Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

सुशीलकुमार द्विधा मन:स्थितीत !
मुंबई, २७ मार्च / खास प्रतिनिधी

 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची की नाही, यावरून केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे हे द्विधा मन:स्थितीत आहेत. स्वत: उमेदवार नसल्यास कन्या प्रणितीचे नाव त्यांनी पुढे केले आहे. राज्यसभा सदस्यांना लोकसभा निवडणूक लढविण्यास काँग्रेस पक्षाने आडकाठी केली आहे. कारण सदस्य लोकसभेवर निवडून आल्यास राज्यसभेतील संख्याबळ घटू शकते. यातूनच केंद्रीय मंत्र्यांपैकी अंबिका सोनी तसेच अश्विनीकुमार यांना लोकसभा निवडणूक लढविण्यास पक्षाने परवानगी दिली नाही.
या पाश्र्वभूमीवर शिंदे यांच्या नावाला पक्षश्रेष्ठी मान्यता देतील का, याची चर्चा आहे. सोलापूर हा मतदारसंघ राखीव झाला असला तरी आतापर्यंत खुल्या मतदारसंघातूनच शिंदे हे विजयी झाले आहेत. त्यामुळे राखीव मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची त्यांची इच्छा नाही. स्वत: शिंदे हे उमेदवार असले तरच काँग्रेसला विजय मिळेल, असे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. छाननी समितीने शिंदे यांच्या नावाची शिफारस केली आहे.
स्वत: शिंदे रिंगणात नसल्यास त्यांची कन्या प्रणिती हिच्या नावाचा विचार होऊ शकतो. प्रणिती या गेले दीड-दोन वर्षे सातत्याने सोलापूरमध्ये कार्यरत असतात. सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारीबाबतचा निर्णय काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पातळीवर येत्या दोन दिवसांत होईल, असे सांगण्यात आले. केंद्रीय अल्पसंख्याक खात्याचे मंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी माघार घेतलेली नसून ते निवडणूक लढवतील, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.