Leading International Marathi News Daily शनिवार, २८ मार्च २००९
  फिरती जिद्द
  लंबक
  ब्लॉग-बंध
  विज्ञानमयी
  ‘टीनएजर्स’च्या पालकांसाठी
  चिखलातून उमललेलं कमळ
  पालवीला फळ धरतंय...
  डॉ. लोहियांची महिलानीती
  प्रदर्शनं भरवूया
  खरी जीत
  बालसाहित्याचा मागोवा
  गॉसिपमध्ये पुरुष आघाडीवर
  जन्म आणि मरण
  प्रतिसाद
  वसंत..
सहाव्या मजल्यावरचा!
  अवघे धरू सुपंथ
  पाकिस्तानी शाळकरी मुलीची दैनंदिनी
  कॉर्न पॅलेस

समानतेसाठी आम्ही!
स्त्री-पुरुष समानतेसाठी मी स्वत: काय करतो/ करते? लिंगविशिष्ट भूमिकांना मी चिकटून राहत नाही, लिंगभेद मानत नाही, हे आपण स्वत: कोणत्या कृतींतून व्यक्त करता? तुमचे स्वानुभव कमाल १५० शब्दांत १७ मार्चच्या आत लिहून कळवा. हे आवाहन महिला आणि पुरुष दोघांसाठीही आहे. मात्र प्रत्यक्षात अनुभव असा आहे की अशा आवाहनांना पुरुषांचा प्रतिसाद ३३ टक्के सोडाच, पण जेमतेम ३ टक्केही मिळत नाही. हे प्रमाण वाढावे, अधिकाधिक वाचकांनी स्वत:तील बदलाचे चाकोरीबाहेरचे ठोस दाखले प्रांजळपणे द्यावेत, ही अपेक्षा. घरातील मुला-मुलींना, महिलांना समानतेची वागणूक मिळावी, यासाठी तुम्ही स्वत: काय करता, हे स्पष्टपणे मांडणे अपेक्षित आहे. निवडक लेखनाला प्रसिद्धी दिली जाईल. आपले स्वानुभव कागदाच्या एकाच बाजूला सुवाच्य अक्षरात लिहून पाठवा.
पत्ता- ‘समानतेसाठी आम्ही’, चतुरंग पुरवणी, लोकसत्ता संपादकीय कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉईंट,
मुंबई ४०००२१.

 

रेल्वेच्या गर्दीत अवजड टोपली सांभाळत, प्रवासी बायकांचे टोमणे आणि पोलिसांचा त्रास सहन करत फिरणाऱ्या फेरीवाल्या आपला माल घेण्याचा आग्रह करीत दिवसाचे बारा ते चौदा तास फिरत असतात. या साऱ्यासाठी त्यांना मनाची, शरीराची किती शक्ती लागत असेल, याचा विचार आपण कधी करतो का? कुठून येते त्यांच्यात ही जिद्द आणि परिस्थितीशी लढण्याची ऊर्मी?
काहीजणी लांब अंतरांवर जाणाऱ्या ट्रेन पकडतात. कारण जितके अंतर लांब, तितके प्रवाशी जास्त, असा त्यांचा रोखठोक हिशोब असतो. रोजच्या बांधलेल्या गिऱ्हाईकांसाठी काहीजणी ठराविक ट्रेन पकडतात. प्रत्येकीची विशिष्ट स्टेशनपासून ते विशिष्ट स्टेशनपर्यंतची हद्द ठरलेली असते. एकाच स्टेशनवरच्या दोन भेळवाल्या, ‘तू पुढचा लेडीज मार, मी मागचा लेडीज मारते’, अशी सरळसोट वाटणी करतात तेव्हा त्यांनी सर्वासाठी स्वत:वर घालून घेतलेले नियम पाहून थक्क व्हायला होतं!
माटुंगा रेल्वेस्थानक, दुपारी ११ ची वेळ. नेहमीच गर्दीने भरलेल्या या स्थानकावर, रेल्वेमधून वस्तू विक्री करणाऱ्या फेरीवाल्या बाईपुढे मी रेल्वे फलाटावर मांडी घालून बसलेले होते. ट्रेन पकडण्याच्या तयारीत असणारी माणसे जरा संशयाने व कुतूहलाने

 

आपली ट्रेन येईपर्यंत आमच्या आजूबाजूला घुटमळत होती व ३० वर्षे ट्रेनमधून वस्तू विकण्याचा अनुभव असलेली ‘लक्ष्मीबाई’ पटापट फरसाणचे पॅकिंग करीत माझ्याशी गप्पा मारीत होती. व्यवसायातला नफा, रोजचा धंदा, अडचणी यांसारखे विषय झाल्यावर जेव्हा मी तिला विचारलं, ‘‘तू या धंद्यात समाधानी आहेस का? तुला आनंद मिळतो का? हा धंदा आवडतो का?’’ तेव्हा ती थबकली आणि मूकपणे रडायला लागली. ‘‘अवो ताई, मी इतकी र्वस धंदा करतीये, पण मी सुखी हाय का? आनंदी हाय का? असं आजपर्यंत कुनी मला इचारलंच नाही हो!’’
तिच्या त्या एका उत्तराने मला तिच्यासारख्या समस्त फेरीवाल्यांच्या जीवनातील उपेक्षेकडे पाहायला भाग पाडलं.
दादरला कॉलेज असल्याने दररोज दोन तास ट्रेनचा प्रवास करताना या फेरीवाल्या भेटत गेल्या. त्यांच्याकडून क्लिपा, भेळ घेताना हसून दोन वाक्यं बोलली जाऊ लागली. त्याही स्वत:हून येऊन, आपुलकीने आपल्या आयुष्यातील छोटय़ा-मोठय़ा गोष्टी सांगू लागल्या. टरह (मास्टर इन सोशल वर्क) करायला पुण्याला गेल्यावर जेव्हा संशोधनासाठी विषय निवडायचा होता, तेव्हा ही ट्रेनमधून वस्तूंचा बोजा उचलत, गर्दीतून मार्ग काढत वस्तू विकणाऱ्या माझ्या फेरीवाल्या मैत्रिणी डोळ्यासमोर आल्या व वाटलं यांचे कष्ट, यांचं आर्थिक, सामाजिक जीवन, त्यांच्या अडचणी, गरजा किती दुर्लक्षित आहेत आणि ठरवलं की यावरच संशोधन करायचं.
‘मुंबई शहरातील लोकल ट्रेनमधून किरकोळ वस्तू विक्री करणाऱ्या स्त्रियांचा सामाजिक व आर्थिक अभ्यास’ असा विषय मी निवडला. १३० प्रश्नांची विस्तृत प्रश्नावली बनवून, प्रातिनिधिक ५० फेरीवाल्यांची मुलाखत घेतली. त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्यांशी संवाद साधला. या सगळ्या प्रक्रियेत एक वेगळेच अनुभवविश्व माझ्यापुढे उलगडले गेले. या संशोधनाच्या माध्यमातून ट्रेनमधल्या फेरीवाल्यांचं जे समृद्ध माणूसपण माझ्या वाटय़ाला आलं, त्याबद्दल त्या सर्वाची मी आभारी आहे.
सकाळपासून रात्रीपर्यंत या फेरीवाल्यांसोबत फिरताना, त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधताना, त्यांचे आयुष्य जवळून निरखताना प्रामुख्याने जाणवलेली गोष्ट म्हणजे- माणूस म्हणून जगताना आवश्यक असणारी सुरक्षितता कुठल्याच प्रकारे यांना अनुभवायला मिळत नाही. मग ते व्यावसायिक, सामाजिक किंवा वैयक्तिक पातळीवरचं जगणं असो, त्यांच्या वाटय़ाला केवळ कष्ट, उपेक्षा व अनिश्चितता!

