Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

भंडाऱ्यातून अखेर प्रफुल्ल पटेल
उस्मानाबादसाठी डॉ. पद्मसिंह पाटील यांची उमेदवारी जाहीर
मुंबई, २७ मार्च / खास प्रतिनिधी

 

केद्रीय नागरी वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल की त्यांची पत्नी वर्षां.. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून पती-पत्नीपैकी कोण लढणार याबाबत गेले अनेक दिवस उत्सुकता होती. मात्र राष्ट्रवादीने आज प्रफुल्ल पटेल यांची उमेदवारी जाहीर करून ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची असल्याचे स्पष्ट केले. दोन महिन्यांपूर्वी प्रचाराला सुरुवात केल्यानंतरही उस्मानाबादसाठी नाव जाहीर करण्यात न आल्याने अस्वस्थ झालेल्या माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांना आज दिलासा मिळाला. त्यांची उमेदवारी आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.
प्रफुल्ल पटेल व डॉ. पाटील या दोघांची उमेदवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी जाहीर केली. पक्षाने यापूर्वी १७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. त्यामुळे पक्षाच्या वाटय़ाला आलेल्या २२ पैकी १९ ठिकाणचे उमेदवार निश्चित झाले आहेत. अमरावतीमध्ये राजेंद्र गवई हे राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लढणार आहेत. मावळ व रावेरचे उमेदवार येत्या दोन दिवसांत जाहीर केले जातील, असे पक्षाचे प्रवक्ते प्रकाश बिनसाळे यांनी सांगितले.
भंडारा-गोंदियात पटेल पती-पत्नीपैकी कोण लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उमेदवारीच्या दृष्टीने पटेल यांच्या पत्नी वर्षां या गेले दोन-तीन महिने या परिसरात सक्रिय झाल्या होत्या. प्रफुल्ल पटेल यांनीही तसे संकेत दिले होते. मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर स्वत: पटेल यांनी निवडणूक लढवावी असे ठरले. गेल्या वेळी प्रफुल्ल पटेल हे भंडारा मतदारसंघातून अवघ्या तीन हजार मतांनी पराभूत झाले होते. तेव्हा बसपाच्या उमेदवाराला मिळालेली ९० हजार मते ही पटेल यांच्या मुळावर आली होती. केंद्रीय मंत्रीपदावर असताना पटेल यांनी भंडारा-गोंदिया परिसरात अनेक कामे केली आहेत. त्याचा त्यांना फायदा होईल, असा राष्ट्रवादीच्या नेत्यांना विश्वास आहे. प्रफुल्ल पटेल हे रिंगणात असल्याने या मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.
उस्मानाबाद मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची इच्छा होती. विलासरावांचा पत्ता कापण्याकरिताच शरद पवारांनी जागावाटपाच्या समितीत डॉ. पद्मसिंह पाटील यांना घेतले. वास्तविक जिल्हा परिषद, नगरपालिका व साखर कारखान्याच्या निवडणुकीतील पराभवामुळे डॉ. पद्मसिंह पाटील यांचा कितपत निभाव लागेल याबाबत साशंकताच आहे. जागावाटपात काँग्रेसने शेवटपर्यंत या जागेवर आग्रह ठेवला होता. दोन दिवसांपूर्वी पवार व काँग्रेस नेत्यांच्या भेटीत ही जागा सोडण्यास राष्ट्रवादीने स्पष्टपणे नकार दिला होता. आता डॉ. पद्मसिंह पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कोल्हापूरमध्ये संभाजीराजे यांच्या विरोधात बंडाची भाषा करणारे मुन्ना महाडिक यांनी आज माघार घेतली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या भेटीनंतर त्यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले.