Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

उत्तर मुंबईत काँग्रेसकडून स्थानिक उमेदवार?
मुंबई, २७ मार्च / प्रतिनिधी

 

शिवसेना - भाजप युतीच्या राम नाईक यांच्याशी टक्कर देण्यासाठी उत्तर मुंबईत स्थानिक उमेदवारच द्यावा, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी असून पक्षश्रेष्ठींनीही ही बाब मनावर घेतल्याचे संकेत मिळत आहेत. या पाश्र्वभूमीवर माजी आमदार पी. यू. मेहता किंवा चंद्रकांत घोसालिया यांच्यापैकी एकाचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. कपोल बँकेचे अध्यक्ष के. डी. व्होरा तसेच माजी राज्यसभा सदस्य संजय निरुपम हेदेखील या मतदारसंघातून इच्छुक असले तरी स्थानिक उमेदवारच दिला जावा, अशी मागणी जोर धरत आहे.
उत्तर मुंबईत शिवसेना-भाजपचे युतीचे उमेदवार राम नाईक यांनी प्रचाराला प्रारंभ केला आहे. त्यांचा प्रचाररथ सज्ज झाला असला तरी काँग्रेसच्या उमेदवाराबाबत अद्याप घोळ सुरु आहे. माजी खासदार गोविंदा हे पुन्हा इच्छुक असले तरी ते स्थानिक नाहीत तसेच होळीच्या दिवशी चाहत्यांना पैसे वाटल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने ते चांगलेच अडचणीत आले आहे. गोिवदा हे स्वत: आता इच्छुक असले तरी त्यांचे नाव मागे पडले आहे. पी. यू . मेहता आणि चंद्रकांत घोसालिया यांच्याबरोबर सचिन सावंत हे काँग्रेसचे युवा नेतेही या मतदारसंघासाठी इच्छुक असले तरी मेहता आणि घोसालिया यांचा जनसंपर्क पाहता त्यांच्यापैकी एकाची निवड पक्षश्रेष्ठींना करावी लागेल, असे चित्र आहे.
उत्तर पश्चिम मुंबईतही उमेदवाराचा असाच घोळ सुरू असून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. संजय निरुपम या मतदारसंघातूनही इच्छुक होते. येथून उमेदवारी मिळणार नसेल तर निरुपम यांनी उत्तर मुंबईचा आग्रह धरला आहे. मात्र उत्तर मुंबईत स्थानिक उमेदवार देण्याचेच निश्चित झाल्याने मेहता किंवा घोसालिया यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घोसालिया वा मेहता यांना उमेदवारी देण्यामागे यांच्यापैकी कुणीही नाईक यांना किमान लढत देऊ शकेल, हे गणित आहे. अन्यथा नवख्या उमेदवाराची डाळ नाईक यांच्यापुढे शिजणार नाही, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटते. येथून मनसेतर्फे लढणार असलेले शिरीष पारकर हे अखेर काँग्रेसचेच साह्यकर्ते ठरण्याची शक्यता अधिक आहे. पारकर यांची भिस्त शिवसेनेच्या फुटीर मराठी मतांवर असून ते अखेर काँग्रेसच्याच उमेदवाराच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे नाईक यांची मतांची आघाडी मोठय़ा प्रमाणावर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घोसालिया वा मेहता यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना काँग्रेसच्या परंपरागत मतांबरोबर उत्तर मुंबई मतदारसंघातील गुजराती समाजाचाही मोठय़ा प्रमाणावर पाठिंबा मिळेल, असे चित्र आहे.