Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

२५ मतदारसंघांमधील निवडणूक प्रक्रिया आजपासून सुरू
वर्चस्व कायम राखण्याचे राष्ट्रवादीपुढे आव्हान
मुंबई, २७ मार्च / खास प्रतिनिधी

 

दुसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील २५ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी उद्या अधिसूचना जारी होईल. पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व कायम राखण्याचे राष्ट्रवादीसमोर आव्हान असताना मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात जास्तीत जागा जिंकण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
दुसऱ्या टप्प्यात २३ एप्रिलला नंदूरबार, धुळे, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, दिंडोरी, नाशिक, रायगड, मावळ, पुणे, बारामती, शिरुर, नगर, शिर्डी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर व हातकणंगले या २५ मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. पुणे, बारामती, शिरुर, माढा, कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, मावळ, नगर या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे. मात्र पक्षांतर्गत गटबाजीमुळे राष्ट्रवादीची कोल्हापूरची जागा अडचणीत आली आहे. शिरुरमध्ये राष्ट्रवादीने तुलनेत कमकुवत उमेदवार दिल्याची चर्चा आहे.
साताऱ्यात सातत्याने हुलकावणी देणारे उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने ही जागा हातची जाणार नाही याची खबरदारी घेतली आहे. कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये निलेश राणे यांना निवडून आणण्याकरिता उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सारी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. नाशिकमध्ये समीर भुजबळ यांच्या उमेदवारीमुळे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
माढय़ातून शरद पवार यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भर दिला आहे. मराठवाडय़ात आपले वर्चस्व कायम राखण्याकरिता शिवसेना व भाजप युतीला जोर लावावा लागेल. धुळ्याच्या जागेवरून काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत वाद पेटला आहे. जळगावमध्ये भाजपपुढे राष्ट्रवादीने आव्हान उभे केले आहे. पुण्यात सुरेश कलमाडी यांना जागा कायम राखण्यासाठी मोठे आव्हान आहे.