Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

स्वीस बँकेतील १४५६ अब्ज डॉलर्स केंद्राने भारतात आणावे : शरद यादव
नवी दिल्ली, २७ मार्च/खास प्रतिनिधी

 

स्वीस बँकेत भारतीय नागरिकांचे तब्बल १४५६ अब्ज डॉलर्स म्हणजे ७२ लाख ८० हजार कोटी रुपये जमा आहेत. हा काळा पैसा कोणकोणत्या भारतीयांच्या नावांवर जमा आहे, याची केंद्र सरकारने स्वीस बँकेकडून माहिती मागवून तो भारतात परत आणावा आणि हा पैसा जमा करणाऱ्यांवर खटले भरावे, अशी मागणी आज जनता दल युनायटेडचे अध्यक्ष व रालोआचे संयोजक शरद यादव यांनी पत्रकार परिषदेत केली. स्वीस बँकेत अनेक भारतीय नेत्यांचा, उद्योजकांचा व नोकरशहांचा काळा पैसा साठून असल्याची चर्चा नेहमीच होत होती. पण आर्थिक मंदीनंतर अमेरिकेच्या दबावाखाली आता स्वीस बँकेने आपल्या खातेधारकांची नावे व त्यांच्या खात्यांमध्ये जमा असलेल्या रकमांची माहिती उघड केली आहे. स्वीस बँकेने दिलेली माहिती धक्कादायक असून सर्वाधिक काळा पैसा जमा करणाऱ्या पाच देशांमध्ये भारताचा अव्वल क्रमांक लागतो, असे यादव म्हणाले. भारतीयांच्या खात्यात १४५६ अब्ज डॉलर्स जमा असून त्यापाठोपाठ रशिया(४७० अब्ज डॉलर्स), ब्रिटन (३९०अब्ज डॉलर्स), युक्रेन (१००अब्ज डॉलर्स) आणि चीन (९६ अब्ज डॉलर्स) असा क्रम लागत असल्याची माहिती यादव यांनी दिली. भारतीयांनी स्वीस बँकेत जमा केलेला काळा पैसा रुपयांमध्ये मोजला तर तो ७२,८०० अब्ज किंवा ७२ लाख ८० हजार कोटी रुपये इतका भरतो. ही रक्कम भारतावर असलेल्या परदेशी कर्जाच्या तेरा पट आहे. ही रक्कम भारताने देशात परत आणली तर परदेशी कर्ज फेडूनही भारताकडे प्रचंड प्रमाणात परकीय चलन जमलेले असेल आणि भारताचा आर्थिक महाशक्ती म्हणून उदय होईल. केंद्र सरकारने हा पैसा भारतात आणण्यासाठी तातडीने हालचाली कराव्या, अन्यथा केंद्रात सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांविरुद्ध आम्हाला लोकसभा निवडणुकांमध्ये या मुद्यावरून प्रचार करावा लागेल, असा इशारा यादव यांनी दिला.