Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

वरूण गांधी अटक करून घेणार?
नवी दिल्ली, २७ मार्च/खास प्रतिनिधी

 

मुस्लीमविरोधी भडक विधाने करून अडचणीत आलेले भाजपचे तरुण उमेदवार वरुण गांधी यांनी आज दिल्ली उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांना अटक करणे उत्तर प्रदेश पोलिसांना शक्य होणार आहे. वरुण गांधी पिलीभीत मतदारसंघात जाऊन अटक करवून घेण्याच्या विचारात असून त्याला भाजपनेही संमती दिली आहे.
वरुण गांधी यांची अटकपूर्व जामीनाची मुदत शुक्रवारी संपत असतानाच त्यांनी जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतला. पिलीभीतमध्ये दिलेल्या चिथावणीखोर भाषणानंतर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यात यावे, अशी वरुण गांधींनी केलेली याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर जामीन अर्जासाठी प्रयत्न करण्याचे वरुणनी सोडून दिले. या निर्णयाला वरुण गांधींना आव्हान देता आले असते. पण त्यांनी या मुद्याचा राजकीय लाभ उठविण्यासाठी अटकेला सामोरे जाण्याचे ठरविले आहे. वरुण पिलीभीतमध्ये शनिवारी दाखल होणार आहेत. वरुणने कायद्याच्या चौकटीत राहून वागावे, अशा सूचना भाजपश्रेष्ठींनी त्यांना दिल्या आहेत. ‘हिंदूुत्वा’चा मुद्दा प्रखरतेने मांडल्यामुळे तळागाळाच्या कार्यकर्त्यांंमध्ये वरुण गांधी यांची प्रतिमा ‘उजळल्या’चे पाहून भाजपही त्यांना छुपे समर्थन देत आहे. एकीकडे भाजपनेते वरुण गांधींनी दिलेल्या भाषणाशी सहमत नसल्याचे दाखवत आहेत, पण त्याचवेळी त्यांच्या भाषणाच्या सीडीज् बनावट आहेत, या तर्काचाही ते पुरस्कार करीत आहेत.