Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

राजनाथ-जेटली मतभेद लवकरच मिटतील - स्वराज
नवी दिल्ली, २७ मार्च / पी.टी.आय.

 

भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण जेटली यांच्यात सुधांशू मित्तल यांच्या नियुक्तीवरून उद्भवलेले मतभेद लवकरच संपुष्टात येतील, असा विश्वास ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला. सुषमा स्वराज यांच्या विधानामुळे दोन्ही वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद नसल्याचा भाजपचा दावा उघडा पडला आहे. सुधांशू मित्तल या व्यावसायिकाला ईशान्येकडील राज्यांचे सह-समन्वयक म्हणून नियुक्त केल्यामुळे अरुण जेटली पक्षश्रेष्ठींवर प्रचंड नाराज होते. त्यांनी ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली नव्हती. मात्र, महत्त्वाच्या बैठकींवर बहिकार टाकल्याने भाजपात प्रचंड अस्वस्थता पसरली होती.
या वादावर सुषमा स्वराज यांनी पहिल्यांदाच वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. लोकशाहीत वैचारिक मतभेद असताताच. एखादा वादाचा मुद्दा असेल तर दोन्ही नेते त्यावर विचारविनिमय करून निर्णय घेतील, असे स्वराज यांनी स्पष्ट केले. हा वाद प्रसिद्धी माध्यमांनी विनाकारण वाढवला. प्रसिद्धी माध्यमे काही वाद विनाकारण निर्माण करतात.
अरुण जेटली यांची स्वत:ची एक भूमिका होती. तो वाद नव्हता, असेही स्वराज म्हणाल्या. भाजपात दुसऱ्या फळीतील नेत्यांवरून अंतस्थ राजकारण खेळले जात असल्याच्या वार्ता निराधार असल्याचे स्वराज यांनी सांगितले. जर असे असेल तर मी राजनाथसिंहांच्या गोटातील आहे की अडवाणींच्या या प्रश्नाचे उत्तर पत्रकारांनी द्यावे, असा गुगली त्यांनी टाकला.
वरुण गांधी यांच्या आक्षेपार्ह भाषणावर स्वराज म्हणाल्या, वरुणने केलेल्या विधानांशी भाजप सहमत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. माझ्याही त्याच भावना आहेत.