Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

वरुणवर कठोर कारवाई करा
रालोआचे संयोजक शरद यादव यांची मागणी
नवी दिल्ली, २७ मार्च/खास प्रतिनिधी

 

पिलीभीत मतदारसंघात भडक भाषण देणारे वरुण गांधी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचे भाजपला वाटत असले तरी रालोआचे संयोजक शरद यादव यांनी मात्र वरुण गांधींच्या भाषणाचा निषेध केला आहे. वरुणवर निवडणूक आयोगाने कडक कारवाई करावी, अशी मागणी आज यादव यांनी पत्रकार परिषदेत केली.वरुण गांधींसारखी विधाने करणाऱ्या नेत्यांविरुद्ध निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी, अशीही मागणी यादव यांनी केली.
वरुण गांधींवरून भाजप आणि जदयुमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पण जदयु हा भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआचाच भाग असून आम्ही एकत्र आहोत. आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, असे यादव यांनी स्पष्ट केले. वरुणच्या प्रक्षोभक भाषणामुळे जनता दल युनायटेडच्या लोकसभा निवडणुकांतील कामगिरीवर कोणताही विपरित परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला. आमच्या धर्मनिरपेक्षतेवर कोणीही बोट ठेवू शकत नाही, असे यादव म्हणाले. पिलीभीतमधून लोकसभा निवडणूक लढत असलेल्या वरुण गांधींनी ज्याप्रकारे मुस्लिमांविरुद्ध गरळ ओकली, ते बघता कायद्याच्या कचाटय़ातून ते सुटू शकणार नाही, असे मत बिहारचे मुख्यमंत्री व जदयुचे नेते नितीशकुमार यांनीही व्यक्त केले आहे.
दुसरीकडे वरुण गांधी यांच्याविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत असल्याची भावना भाजपमध्ये व्यक्त करण्यात येत आहे. न्यायालयातून जामीन अर्ज मागे घेतल्यानंतर वरुण गांधी पिलीभीतमध्ये अटक करवून घेण्याच्या विचारात असून त्याला भाजपनेही समर्थन दिले आहे. कायद्याच्या चौकटीत राहून वरुण गांधी जे काही करतील त्याला भाजपचा पाठिंबा असेल, असे भाजपचे प्रवक्ते बलबीर पूंज यांनी म्हटले आहे.