Leading International Marathi News Daily
शुक्रवार २७ मार्च २००९
प्रकल्पाची जागा आणि पाणी यांचा योग्य उपयोग
मेलबॉक्स
गावाकडील घर
आता गवताची जागा कौलांनी घेतली..
केला तुका अन्..
आडव्याची उभी मुंम्बय; शांघायचा ‘इम्पोर्टेड’ म्हावरा..!!
न्यायालयीन निवाडे
गाळ्यांमधील पाणी गळती: सोसायटीची जबाबदारी
घर पाहावं घेऊन
घरासाठी घोर..
वाद-प्रतिवाद
चर्चा
संगणकीकरणाने गृहबांधणीत
पारदर्शकता येईल?
घर स्वप्नातलं
बांधकाम करताना- वॉटर प्रूफिंग
वलयांकित ताजमहाल
<६> वास्तूचे जडत्व जेव्हा पार नाहीसे होते..
रचना पडद्यांची
वास्तुरंग
घरांच्या किमती हव्यात ‘मॉडेल’नुसार!
वास्तुकला
‘भटकंती : मंदिर परिसरात’
आधुनिक तंत्रज्ञानाचे फर्निचर
असं सजवलं घर माझं
मेक ओव्हर

 


‘रोज एक रुपया पगारावर वनाजमधील नोकरी पत्करली. त्याच पगारावर मुंबईहून पुण्याला बदली झाली. अशा स्थितीत स्वत:च्या घरकुलाचं स्वप्न पूर्ण होणार नाही हे नक्की माहीत होतं. त्यामुळं हे स्वप्न मी कधी पाहिलचं नाही. पण आज हे न पाहिलेलं स्वप्न पूर्ण होताना आयुष्यात सर्वाधिक आनंद मला झालाय. खांडेकरसाहेबांसारखा देव भेटला म्हणूनच केवळ हे शक्य झालं,’ विश्वनाथ रामचंद्र जाधव आयुष्याचा पट उलगडत होते. त्यांचे डोळे आणि हृदय दोन्हीही भरून आले होते. वनाज कंपनीचे मुख्य प्रवर्तक उद्योगपती एस. के. खांडेकर यांच्या दातृत्वातून साकारलेल्या वनाज को-ऑप. हाौसिंग सोसायटीच्या पुनर्विकासानंतर तयार झालेल्या इमारतीत वनाजमधील जवळपास १७६ कर्मचाऱ्यांना सदनिका हस्तांतरित करण्याचा सोहळा नुकताच पार पडला. त्यावेळी जाधव यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. पौड रस्त्यावरील वनाज कंपनी जवळपास साऱ्या पुणेकरांना परिचित आहे. सुरुवातीला व्हॉल्व्ह आणि त्यानंतर गॅस सिलेंडरचे रेग्युलेटर तयार करण्याचे काम या कंपनीत चालत असे. प्रारंभी मुंबईत सुरू झालेली ही कंपनी साधारणत: ६०-६५ च्या दरम्यान पुण्यात प्रवेश करती झाली. सुरुवातीला काही कामगार-कर्मचाऱ्यांना मुंबईहून पुण्यात आणण्यात आले. मात्र, कंपनीचे मालक एस. के. खांडेकर यांनी या लोकांची राहण्याची सोय कंपनीपासून अगदी हाकेच्या अंतरावर केली. सुरुवातीला चाळीत राहणाऱ्या या लोकांना नंतर कंपनीचीच काही जागा देऊन त्यांच्यासाठी वनाज कॉलनी उभी केली. कालांतराने १९८७ च्या आसपास कंपनीची परिस्थिती

 

