Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

आठवले म्हणतात
पंतप्रधान कुणीही होवो.. मला मंत्री करा!
मुंबई, २७ मार्च / खास प्रतिनिधी

 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीत काहीही फरक नाही. तांत्रिकदृष्टया ते वेगळे आहेत एवढाच काय तो फरक. आपण काँग्रेसच्या कोटय़ातून लढत असलो तरी शरद पवारांना सोडलेले नाही. शेवटी डॉ. मनमोहन सिंग काय किंवा शरद पवार कोणीही पंतप्रधान होवो, माझा ते काही विचार करणार की नाही ? अशी जोरदार फटकेबाजी करीत रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी, मंत्रिपदासाठी आपला विचार करायलाच हवा, असा स्पष्ट संदेश दिला.
केंद्रात मंत्रिपदाची घाई झालेल्या आठवले यांनी, शिवसेना-भाजपने आपल्याला मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्रीपद देण्याची तयारी दर्शविली होती. पण जातीयवादी पक्षांबरोबर कधी हातमिळवणी करायची नाही हे ठरलेले असल्याने ती ऑफर आपण धुडकावून लावली होती, असा गौप्यस्फोट केला. पवारांनी केंद्रात त्यांच्या कोटय़ातून मंत्रिपद दिले नाही याबाद्दल नाराजीची भावना व्यक्त करतानाच आता तुमच्या कोटय़ात आलो आहे तेव्हा तरी विचार करा, असेही आठवले यांनी काँग्रेसच्या नेत्यांना विनवले. काहीही करा पण आपल्याला मंत्री करा, यावरच आठवले यांचा भर होता.
राष्ट्रवादीची साथ सोडून काँग्रेसबरोबर आलेल्या रामदास आठवले यांच्या स्वागतासाठी पक्षाच्या मुख्यालयात समारंभ आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, उद्योगमंत्री नारायण राणे आदी या वेळी उपस्थित होते. १९९० ते १९९९ पर्यंत आपण काँग्रेसबरोबरच होतो. १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पवारांना साथ दिली. २००४ मध्ये आपण आघाडीचा उमेदवार म्हणून लढलो होतो. त्यामुळे काँग्रेसबरोबरचे आपले ऋणानुबंध कायम आहेत. तेव्हा काँग्रेसबरोबर तुमचा कायमचा की तात्पुरता घरोबा आहे, असे विचारले असता, काँग्रेस निधर्मवादाची संगत सोडेल तेव्हा विचार करावा लागेल. तसेच कायमचा की तात्पुरता घरोबा आहे हे नंतर कळेल, असे सांगत आठवले यांनी आपल्या भूमिकेबाबतची संदिग्धता कायम ठेवली.
शरद पवारांनी हुशारीने रामदास आठवले यांना काँग्रेसच्या गळ्यात अडकविले आहे. नगरमध्ये काँग्रेसला हादरा देण्याकरिता आठवले यांचा त्यांनी वापर करून घेतला. तसेच केंद्रात पुन्हा सत्ता आली तर आठवले यांना मंत्री करण्याची जबाबदारी काँग्रेसवर ढकलून दिली आहे. आपण कोठून लढणार, या प्रश्नावर आठवले यांनी आपण काँग्रेसश्रेष्ठींना शिर्डी व दक्षिण-मध्य मुंबईचा पर्याय दिल्याचे सांगितले. त्यावर दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे निदर्शनास आणता रोज उमेदवार बदलतात असे सांगत गायकवाडांच्या उमेदवारीबाबत संशयाचे वातावरण तयार केले. शेवटी मला निवडून आणण्याची जबाबदारी काँग्रेस व राष्ट्रवादी या दोघांची असल्याचे ते म्हणाले. आठवले हे काँग्रेसबरोबर आल्याने त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला होता. मात्र आधी तुमची महत्त्वाकांक्षा पूर्ण व्हावी मग आपल्या महत्त्वाकांक्षेकडे बघता येईल, असे हजरजबाबी उत्तर आठवले यांनी राणे यांना दिले.