ट्रेनमधील फेरीवालीचा व्यवसाय निवडणाऱ्या बायका या प्रामुख्याने १८ ते ४० या वयोगटातील आहेत. यातील अध्र्याहून अधिक फेरीवाल्या या धारावीच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या आहेत. त्या खालोखाल जवळजवळ २५ टक्के फेरीवाल्या या मुंब्रा व कळवा भागांत डोंगरउतारावर रेल्वेलाइनच्या कडेने वसलेल्या झोपडपट्टय़ांमध्ये राहतात. या फेरीवाल्यांमध्ये मराठी भाषक स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. त्यानंतर पारधी, लमाणी, गोसावी, कैकाडी अशा भटक्या जमातीतील व मागासवर्गीय स्त्रियाही मोठय़ा प्रमाणात आहेत. यांच्यातील सुमारे ५० टक्के स्त्रिया या विवाहित आहेत. प्रत्येकीच्या घरात खाणारी तोंडं पाच ते सात आहेत. नवऱ्याची बेरोजगारी, व्यसनाधीनता किंवा हंगामी कामाचे अनिश्चित उत्पन्न यामुळे या स्त्रिया केवळ नवऱ्याच्या कमाईवर अवलंबून राहू शकत नाहीत. अगदी सुरुवातीला या व्यवसायात आलेल्या स्त्रियांनी अनुभव घेऊन आपल्या नात्यातील स्त्रिया व शेजारी स्त्रियांना या व्यवसायात मदत केल्याची बरीच उदाहरणे सापडतात. म्हणून या व्यवसायात प्रामुख्याने स्त्रिया अधिक आढळतात.
यातल्या बहुसंख्य फेरीवाल्यांनी ‘पैसे मिळविण्याचा केवळ एकच पर्याय’ म्हणून हा व्यवसाय निवडला आहे. त्यामागची कारणं ही निरक्षरता, मोठय़ा कुटुंबाची आर्थिक जबाबदारी, विधवा किंवा परित्यक्ता असल्याने स्वत:चे पोट भरण्याची गरज अशी आहेत. आंध्र प्रदेशातून आलेल्या एका फेरीवालीने तिचा नवरा नीट कमवत नसल्याने पोटच्या चार पोरांना पोटभर खायला देता यावे, शिकून मुलांच्या आयुष्याची घडी बसावी, म्हणून आपण व्यवसाय करीत असल्याचं सांगितलं. शिक्षण घेतलं नसल्यामुळे स्वत:चं आयुष्य उद्ध्वस्त झालं, आता हा धंदा सुटला तर भीक मागून का होईना, पण मी माझ्या मुलांना शिकवेन, ही तिची जिद्द!
या पाहणीदरम्यान स्वत:च्या हिमतीवर मुलांना दहावी-बारावीपर्यंत शिकविणाऱ्या फेरीवाल्या मला भेटल्या. तसंच जबरदस्तीने, आर्थिक ओढाताणीने शाळा सोडून व्यवसायात आलेल्या चिमुरडय़ा पोरीही नजरेस पडल्या. अकरा वर्षांची सोनू ही त्यातलीच एक. ती ट्रेनमध्ये बांगडय़ा-कानातले विकते. इयत्ता तिसरीमध्ये असताना आईने जबरदस्तीने शाळेतून काढून या व्यवसायात आणलं. सोनूला धंदा करायला आवडत नाही. तिला तिची शाळा आवडते, पण ती शाळेत जाऊ शकत नाही. कारण तिला दर दिवशीचे ठराविक पैसे घरी द्यावेच लागतात. एखाद्या दिवशी धंदा कमी झाला, धंद्यात काही चूक झाली तर आई-वडील मारतात, शिव्या देतात. कधी तरी कुणीच माल विकत घेतला नाही तर आई गालावर चटके देते.
ट्रेनमधून फेरीवाल्यांचा व्यवसाय कराव्या लागणाऱ्या महिलांमध्ये जवळजवळ २० टक्के मुली या अल्पवयीन म्हणजे १५ वर्षांच्या आतीलच आहेत. कौटुंबिक दबाव, व्यवसायातील प्रतिकूलता, कौटुंबिक अत्याचार या सर्व बाबी सांभाळूनही यातल्या काही मुली स्वत:च्या हिमतीवर शिक्षण घेऊन व्यवसाय सांभाळत आहेत. उदा. १० वर्षांच्या सुनयनाला वडिलांची बेरोजगारी व गरिबी यामुळे या व्यवसायात यावे लागले. परंतु तिने शाळा सोडली नाही! १२ ते ५ शाळेत जाऊन मग ती ट्रेनमध्ये ‘माळा’ विकायला येते. रात्री १० पर्यंत धंदा करताना तिच्या पोटात फक्त शाळेत पौष्टिक अन्न म्हणून मिळणारी खिचडी असते. ट्रेनमधून फिरताना खूप भूक लागते, पण पैसे वाचविण्यासाठी ती काही खात नाही. घरी गेल्यावर दारू पिऊन आलेल्या वडिलांची रोजची मारहाण सहन करणे, वडिलांनी घराबाहेर काढल्यास ते झोपेपर्यंत घराबाहेर उभे राहणे हा तिचा रोजचा दिनक्रम असूनही सुनयना शाळा चुकवत नाही. इतक्या लहान वयात या पोरींना ‘निरागस बालपण’ अनुभवण्याचा हक्क मिळू नये व घराचं कर्तेपण अंगावर घ्यावं लागावं, ही केवढी शोकांतिका!
फेरीवाल्या स्त्रियांचा दिनक्रम पाहिला की नकळतच मनात ‘रतन कृष्णांची’- ‘स्त्रियांची पहाट घंटा, दोन घंटा आधीच होते’ हे सांगणारी त्यांची ‘पहाट’ कविता आठवते. सकाळी उठून घरची कामे करणे, जेवण बनवणे, घरातून बाहेर पडल्यावर माल आणण्यासाठी दादर, सायन, वाशी येथील ठेकेदार यांच्याकडे जावे लागते. प्रत्येक दिवशी माल भरून घेणे व त्या दिवसात तो जास्तीत जास्त संपवणे व पुन्हा दुसऱ्या दिवशी नवीन माल भरणे ही या व्यवसायातील पद्धत आहे. त्यामुळे प्रत्येक फेरीवालीचे दोन तास हे माल आणण्यातच जातात. माल घेऊन आल्यावर फरसाण, केळा वेफर्स, सामोसे यांसारख्या किलोच्या मापात घेतलेल्या खाद्यवस्तू असतील तर या वस्तूंचे वाटे करून त्यांचे पॅकिंग करावे लागते. त्यानंतर त्यांच्या धंद्याला सुरुवात होते. दिवसाचे अपेक्षित उत्पन्न कमावण्यासाठी बहुसंख्य बायकांना सहा ते दहा तास काम करावे लागते. दिवसातील अकरा ते पंधरा तास व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांची संख्या सुमारे ३२ टक्के आहे. काही स्त्रिया अधिक उत्पन्नासाठी आठवडय़ातून एकही दिवस न वगळता रोज व्यवसाय करण्यास घराबाहेर पडतात. रात्री जास्तीत जास्त अकरा ते साडेअकरापर्यंत या बायका व्यवसाय करतात.
प्रत्येकीच्या भांडवलावर, ट्रेनच्या संख्येवर व ती विकत असलेल्या वस्तूवर तिचे दिवसाचे उत्पन्न व नफा ठरतो. तीनशे ते पाचशे रुपये रोजचे भांडवल गुंतवणाऱ्या फेरीवाल्यांना दिवसाचा नफा पन्नास ते शंभर रुपये इतका होतो. दिवसाला दीडशे ते दोनशे रुपये नफा मिळविणाऱ्याही फेरीवाल्या आहेत, परंतु खर्च जास्त असल्याने बचत करण्याचे प्रमाण वस्तुविक्री करणाऱ्या स्त्रियांमध्ये अत्यल्प आहे.
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये अध्र्याहून अधिक फेरीवाल्या या स्त्रियांची प्रसाधने विकतात. उदा. क्लिपा, नेलपॉलिश, माळा, हेअरबँड्स, मंगळसूत्र, कानातले, अंगठय़ा इत्यादी. ३२ टक्के फेरीवाल्या या भेळ, चिवडा, केळावेफर्स, समोसे, चिक्की, दाणे किंवा खमण ढोकळा यांसारखे खाद्यपदार्थ विकतात. प्रसाधन विक्रीत माल भरणे सोपे व मालाचे नुकसान होण्याची भीती नाही म्हणून आम्ही हा व्यवसाय निवडल्याचे मला अनेकजणींनी सांगितले.
माझ्या फेरीवाल्या मैत्रिणींच्या भाषेत सांगायचं, तर ‘धंदा करण्यासाठी कुठली ट्रेन मारायची’ याची प्रत्येकीची वेगळी गणितं असतात. खूपदा फेरीवाल्यांना कमी गर्दी असलेली ट्रेन सोयीची वाटते. कारण त्यातून वस्तू विक्री करायला जागा तरी मिळते. काहीजणी लांब अंतरांवर जाणाऱ्या ट्रेन पकडतात. कारण जितके अंतर लांब तितके प्रवासी जास्त, असा त्यांचा रोखठोक हिशोब असतो. रोजच्या बांधलेल्या गिऱ्हाईकांसाठी काहीजणी तर ठराविक दादर, कल्याण, ठाणे अशा ट्रेन पकडतात. प्रत्येकीची विशिष्ट स्टेशनपासून ते विशिष्ट स्टेशनपर्यंतची हद्द ठरलेली असते. एकाच स्टेशनवरच्या दोन भेळवाल्या, ‘तू पुढचा लेडीज मार, मी मागचा लेडीज मारते’ अशी सरळसोट वाटणी करतात, तेव्हा त्यांनी सर्वासाठी स्वत:वर घालून घेतलेले नियम पाहून थक्क व्हायला होतं! जास्तीतजास्त जणी आपल्या ठराविक हद्दीत म्हणजे माटुंगा ते चिंचपोकळी, मुलुंड ते विद्याविहार, कुर्ला ते करी रोड, कल्याण ते ठाणे या स्टेशनच्या दरम्यान सुमारे २० ते ३० ट्रेनमधून धंदा करतात.
घरून निघाल्यावर सहा ते सात तासांनी थोडासा रिकामा वेळ मिळाला, अपेक्षित कमाईतली अर्धी रक्कम जमली की या बायका छोटय़ा गटामध्ये रेल्वे फलाटावरच बसून जेवण उरकून घेतात. कामाचे प्रदीर्घ तास, घरातील इतर कामांच्या जबाबदाऱ्या यामुळे त्यांच्या स्वत:च्या जेवणाकडे त्यांचे दुर्लक्ष होते. प्रत्येकीला डबा आणणे जमतेच असे नाही. मग त्यांच्यापैकी काहीजणी भजी-पाव, उसळ-पाव असे कमी खर्चात स्टेशनवर मिळणारे पदार्थ खाऊन अख्खा दिवस त्यावर रेटून नेणाऱ्या आहेत.
‘जास्त पैसे देऊन पौष्टिक तरी खा’, म्हटलं की त्या माझ्या मध्यमवर्गीय दृष्टिकोनाला बिनधास्त हसतात आणि एकमेकीला टाळी देत मला सुनवतात, ‘‘ताई, तुम्हाला नाही कळणार ते. अवो माझ्या एकटीवर इतके पैसे खर्च करण्यापेक्षा, माझ्या घरच्यांसाठी रात्रीची पालेभाजी नेईन, त्या पैशातून..’’
घरच्यांची इतकी पर्वा करणाऱ्या या फेरीवाल्या कौटुंबिक पातळीवर मोठय़ा प्रमाणात अत्याचार सहन करतात. ६८ टक्के स्त्रियांना नवऱ्याची दारू पिऊन होणारी मारहाण सहन करावी लागते. ४० टक्के स्त्रियांना कुटुंबांकडून हा व्यवसाय करण्यास पाठिंबा नाही. पतीचा संशयी स्वभाव व प्रतिगामी दृष्टिकोन, कुटुंबाची अप्रतिष्ठा अशी कारणे त्याच्या मुळाशी आहेत. अनेक फेरीवाल्यांना रात्री घरी गेल्यावर दिवसभराची पूर्ण कमाई नवऱ्याकडे द्यावी लागते. काही वेळा नवऱ्याच्या मारहाणीमुळे अंग दुखत असल्याने २ ते ३ दिवस घरी राहावे लागते व धंदा बंद राहिल्याने पूर्ण कुटुंबाला उपासमार सहन करावी लागते. अशा कौटुंबिक परिस्थितीत जगणाऱ्या फेरीवाल्यांचे व्यावसायिक जीवनही तितकेच असुरक्षित आहे. ४८ टक्के महिलांनी विक्री करताना अपघाताचा अनुभव घेतला आहे. अध्र्याहून अधिक फेरीवाल्या चालत्या ट्रेनमधून पडलेल्या आहेत. २३ टक्के स्त्रियांना मणक्याला मार लागणे, फ्रॅक्चर, पडल्यामुळे गर्भपात यांसारख्या गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. दिवसाचे प्रदीर्घ तास गर्दीने भरलेल्या ट्रेनमधून उभ्याने वस्तू विकून पायदुखी, कंबरदुखी, अशक्तपणा, चक्कर येणे यांसारख्या आरोग्याच्या समस्या, मालाच्या जड वजनाप्रमाणे प्रत्येकीच्या डोक्यावर कायमच्या चिकटलेल्या आहेतच.
