Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
व्यापार-उद्योग

‘क्लाऊड ९’ दोन नव्या स्वादात
व्यापार प्रतिनिधी: भारतातील पहिले नैसर्गिक शक्तिवर्धक पेय म्हणून दावा करणाऱ्या ‘क्लाऊड ९’ या कॅनमध्ये उपलब्ध झालेल्या एनर्जी ड्रिंक्सचे आता डाळिंबानंतर आणखी दोन नवीन स्वाद ‘वाइल्ड बेरी’ आणि ‘रेड ग्रेप्स’ असे नवीन प्रकारात बाजारात दाखल झाले आहेत. मुंबईपाठोपाठ अन्य बडय़ा शहरांतील बाजारपेठांमध्ये विस्तारण्यासाठी कंपनीने आक्रमक बाजार विस्ताराचे धोरण आखले आहे. ग्राहक म्हणून खास युवावर्गाला लक्ष्य करून बाजारात दाखल झालेल्या ‘क्लाऊड ९’ने मुंबईच्या बाजारपेठेत दाखल होताना तीन महिन्यांपूर्वी युवकांची गर्दी असणाऱ्या कॅफेज्, पब्स, मॉल्समध्ये आपल्या ब्रॅण्डच्या जाहिरातींसाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यानंतर एन. एम. कॉलेज तसेच सेंट झेवियर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे अनुक्रमे सुनामी व मल्हार या महोत्सवांमध्ये ‘क्लाऊड ९’चा विद्यार्थ्यांना आस्वाद घेता यावा यासाठी मोफत वितरण करण्यात आले होते. युवावर्गाकडून मिळालेला प्रतिसाद व सूचना लक्षात घेऊन ‘वाइल्ड बेरी’ आणि ‘रेड ग्रेप्स’ हे नवीन प्रकार बाजारात आणले गेले असल्याचे कंपनीचे अध्यक्ष मोहन गणात्रा यांनी सांगितले. भारताचा उत्साही तेज गोलंदाज आर. पी. सिंग याची ब्रॅण्ड अम्बॅसेडर म्हणून केली गेलेली नियुक्ती ही युवावर्गाला साद घालण्याचे उद्दिष्ट समोर ठेवूनच केली गेली असल्याचे गणात्रा यांनी स्पष्ट केले. ‘क्लाऊड ९’चा यूएस-एफडीए प्रमाणित अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प पुण्यानजीक नांदूर येथे २७ एकरच्या परिसरात विस्तारलेला असून त्याची दरसाल चार लाख कॅन्सची उत्पादनक्षमता असल्याचे गणात्रा यांनी पुढे बोलताना सांगितले.

सर्वोत्कृष्ट आयातदार व निर्यादारांचा ‘इंटरनॅशनल ट्रेड अ‍ॅवॉर्ड’ने गौरव
व्यापार प्रतिनिधी : जागतिक व्यापारामध्ये भारताच्या वाढीचा झेंडा रोवणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्यांच्या कर्तृत्वाची दखल घेण्यासाठी डीएचएल आणि सीएनबीसी-टीव्ही १८ यांनी तिसऱ्या इंटरनॅशनल ट्रेड अवॉर्ड २००८-०९ ची घोषणा केली.
पुरस्कारासंबंधी बोलताना सीएनबीसी-टीव्ही १८ च्या स्पेशल प्रोजेक्टस्चे संपादक ए. बी. रवी म्हणाले की, निर्यातकांमध्ये इंटरनॅशनल ट्रेड अवॉर्ड हे हळूहळू मैलाचा दगड म्हणून प्रतिष्ठा मिळवत आहेत. एक जबबदार न्यूज चॅनेल म्हणून सीएनबीसी-टीव्ही १८ निर्यातकांच्या कामाची दखल घेत आहेत, तसेच त्यांचे यश सर्वासमोर आणत आहे. भारतीय निर्यतकांच्या दुर्दम्य प्रेरणेला व व्यावसायिकतेला सलाम करण्यासाठी इंटरनॅशनल ट्रेड अवॉर्ड दिले जातात.
तेजी-मंदीच्या लाटेवर हिंदकळणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढ साध्य करणे, ही यंदाच्या पुरस्कारांची मध्यवर्ती संकल्पना आहे. जगभरातील मंदीच्या स्थितीत भारतातील निर्यातकांनी उल्लेखनीय तग धरला. २००३-०४ सालच्या तुलनेत गेल्या वर्षी भारताचा परदेशी व्यापार १२ टक्क्याने वाढला. अनेक देश मंदीच्या फटक्यामुळे वाढीच्या विरुद्ध दिशेने घसरत असताना भारतातील निर्यातीने मात्र २४ टक्के (डॉलरमध्ये) सरासरी वाढ साध्य केली.

‘ब्रॅण्डहाऊस’ची बाजारात दमदार सुरुवात
व्यापार प्रतिनिधी: एस. कुमार्स समूहातील फॅशन रिटेलर क्षेत्रातील नवीन कंपनी ‘ब्रॅण्डहाऊस रिटेल्स लि.’चे समभाग आज मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात सूचिबद्ध झाले. प्रत्येकी १० रु. दर्शनी मूल्याच्या ५.१९ लाख समभागांचा एनएसईवरील शुभारंभ प्रत्येकी ३३ रुपये या भावाने झाला. एस. कुमार्सची उपकंपनी म्हणून प्रस्तुत करण्यात आलेल्या या कंपनीचे डिमर्जरनंतर स्वतंत्र कंपनी म्हणून सूचिबद्ध करण्याचा निर्णय प्रवर्तकांनी घेतला आणि एस. कुमार्सच्या भागधारकांना हाती असलेल्या प्रत्येक पाच समभागांच्या बदल्यात ब्रॅण्डहाऊसचा एक समभाग प्रदान करण्यात आला आहे. ब्रॅण्डहाऊसकडून सध्याच्या घडीला रिड अ‍ॅण्ड टेलर, बेलमॉन्ट, स्टीफन्स ब्रदर्स, कारमायकेल हाऊस यांच्यासह एस्काडा आणि आल्फ्रेड डनहिल या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डसाठी विशेष विक्री दालने सांभाळली जात आहेत. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तरुण जोशी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मार्च २००९ अखेपर्यंत स्टोअर्सची संख्या ६८३ वर जाईल आणि ढोबळ नफा ३७.८ कोटी रुपयांवर जाईल. तर मार्च २०१० अखेपर्यंत स्टोअर्सची संख्या ९०० च्या पुढे तर एकंदर महसूल ८०० कोटी रुपयांवर आणि निव्वळ नफा २२ कोटी रुपयांवर जाणे अपेक्षित आहे.