Leading International Marathi News Daily
रविवार, २२ मार्च २००९

परिश्रमातून आनंद
दशमातील गुरू-राहू सहयोग प्रतिष्ठेचं कवच आहे. पंचमातील शनी प्रयत्नांचा आधार आहे. यातून कार्यपथावरून स्वाभिमानाने सफर सुरू ठेवता येते. परंतु व्ययस्थानी रवी-शुक्र, त्यात बुधाचा होणारा प्रवेश यामुळे मधूनमधून येणाऱ्या छोटय़ा छोटय़ा अडचणींमुळे सफर अडखळली तरी विचलित होऊ नका. शनिवारच्या चंद्र- नेपच्यून शुभयोगापर्यंत सार्थकी परिश्रमाचा आनंद मिळवता येईल.
दिनांक : २२ ते २५ शुभकाळ.
महिलांना : संधी साधा, सफलता मिळेल.

प्रगतीचा आलेख उंचावेल
भाग्यात गुरू-राहू, दशमात मंगळ, लाभात शुक्र-रवी आणि रविवारचं बुध राश्यांतर प्रगतीचा आलेख उंचावत नेणाऱ्या ग्रहस्थितीची प्रचीती शनिवारच्या चंद्र-नेपच्यून शुभयोगापर्यंत येतच राहणारी आहे. गुढीपाडवा अभिनव कार्याचा श्रीगणेशा करण्यास उपयुक्त आहे. नोकरीचे प्रश्न सुटतील. व्यापारात बस्तान बसेल. बुध-हर्षल युती कागदपत्रातून लाभ देते. लॉटरीची तिकिटे घेऊन बघा. चतुर्थातला शनी सध्यातरी त्रासाचा नाही.
दिनांक : २२ ते २६ प्रगतीचा काळ.
महिलांना : आप्तांच्या भेटी होतील.

आगेकूच सुरू राहील
पराक्रमी शनी, भाग्यात मंगळ, दशमात सूर्य-शुक्र यांचे परिणाम रविवारच्या बुध-राश्यांतरातून व्यापक होत राहतील. शुक्रवारचा गुढीपाडवा अविस्मरणीय घटनांचा ठरावा. बुध-हर्षल युतीमुळे अनपेक्षितच समस्या सुटत राहतील. कार्यमार्ग निर्वेध होत राहतील. शनिवारच्या चंद्र-नेपच्यून शुभयोगापर्यंत आगेकूच अशीच सुरू राहील. गुरू-राहू सहयोग धर्मकार्यातून नवी स्फूर्ती देणार आहे. व्यापारात भरभराट होईल. नवे अधिकार हाती येतील.
दिनांक : २३ ते २७ शुभकाळ
महिलांना : प्रयत्नांमुळे यश मिळेल.

निर्णय कृतीत उत्साह
रविवारी बुधाचं राश्यांतर होत आहे. गुरू-राहूचं सहकार्य मिळेल आणि शनी-मंगळाच्या अनिष्टतेचे दडपण कमी होईल. त्यामुळे निर्णय घेऊन कृती करण्यात उत्साह राहील. शनिवारच्या चंद्र-नेपच्यून शुभयोगापर्यंत यशही मिळवाल. श्रीमारुतीची उपासना, आराधना मन:शांतीचा आधार ठरणारी आहे. स्थगित योजनांना मार्ग सापडतील. व्यापारातून अर्थप्राप्ती वाढेल. राजकीय शक्ती व्यापक होत राहील.
दिनांक : २२, २६, २७, २८ शुभकाळ.
महिलांना : परिश्रमातून यश मिळेल.

मृगजळच अधिक
साडेसातीमधील सध्याचा काळ अधिक वादग्रस्त घटनांचा आणि व्यवहारात परीक्षा घेणारा आहे. प्रयत्न, धावपळ, हुशारी, कल्पकता सर्वकाळी कधी कधी येऊन थांबते. मृगजळाच्या जवळ रविवारच्या बुध- राश्यांतरापासून मति गुंग व्हावी अशाही काही घटना प्रत्ययास येऊ शकतील. तरीही देवावर भरवसा ठेवून कार्यक्रम, उपक्रम सुरू ठेवा. गुढीपाडवा नव्या आशा पल्लवीत करणार आहे. निराश होऊ नका.
दिनांक : २२, २६, २७ शुभकाळ.
महिलांना : वाद नको, प्रकृती सांभाळा.

संवत्सरात शुभ प्रवेश
पंचमात गुरू-राहू, सप्तमात शुक्र-बुधाचा सहयोग रविवारपासून सुरू होईल आणि गुढीपाडव्यातील यशस्वी कार्यक्रमांतून नवीन संवत्सरात हसतखेळत प्रवेश होईल. साडेसातीसमोर मंगळ असल्याने प्रयत्न अधिक करावे लागतील. काही प्रकरणे सामोपचाराने मिटवावी लागतील. शत्रू आणि आरोग्य यावर लक्ष ठेवावे लागेल. तरीही संवत्सरात प्रवेश आणि प्रवास बराचसा यशस्वी ठरणार आहे.
दिनांक : २२, २६, २७ शुभकाळ.
महिलांना : झगडावे लागेल, पण यश मिळेल.

प्रश्नांची गर्दी वाढेल
चतुर्थात गुरू राहू- षष्ठात सूर्य, शुक्र त्यात रविवारी बुधाचा प्रवेश होईल आणि बहुतेक क्षेत्रांत प्रश्नांची गर्दी सुरू होईल, त्यात प्रगतीचे मार्ग अडकतील. तुला व्यक्तींना अशाही परिस्थितीत थोडेफार सहकार्य मिळेल. त्यामुळे पंचमातील शनी आणि लाभातील मंगळाचे मार्ग शोधण्यात मिळणाऱ्या यशामुळे गुढीपाढवा उत्साहाचा ठरणार आहे. संवत्सराच्या अंतरंगातील रूपरेखा निश्चित करता येईल. अपेक्षित टप्पा गाठण्यात विलंब होईल, पण चिंता करू नको.
दिनांक : २३, २४, २५, २८ शुभकाळ
महिलांना : कष्टसाध्य यशाचा ग्रहकाळ आहे.

संवत्सरात प्रसन्न प्रवेश
पराक्रमी गुरू-राहू, दशमात शनी, रविवारपासून सुरू होत असलेला बुध, शुक्र सहयोग यामुळे गुढीपाडवा निश्चितच आनंददायी ठरेल आणि नवीन संवत्सरात उत्साहाने प्रवेश होईल. या ग्रहस्थितीमुळे प्रगतीच्या मार्गाने प्रवासही सुरू होईल. त्यात व्यापारपेठ, राजकारण, कला, साहित्य, शिक्षण आणि विज्ञान प्रांत यांमधील मंडळींना त्याची विशेष प्रचीती दिसून येईल. शनी- मंगळ समोरासमोर असताना गर्दी कितीही असू द्या, पण वाहनांच्या वेगावर मात्र अवश्य नियंत्रण ठेवा. याबाबत हयगय करू नका. तसेच
प्रवासात मूल्यवान वस्तू सांभाळा. संवत्सरात तुमचा प्रवेश प्रसन्नतेने होईल.
दिनांक : २२, २६, २७ शुभकाळ.
महिलांना : नेत्रदीपक यश मिळवून कला, साहित्य, समाजकार्यात चमकाल. तुमचे कार्यकर्तृत्त्व उजळून निघेल.

शुभचिन्हांची प्रचीती
द्वितीयात गुरू- राहू सहयोग, भाग्यात शनी, पराक्रमी मंगळ यांच्यामुळे धनू व्यक्ती भराभर समस्या सोडवून नवीन योजनांची रूपरेखा तयार करून गुढीपाडव्यापासून नवीन संवत्सरात प्रवेश करतील. आणि निर्णय घेऊन कृती सुरू होणारा बुध, शुक्र सहयोग, प्रपंच प्राप्ती, व्यवसाय, अभिनव उपक्रम यामध्ये प्रगतीची प्रासाद चिन्हांचा प्रत्ययकारी ठरणारा आहे. प्रकृतीची पथ्ये मात्र सतत सांभाळा. प्रकृतीबाबत हयगय नको.
दिनांक : २२ ते २५ शुभकाळ
महिलांना : निर्णय अचूक ठरतील आणि अपेक्षित यश मिळेल.

प्रवेश सफल होईल
राशीस्थानी गुरू- राहू, रविवारी सुरू होणारा बुध-शुक्र सहयोग हीच ग्रहस्थिती गुढीपाडव्याच्या उपक्रमात साथ देईल आणि संवत्सरांतील प्रवेश सफल करील. यंदाचा गुढीपाडवा आनंद देणारा ठरेल. या ग्रहस्थितीत तुमचा उद्योग भरभराटीला येईल. अधिकारी तुम्हाला हवी तेथे बदली देतील. मंगलकार्ये ठरतील. जागेचा प्रश्न सुटेल, समाज मंडळी योजनांमध्ये सहभागी होतील. बुध, हर्षलाची युती झटपट व्यवहार पूर्ण करण्यास उपयुक्त ठरते. लॉटरीची तिकिटे घेऊन बघा. अष्टमात शनी आहे. स्पर्धेच्या कोणत्याही प्रलोभनात फसू नका.
दिनांक : २३ ते २७ शुभकाळ.
महिलांना : प्रयत्न करा मार्ग सापडतील, नेत्रदीपक यश मिळेल.

यशस्वी पदार्पण
रविवारपासून सुरू होत असलेला बुध- शुक्र सहयोग, मीन सूर्य, सप्तमात शनी यांच्यातून महत्त्वाची प्रकरणे मार्गी लागतील. नवीन उपक्रमांचा गुढीपाडव्याचा आरंभ थाटात करता येईल आणि नवा यशकलश हाती घेऊन नवीन संवत्सरांत प्रवेश करता येईल. व्ययस्थानाचा गुरू, राहू धर्मकार्यात आनंदाचा ठरतो. सरळ व्यवहारात त्रास देत नाही, परंतु मंगळ, शनी समोरासमोर असताना प्रकृती आणि खर्च, आरोग्य या संबंधात दुर्लक्ष नको. मंगलकार्ये आनंदात पूर्ण करू शकाल.
दिनांक : २४ ते २८ शुभकाळ.
महिलांना : प्रपंच, समाजकार्ये, सांस्कृतिक उपक्रम यात आपण आघाडीवर राहाल.

उत्साह राहील
रविवारी राशीस्थानी बुध- शुक्र सहयोग सुरू होत असून, गुरू, राहू लाभात आहेत. त्यातून गुढीपाडवा प्रसन्न घटनांचा ठरेल. संवत्सरांतील प्रवेशात प्रचंड उत्साह राहील. अचानक नवे प्रगतीचे मार्ग निर्वेध होऊ लागतील. त्यात बुध, हर्षल युतीचा सहभाग मोठा राहील. शनी- मंगळ अनिष्ट असल्याने टपून बसलेले शत्रू, ऐनवेळी येणाऱ्या अडचणी आणि वाढते खर्च यांचा बंदोबस्त चोख ठेवला, तर संवत्सरांतील काही योजना गाजवता येतील. संयम मात्र सोडू नका. संयमाने वागा.
दिनांक : २२, २६, २७, २८ शुभकाळ.
महिलांना : श्रेष्ठत्व सिद्ध करणारे संवत्सर.