खालावली. कंपनी आर्थिक अडचणीत असताना कामगारांनी मात्र व्यवस्थापनाला सहकार्याचीच भूमिका घेतली आणि पगार निम्म्यावर करण्यास संमती दिली. एवढेच नव्हे तर आठवडय़ातला एक वार विनावेतन काम केले.
कामगार कर्मचाऱ्यांच्या नावावर कर्जे काढून बँक बुडविल्याचे प्रकार सुवर्ण सहकारी बँकेसारख्या ठिकाणी घडल्याचे आपण पाहतो. मात्र त्या काळात वनाजमधील कर्मचाऱ्यांनी आपल्या कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी स्वत:च्या पगारावर कर्जे काढून दिली. कामगार आणि मालकांचे संबंध एवढे सौहार्दाचे असल्याचे उदाहरण विरळाच म्हणावे लागेल. याच मालकाने त्याची जाणीव ठेवून शेवटपर्यंत कामगारांचे हित पाहिले आणि आज तेच कामगार घराचे मालक बनविण्यामध्ये कंपनीच्या मालकाचा मोलाचा वाटा होता.
कंपनीतील जवळपास १७६ कामगार कंपनीच्या पाठीमागे असलेल्या आवारात राहात होते. सुरुवातीला चाळीत राहणाऱ्या या कामगारांना ७४ च्या आसपास छोटेखानी घरे बांधून देण्यात आली. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी पुन्हा या कॉलनीच्या पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या कामगारांना या आवारात ही घरे बांधून देण्यात आली. त्यामध्ये जाधव यांच्यासारखेच सर्व लोक होते. तुकाराम बाबुराव गुरव यांनाही मुंबईतून पुण्यात बदलण्यात आले. यांनाही या वेळी घर मिळाले. या सर्वामध्ये आनंदी ठरले किसन वनाजी सातपुते. ७९ वर्षांचे सातपुते हस्तांतराच्या कार्यक्रमाच्या वेळी पत्नी आणि दोन मुलांसह किल्ल्या घेण्यासाठी सर्वात प्रथम मंचावर आले आणि समस्त कामगार कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या टाळ्यांच्या गडगडाटात त्यांचे जोरदार स्वागत झाले.
सातपुते पूना ट्रान्स्पोर्टमध्ये हमाली करीत असत. अशाच कामानिमित्त ते वनाजमध्ये सातत्याने येत होते. त्यावेळी ओळखीने त्यांनी आपल्या एका मुलाला कंपनीच्या गाडीवर चालकाची नोकरी मिळवून दिली आणि त्या मुलाची राहण्याची सोय वनाज कॉलनीत झाली. त्यानंतर त्यांनी आणखी एक घर त्या कॉलनीत घेतले आणि आज या पुनर्विकसित इमारतीत सातपुतेंना जवळपास १७५० चौरस फुटांची सदनिका मिळाली. आयुष्यात केलेल्या मोलमजुरीचं आणि कष्टाचं चीज झालं होतं.
या कॉलनीच्या पुनर्विकसनाचा प्रकल्प हा तमाम सोसायटय़ांना एक आदर्श ठरावा असाच आहे. व्यवस्थापनाचा पुढाकार आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची जिद्द आणि लोकप्रतिनिधींचे सहकार्य या त्रिसूत्रीच्या जोरावर ही योजना पुरी झाली. संघटनेचे नेते आणि वनाज हौसिंगचे अध्यक्ष बाळकृष्ण तारी यांची जिद्द आणि अथक प्रयत्न यातूनच हे वास्तुशिल्प साकारलं आहे.
या कॉलनीच्या पुनर्विकासासाठी बिल्डरची निवड करताना अत्यंत पारदर्शक प्रक्रिया राबविण्यात आली. २१ निविदांपैकी ३ निविदा निवडून त्यातील एकाला काम देण्यात आले. होम डेव्हलपर्स यांनी ही जबाबदारी पार पाडली. ‘या प्रकल्पा संदर्भात मी जेव्हा तपशिलासाठी खांडेकर साहेबांशी बोलायला गेलो तेव्हा त्यांनी मला एकच सांगितले की, वनाजचे हे १७६ कामगार ही माझी १७६ मुलं आहेत आणि त्यांची घरं चांगल्या दर्जाची आणि त्यांना उत्तम सुविधा देणारी अशीच बांधा असे त्यांनी सांगितल्याची आठवण होम डेव्हलपर्सचे प्रकाश जोशी यांनी या वेळी सांगितली. श्री. खांडेकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र तारी यांनी हा संपूर्ण प्रकल्प त्यांच्या चरणी अर्पण केला. कामगारांच्या श्रमावर मोठं होऊन त्यांना सोयीस्करपणे विसरले जात असल्याच्या या जमान्यात खांडेकरांच्या दातृत्वाला सलाम केला पाहिजे.
त्यांनी कामगाराला मालक करून एक वेगळा पायंडा पाडला आहे, ही स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्याम देशपांडे यांची प्रतिक्रिया या संदर्भात बोलकी होती.
प्रतिनिधी