Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘स्वबळावर लढण्याची ही वेळ नव्हे’ !
मुख्यमंत्र्यांचा विलासरावांना टोला
मुंबई, २७ मार्च / खास प्रतिनिधी

 

काँग्रेस पक्ष लोकसभेत स्वबळावर लढला असता तर जास्त जागा मिळाल्या असत्या या माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या विधानाचा जोरदार समाचार आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला. राष्ट्रवादीबरोबरची आघाडी २००४ सालीच संपुष्टात आणली असती तर गेल्या पाच वर्षांत पक्षबांधणी करता आली असती. आज स्वबळावर लढण्याची वेळ नाही, अशी चौफेर टोलेबाजी मुख्यमंत्र्यांनी केली.
काँग्रेससह आलेल्या रामदास आठवले यांचे आज गांधी भवनात मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. तेव्हा मुख्यमंत्री बोलत होते. राष्ट्रवादीबरोबरची आघाडी ठेवायची की नाही, याचा आढावा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर घेता येईल, अशीही पुष्टी मुख्यमंत्र्यांनी या वेळी जोडली. राष्ट्रवादीबरोबर आघाडी करू नये म्हणून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आकमक भूमिका घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने निर्माण केलेल्या संशयाच्या वातावरणामुळे मध्यंतरी दिल्लीतील काँगेसच्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीबरोबर जावे का, याचा विचार सुरू होता. मात्र मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी, राष्ट्रवादीबरोबर आघाडी व्हावी, असा युक्तिवाद पक्षश्रेष्ठींकडे केला होता. राष्ट्रवादीबरोबर जागावाटप जाहीर झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आघाडीचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. विलासरावांनी आघाडीला विरोध केला असतानाच विलासरावांचे पक्षांतर्गत विरोधक उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मात्र आघाडी झाल्याने काँग्रेसचा फायदाच होईल, असे मत व्यक्त केले होते. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विलासरावांच्या विधानाशी आपण असहमत असल्याचे स्पष्ट करण्याची संधी सोडली नाही.
नांदेड व लातूर वादापासून उभयतांमधील संबंधात कटुता निर्माण झाली आहे. राणे यांच्यावरून दोघांनी परस्परविरोधी भूमिका घेतली होती. आता राष्ट्रवादीबरोबरील आघाडीवरून पुन्हा आजी-माजी मुख्यमंत्र्यांमधील मतभेद उघड झाले आहेत.
राष्ट्रवादीबरोबरील आघाडीवरून मुख्यमंत्री चव्हाण व उद्योगमंत्री राणे एका बाजूला तर विलासराव विरोधात असे चित्र निर्माण झाले आहे. २००४ मध्ये आघाडी संपुष्टात आणण्याचा निर्णय झाला असता तर पक्ष राज्यात बांधता आला असता हे मुख्यमंत्री चव्हाण यांचे विधान विलासरावांवर राजकीय प्रहार करणारेच आहे. याचाच दुसरा अर्थ म्हणजे, विलासराव हे चार वर्षे मुख्यमंत्री असताना राज्यात पक्षाची योग्य प्रकारे बांधणी झाली नाही हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीबरोबर आघाडी कायम ठेवायची की नाही, याचा धोरणात्मक निर्णय पक्षाच्या केंद्रीय नेत्यांना घ्यावा लागेल. लोकसभा निकालानंतर त्याचा आढावा घेता येईल, असे सांगून आजच त्यावर काहीही भाष्य करता येणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.