Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

खासदार गडाख बसपात दाखल
सदाशिव मंडलिक वाटेवर
मुंबई, २७ मार्च / प्रतिनिधी

 

बसपचा महाराष्ट्रातील आधार वाढत चालला असून आज नगरचे विद्यमान आमदार तुकाराम गडाख यांनी बसपात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. तर त्यांच्यापाठोपाठ शरद पवार यांनी दुखावलेले कोल्हापूरचे विद्यमान आमदार सदाशिवराव मंडलिक हेही बसपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत.
बहुजन समाज पक्षाची विचारसरणी आपल्याला मान्य असून शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित खऱ्या अर्थाने वाटचाल करणारा हा एकमेव पक्ष असल्याने बसपाचे राज्याचे अध्यक्ष विलास गरुड यांच्या माध्यमातून आपण राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्याकडे पक्षात प्रवेश देण्याची विनंती केल्याचे नगरचे विद्यमान खासदार तुकाराम गडाख यांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. गरुड म्हणाले की त्यांचा विनंती अर्ज बहेन मायावती यांच्याकडे पाठविला असून त्यांच्या निर्णयानंतर गडाख यांना अहमदनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. दरम्यान, तुकाराम गडाख यांच्याप्रमाणेच कोल्हापूरचे विद्यमान खासदार सदाशिवराव मंडलिक यांनीही बसपाकडे विचारणा केल्याचे समजते. याबाबत गरुड यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, याबाबत आपण सध्यातरी काही बोलणार नाही. मात्र विचारणा अनेक जण करीत आहेत.
मुंबईतील उमेदवारीसाठीही सत्ताधारी पक्षांतील दोन आमदारांनी विचारणा केली असल्याचे गरुड यांनी सांगितले. तुकाराम गडाख यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी दिली . गडाख यांचा जनसंपर्क नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कारण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गडाख यांना उमेदवारी नाकारण्याबाबत दिले होते. मात्र आज गडाख यांनी सांगितले की, खासदाराला एका वर्षांत १८० दिवस लोकसभेत हजर रहावे लागते. एक खासदार किमान दोन संसदीय समित्यांवर उपस्थित असतो. त्या समित्यांच्या बैठकांना किमान ६० दिवस उपस्थित राहावे लागते. असे वर्षांतील आठ महिने संसदीय कामात गेल्यावर उर्वरित मतदारसंघातील प्रत्येक खासदार हा आमदाराप्रमाणे संपर्क ठेवू शकत नाही. त्यामुळे कुठल्याही खासदारावर असा आक्षेप घेणे योग्य नव्हे. बसपाने गडाख यांना उमेदवारी दिल्यास व मंडलिकही त्यांच्या गळाला लागल्यास महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी व सेना-भाजपानंतर शक्तीशाली उमेदवार देणारा पक्ष म्हणून बसपाचेच नाव घ्यावे लागेल, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.