Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
अग्रलेख

मतलबी वारे

 

भूगोलात आपण खारे वारे, मतलई वारे, व्यापारी वारे यांच्याविषयी शिकलो, पण मतलबी वारे मात्र राजकारणातच आपल्याला आढळतात. या वेळी मात्र राजकारणात मतलबी वाऱ्यांची वादळेच घोंघावू लागली आहेत. या वाऱ्यांना दिशा कळत नाही. कधी ते बेधुंद होऊन भलत्याच दिशेला वाहतात, तर कधी आकाशात उंच भरारी घेऊन भुईसपाट होतात. त्यांना धोरणांचा पाचपोच नसतो. पक्षबदल पूर्वीही होत असे आणि जनतेच्या दृष्टीने सगळेच आयनॉक्स आणि मल्टिप्लेक्स असत. आता मात्र सगळीकडे मॉल्सचाच सुळसुळाट झाला आहे. परस्पर विरोधी असणारी दोन व्यक्तिमत्त्वेही एकमेकांना मिठय़ा मारायला कमी करत नाहीत. शत्रूचा शत्रू तो मित्र आणि मित्राचा शत्रू तोही मित्रच असे त्रांगडे झाले आहे. लालूप्रसाद यादव आणि रामविलास पास्वान यांच्यातून विस्तव जात नव्हता. दोघेही परस्परांची उणीदुणी काढल्याशिवाय राहात नसत. पास्वान तर भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळात होते आणि काँग्रेसच्याही मंत्रिमंडळात आहेत. कालपर्यंत पट्टली मक्कल कच्छी हा पक्ष केंद्रात सत्तेवर असणाऱ्या संयुक्त पुरोगामी आघाडीचा घटक होता. त्या पक्षाचे नेते डॉ. अंबूमणी रामदास यांनी आरोग्यमंत्री या नात्याने कामही चांगले केले. गुटखा, तंबाखू आणि दारू यांच्याविरुद्ध त्यांनी खंबीर उपाययोजना केल्या. त्यांचे वडील डॉ. एस. रामदास हे पट्टली मक्कल कच्छीचे संस्थापक. संयुक्त पुरोगामी आघाडीशी लोकसभेच्या जागांबाबत चर्चा सुरू असताना मध्येच अचानकपणे या पक्षाने अण्णा द्रविड मुन्न्ोत्र कळघमशी आपण आघाडी करणार आहोत, असे जाहीर केले. तामिळनाडूच्या उत्तरेत लोकसभेच्या किमान दहा जागांवर त्यांचा प्रभाव आहे, असे सांगितले जाते. वन्नियर जातीवर या पक्षाचा वरचष्मा आहे. अण्णा द्रमुकच्या नेत्या जयललिता यांचा तामिळनाडूच्या दक्षिणेत प्रभाव आहे. या आधी २००४ मध्ये पट्टली मक्कल कच्छीने द्रविड मुन्न्ोत्र कळघमबरोबर आघाडी करून लोकसभेच्या सहा जागा पटकावल्या होत्या. गेल्या निवडणुकीत त्यांच्या आघाडीने तामिळनाडूतल्या सर्वच्या सर्व म्हणजे लोकसभेच्या ३९ जागा पटकावल्या होत्या. पुडुचेरीची उर्वरित एक जागाही त्यांनीच जिंकली. तामिळनाडूचे काही वर्षांमधले राजकारण जवळपास द्विपक्षीय आहे. ४२ वर्षांमध्ये काँग्रेस पक्षाचा एकही मुख्यमंत्री तिथे झाला नाही. काँग्रेस नेत्यांनाच आता त्याचे काही वाटेनासे झाले आहे. ३२ वर्षांत एकदा द्रविड मुन्न्ोत्र कळघमच्या आघाडीने तर त्यानंतर अण्णा द्रविड मुन्न्ोत्र कळघम यांनी बाजी मारायची हे ठरल्यासारखेच आहे. या खेपेला द्रमुक आणि त्यांचे नेते एम. करुणानिधी यांची तामिळनाडूच्या राजकारणात कोंडी होऊ लागली आहे. विशेषत: श्रीलंकेतल्या तामिळांच्या प्रश्नावर केंद्र सरकारचा आपण पाठिंबा काढून घेत असल्याची धमकी त्यांना प्रत्यक्षात आणता आलेली नाही. रामदास यांनीही मंत्रिमंडळात राहून या प्रश्नावर कोणतेही भाष्य करायचे टाळले. आघाडीबाहेर पडायचा निर्णय घेतल्यावर प्रथमच त्यांनी या प्रश्नावर काँग्रेसच्या धोरणावर टीका केली आहे. १९९९ ते २००३ पर्यंत त्यांचा पक्ष भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत होता आणि निवडणुका तोंडावर येताच त्यांनी आपल्या इतिहासाला स्मरून त्यांच्या आघाडीशी फारकत घेतली आणि द्रविड मुन्न्ोत्र कळघम बरोबर चर्चा करून लोकसभेच्या सहा जागांवर यश मिळवले. निवडणुकीनंतर बनलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीत द्रमुकबरोबर शिरून त्यांनी मंत्रीपदेही पटकावली आणि आता तेच अजूनही आपली काँग्रेसबरोबर दोस्ती असल्याचे सांगत अण्णा द्रमुक आघाडीत दाखल झाले आहेत. अशा तऱ्हेचे दिशांतर करताना त्यांनी आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत मतदान घ्यायचे नाटक करून स्वत:च्या मतावर शिक्कामोर्तब करवून घेतले. रामदास यांनी केलेला हा पक्षीय खेळखंडोबा नवा नाही. जयललिता यांनीही अशा तऱ्हेच्या तळ्यात-मळ्यातल्या गोष्टी अनेकदा केल्या आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये यापूर्वी जयललितांचा पक्ष आणि त्यांची आघाडी यांचा समावेश होता. आपल्या तालावर ती आघाडी नाचायला तयार होत नाही, असे पाहून त्यांनी आघाडीला भांगडा करायला भाग पाडले आणि ते सरकारही पाडले. आताही जयललिता तिसऱ्या आघाडीत नाहीत, पण त्या निवडणुकीनंतर तिकडे जातील किंवा जाणारही नाहीत. सोनिया गांधी, जयललिता आणि मायावती या तीन महिला नेत्यांचे पक्ष तीन स्वतंत्र दिशांना तोंडे करून उभे आहेत. त्यांचे परस्परांशी जमणे जवळपास अशक्य आहे. पट्टली मक्कल कच्छीने काँग्रेसला हिसका दाखवला तसाच हिसका नवीन पटनाईक यांच्या विजू जनता दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दाखवला. दगाबाजीचाच मापदंड लावायचा तर पटनाईकांना जरा वरची श्रेणी द्यावी लागेल. त्यांनी भाजपला अधिक काळ झुलवत ठेवले आणि त्यांना टाटा केले. त्या आधी ओरिसात झालेल्या कंधमालच्या जातीय दंगलीत असलेल्या बजरंग दलाच्या हिंस्र सेनेविरुद्ध कारवाई करायचेही त्यांनी टाळले. तेच आता जातीयवादाविरोधात आपण लढणार आहोत, असे सांगून डाव्यांना गळामिठी घालायला निघाले आहेत. डाव्या आणि धर्मनिरपेक्ष राजकारणात आपली हयात घालवणाऱ्यांनाही त्यांचा तो बकवास खरा वाटतो आणि भाजपची कशी जिरली, असे म्हणत ते स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात मग्न राहतात, हीदेखील या लोकशाहीची सर्वात मोठी विटंबना आहे. उत्तरेत लालूप्रसाद यादव आणि रामविलास पास्वान यांनी आपल्या अनुक्रमे राष्ट्रीय जनता दल आणि लोकजनशक्ती पक्ष यांना एकत्र आणून स्वतंत्र आघाडी तयार केली. त्यामुळे काँग्रेसची जिरल्यासारखे दिसत असले तरी काँग्रेसच्या संमतीनेच त्यांनी ही आघाडी उघडल्यासारखे वातावरण आहे. हे दोन्ही नेते मंत्रिमंडळातून बाहेर पडलेले नाहीत आणि त्यांना बाहेर जायला सांगण्यातही आलेले नाही. काँग्रेसला बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश या तीन राज्यांच्या १३४ जागांमध्ये फारसा वाव राहणार नाही, हे लक्षात घेऊन काही जागा फोडायला आणि काही जागा वाचवायला ही आघाडी उभारण्यात आली असल्याची शक्यता अधिक आहे. लालू-पास्वान यांच्या आघाडीने जरा बऱ्या प्रमाणात जागा जिंकल्या तर ते जाणार तरी कुठे? भाजपबरोबर ते जातील अशी शक्यता नाही आणि डाव्यांना ते मनापासून हवे असतील असेही नाही. दक्षिणेत चित्रपट अभिनेता असणाऱ्या विजयकांतने ‘देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम’ नावाचा पक्ष २००५ मध्ये बनवला. काँग्रेसला दक्षिणेत काहीतरी आधार हवा म्हणून त्याही पक्षाशी काँग्रेसने जागावाटपाविषयी बोलणी केली आणि त्या पक्षासाठी चार जागा सोडायची तयारी दाखवली. आपला पक्ष ४-५ जागांवर समाधान मानण्यासाठी जन्मलेला नाही, असे सांगून त्यांनी काँग्रेसकडे पूर्ण दुर्लक्ष केले. आपण फक्त जनता आणि परमेश्वर यांच्याशीच आघाडी करू, असे जाहीर करूनच त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. विजयकांत हे तामिळ चित्रपटात भरपूर ‘स्टंट’ करतात. त्यासाठी ब्रायन लारासारख्या विंडिजच्या क्रिकेटपटूने त्यांची पाठ थोपटली आहे. २००६ मध्ये तामिळनाडू विधानसभेच्या सर्वच्या सर्व २३४ जागा विजयकांत यांच्या पक्षाने लढवल्या आणि विजयकांत वगळता सर्वच उमेदवार पराभूत झाले. त्यावेळी निवडणुकीचा ‘स्टंट’ तरी त्यांना महागात पडला. ३० लाख मतदारांपेक्षा अधिक मते मिळवून एकूण मतदानात १० टक्के मतांचा आपला वाटा आहे, असे दाखवून देणाऱ्या पक्षालाही काँग्रेसविषयी कोणत्याही प्रकारचा विश्वास वाटत नाही, हे इथे लक्षात घ्यायला हवे. या पक्षाच्या इंटरनेट संकेतस्थळावर श्रीलंकेतल्या तामिळांच्या प्रेतांची जी छायाचित्रे आहेत, ती प्रक्षोभक वाटतील अशी आहेत. दक्षिणेत काय आणि उत्तरेत काय, प्रत्येक राजकीय पक्ष आणि त्यांचे स्वंयभू नेते आपआपले ग्रह ओळखून रिंगणात फासे टाकत आहेत. काँग्रेसच्या आघाडीत सध्या तरी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, तामिळनाडूत द्रविड मुन्न्ोत्र कळघम हे पक्ष आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा त्यांच्या नेत्याच्या सवयीप्रमाणे वेगवेगळ्या दिशांना तीरंदाजी करतो आहे. आंध्रप्रदेशात तेलंगणा राष्ट्रीय समितीने काँग्रेसशी आधीच फारकत घेतली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृतपणे काँग्रेसबरोबर आहे, पण शरद पवारांच्या चाली लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असेल, असाच सार्वत्रिक समज आहे आणि तो चुकीचा नाही. सध्या दूर असणारे परंतु धर्मनिरपेक्षतेवर श्रद्धा असणारे पक्ष निवडणुकीनंतर जाणार कुठे, असा काँग्रेसजनांचा दावा असू शकतो, पण त्यासाठी काँग्रेसला किमान तीन आकडे पार करून पुढे जावे लागेल. तसे झाले तरच काँग्रेसला विचारायला ‘सध्यापुरते’ दूर गेलेले हे पक्ष परततील. तूर्त पट्टली मक्कल कच्छीसारखे पक्ष त्या आकडय़ासाठी झुंजायला काँग्रेसला भाग पाडतील यात शंका नाही.