. तसेच भाऊसाहेब हिरे हा मार्ग एकदिशा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मानव मंदिर रोड , रतिलाल ठक्कर मार्गावरील वाहनांना बी. जी. खेर मार्ग जंक्शनकडे जाण्याकरीता उजवे वळण घेता येणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. वाहन चालकांनी वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. पर्यायी मार्ग असे आहेत- चर्चगेट स्थानकापासून सुरू होणारा महर्षि कर्वे मार्ग, विल्सन महाविद्यालयापासून सुरू होणारा पंडिता रमाबाई मार्ग आणि पी. डिमेलो रोड.

रशियातील बस अपघातात १४ ठार
मॉस्को, २६ मार्च/वृत्तसंस्था

रशियातील व्लादिमीर परिसरात एक बस आणि ट्रक परस्परांवर आदळून झालेल्या अपघात किमान १४ प्रवासी जळून मरण पावले. रशियातील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मॉस्कोपासून सुमारे सव्वाशे कि.मी. अंतरावर हा अपघात झाला. प्रवासी बस समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळली आणि टक्कर होताच तिने पेट घेतला. या बसमध्ये नेमके किती प्रवासी होते हे लगेच समजू शकले नाही. मात्र चार प्रवाशांना वाचविण्यात यश आले, असे या सूत्रांनी सांगितले.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी