Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९

‘द इंटरनॅशनल’ फॉम्र्युल्याची भ्रष्ट व्यवस्था!
कोलंबिया पिक्चर्सचा ‘द इंटरनॅशनल’ हा तसा बॉक्स ऑफिसच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी, निदान तसा दावा करणारा, चित्रपट पाहताना प्रत्यक्षात मात्र एखादा असंख्य वेळा पाहून झालेला पाठलागपट पाहतो आहोत की काय असे वाटते. जुन्या आणि अगदी घासून घासून गुळगुळीत झालेल्या या फाम्र्युल्याचे सादरीकरण करताना क्लृप्त्याही तशाच गुळगुळीत वापरल्या गेलेल्या असल्यामुळे त्या ‘क्लृप्त्या’ म्हणूनही त्यांची दखल घ्यावीशी वाटत नाही. चित्रपटाचा नायक लुई सालिंजर (क्लाइव्ह ओवेन) हा इंटरपोल एजंट आहे आणि त्याचा बराचसा एकाकी आणि थोडाफार इलिनॉर व्हिटमन (नाओमी वॅटस) या न्यूयॉर्क डिस्ट्रिक्ट अ‍ॅटर्नी महिलेच्या साथीने लढा आहे एका अत्यंत शक्तिशाली अशा आंतरराष्ट्रीय बँकेशी. इंटरनॅशनल बँक ऑफ बिझिनेस अ‍ॅण्ड क्रेडिट (आयबीबीसी) ही चीनकडून अण्वस्त्रे खरेदीच्या व्यवहारात गुंतलेली आहे. अण्वस्त्रे आणि शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱ्या बलाढय़ व्यक्ती आणि कंपन्या या बँकेच्या मार्फत जगात कुठे ना कुठे युद्ध धुमसत ठेवत असतात. बँकेचे हे खरे स्वरूप उघडकीला आणण्यासाठी सालिंजर धडपडतो. त्यातही सुरुवातीला त्याचा साथीदार इंटरपोल एजंट शूमर याचा खून सालिंजरच्या डोळ्यादेखत झाल्यामुळे सालिंजरच्या (आणि त्यांची न्यूयॉर्कर साथीदार इलिनॉर व्हिटमन हिच्या) दृष्टीने बँकेचे पितळ उघडे पाडण्याच्या या धडपडीला एक प्रकारे वैयक्तिक सूडाचेही परिमाण येते. अशा प्रकारे हा लढा ‘बलवान से लडाई निर्बल की’ आणि अन्यायाशी न्यायाने केलेले दोन हात अशी नित्य परिचयाची आहे.

‘जोडी जमली रे’मध्ये आज सर्वोत्तम अनुरूप जोडप्याची निवड
स्टार प्रवाहवरील ‘जोडी जमली रे’ या विवाह जुळविण्याच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये पहिल्या सहा स्पर्धकांच्या ‘कम्पॅटिबिलिटी टेस्ट्स’ करणारे इंटरॅक्टिव्ह खेळ खेळण्यात आले. उद्या या स्पर्धकांच्या तीन जोडप्यांमधून सर्वोत्तम अनुरूप जोडी निवडण्यात येणार आहे. त्यामुळे ‘जोडी जमली रे’ या कार्यक्रमाची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. आज शनिवारी रात्री १० वाजता स्टार प्रवाहवरून दाखविण्यात येणाऱ्या ‘जोडी जमली रे’च्या भागात तीन मुले, तीन मुली यांचे पालक, विवाहविषयक सल्लागार, आणि ज्योतिषी संदीप आचार्य असे सगळेजण मिळून सर्वोत्तम जोडी निवडणार आहेत.

सर्वाधिक मानधन घेणारी फ्रिदा पिंटो
फ्रिदा पिंटोमुळे भारतातील सर्व मॉडल्सना विदेशी दिग्दर्शकांची जशी स्वप्ने पडू लागली आहेत, त्याप्रमाणे भारतीय अभिनेत्रींनादेखील हॉलीवूडचे वेध लागले आहेत. नेहा धुपीयापासून ते पायल रोहतगीपर्यंत बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या स्तरावर असणाऱ्या नायिका सापडेल त्या मार्गाने हॉलीवूडला आपली ओळख करून देण्याच्या मागे लागल्या आहेत. मल्लिका शेरावत भारतीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने काही आठवडे अमेरिकेतच तळ ठोकून आहे. या सगळ्याला कारणीभूत ठरणाऱ्या फ्रिदा पिंटोला हॉलीवूडच्या सर्वात मादक नायिकांच्या यादीत चौथ्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. यामुळे फ्रिदा पिंटोच्या अभिनयाची किंमत आता १३ ते १५ कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. आजतागायत कुठल्याही भारतीय अभिनेत्रीला एका चित्रपटासाठी इतके मानधन मिळालेले नाही.