फेरीवाल्या स्त्रियांना सर्वात जास्त त्रास होतो, तो ‘सन्माननीय रेल्वे पोलिसांचा’. माझ्या संशोधनाच्या सुरुवातीला फेरीवाल्या माझ्याशी बोलायला घाबरायच्या. ‘‘तुम्ही पोलिसांकडून, पेपरमधून तर आला नाहीत ना? नाही तर आम्ही काही तरी तुम्हाला सांगायचो आणि उद्या पोलीस आम्हाला धरायचे’’, ही त्यांना जाणवणारी दहशत सतत जाणवायची. यामुळेच ८४ टक्के फेरीवाल्यांना वाटते की आपल्या मुलांनी या व्यवसायात येऊ नये. आपण जे त्रास, कष्ट, अपमान या व्यवसायामुळे सहन केले, ते आपल्या मुलांना परत अनुभवायला मिळू नये. फोटो काढण्यासही त्यांचा ठाम नकार असायचा. कारण फोटो छापला तर तो ओळखून पोलिसांनी ठरवून केस टाकणे, मारहाण करणे यांसारख्या घटना त्यांना नेहमीच्या होत्या.
मला फार जवळून पोलिसांची दादागिरी पाहायला मिळाली. प्रत्येकाकडून हप्ते घेणे, शिव्या देणे, मारहाण करून माल फेकणे, फुकट माल घेणे, खटले दाखल करून फेरीवाल्यांना रेल्वेच्या कोर्टात नेणे, रेल्वेच्या बाकावरही त्यांना बसू न देणे, गुन्हेगारांना पकडण्यासाठी ज्यांना नियुक्त केलं, तेच पोलीस आज फेरीवाल्यांच्या शोषणामध्ये पुढाकार घेत आहेत व शरमेची गोष्ट म्हणजे यात ‘महिला पोलीस’ही तितक्याच सहभागी आहेत. ‘एक दफा गल्लीका गुंडा कम सताएगा पर पोलीस नही’ ही त्यातल्याच एका फेरीवालीची बोलकी प्रतिक्रिया!
प्रत्येक फेरीवाली ही आपापल्या परीने आपल्या कौटुंबिक, व्यावसायिक जीवनात झुंज देतेय. कुणाचा नवरा दारू पिऊन वारलाय व ती आपल्या चार मुलांसाठी मालाने भरलेली पाटी घेऊन ट्रेन बदलतेय, तर कुणी ४ ते ७ वर्षे वयाच्या आपल्या मुलांना स्टेशनच्या ब्रिजखाली बसवून धंद्याला जाते. एखादी सुनयना शाळा करून भुकेल्या पोटाने गर्दी भेदत माळा विकते. कुठून येते ही जिद्द, परिस्थितीशी लढण्याची ऊर्मी? ट्रेनमध्ये बसायला जागा मिळाली नाही की गर्दीला, ट्रेनला मनातल्या मनात नावं ठेवण्याची आपली मध्यमवर्गीय सवय. पण दिवसाचे दहा ते बारा तास या ट्रेनच्या गर्दीत, अवजड टोपली सांभाळत, प्रवासी बायकांचे टोमणे व पोलिसांचा त्रास सहन करत उभ्या-उभ्या फिरायचं. हसतमुखाने आपला माल घेण्याचा लोकांना आग्रह करायचा. या साऱ्यासाठी मनाची, शरीराची किती ताकद लागत असेल, याचा विचार आपण कधी करतो का?
आपल्या बऱ्याचशा गरजा पूर्ण करणाऱ्या या स्त्रियांकडे आपण फक्त एक सामान्य फेरीवाली म्हणून पाहतो, की त्यांच्यातलं माणूसपण समजून घेते व स्वीकारतो? हा प्रत्येकाने स्वत:ला विचारायचा प्रश्न आहे.
(पोलिसांचा व कुटुंबाचा त्रास होऊ नये म्हणून या लेखातील महिलांची नावे बदललेली आहेत.)
सई तांबे
sayucopper@yahoo.co.in