Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९

वरुणवर कठोर कारवाई करा
रालोआचे संयोजक शरद यादव यांची मागणी
नवी दिल्ली, २७ मार्च/खास प्रतिनिधी
पिलीभीत मतदारसंघात भडक भाषण देणारे वरुण गांधी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचे भाजपला वाटत असले तरी रालोआचे संयोजक शरद यादव यांनी मात्र वरुण गांधींच्या भाषणाचा निषेध केला आहे. वरुणवर निवडणूक आयोगाने कडक कारवाई करावी, अशी मागणी आज यादव यांनी पत्रकार परिषदेत केली.वरुण गांधींसारखी विधाने करणाऱ्या नेत्यांविरुद्ध निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी, अशीही मागणी यादव यांनी केली.

आठवले म्हणतात
पंतप्रधान कुणीही होवो.. मला मंत्री करा!
मुंबई, २७ मार्च / खास प्रतिनिधी

काँग्रेस आणि राष्ट्रवादीत काहीही फरक नाही. तांत्रिकदृष्टया ते वेगळे आहेत एवढाच काय तो फरक. आपण काँग्रेसच्या कोटय़ातून लढत असलो तरी शरद पवारांना सोडलेले नाही. शेवटी डॉ. मनमोहन सिंग काय किंवा शरद पवार कोणीही पंतप्रधान होवो, माझा ते काही विचार करणार की नाही ? अशी जोरदार फटकेबाजी करीत रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी, मंत्रिपदासाठी आपला विचार करायलाच हवा, असा स्पष्ट संदेश दिला. केंद्रात मंत्रिपदाची घाई झालेल्या आठवले यांनी, शिवसेना-भाजपने आपल्याला मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्रीपद देण्याची तयारी दर्शविली होती.

भंडाऱ्यातून अखेर प्रफुल्ल पटेल
उस्मानाबादसाठी डॉ. पद्मसिंह पाटील यांची उमेदवारी जाहीर
मुंबई, २७ मार्च / खास प्रतिनिधी
केद्रीय नागरी वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल की त्यांची पत्नी वर्षां.. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून पती-पत्नीपैकी कोण लढणार याबाबत गेले अनेक दिवस उत्सुकता होती. मात्र राष्ट्रवादीने आज प्रफुल्ल पटेल यांची उमेदवारी जाहीर करून ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची असल्याचे स्पष्ट केले. दोन महिन्यांपूर्वी प्रचाराला सुरुवात केल्यानंतरही उस्मानाबादसाठी नाव जाहीर करण्यात न आल्याने अस्वस्थ झालेल्या माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांना आज दिलासा मिळाला. त्यांची उमेदवारी आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.

‘स्वबळावर लढण्याची ही वेळ नव्हे’ !
मुख्यमंत्र्यांचा विलासरावांना टोला
मुंबई, २७ मार्च / खास प्रतिनिधी
काँग्रेस पक्ष लोकसभेत स्वबळावर लढला असता तर जास्त जागा मिळाल्या असत्या या माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या विधानाचा जोरदार समाचार आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला. राष्ट्रवादीबरोबरची आघाडी २००४ सालीच संपुष्टात आणली असती तर गेल्या पाच वर्षांत पक्षबांधणी करता आली असती. आज स्वबळावर लढण्याची वेळ नाही, अशी चौफेर टोलेबाजी मुख्यमंत्र्यांनी केली. काँग्रेससह आलेल्या रामदास आठवले यांचे आज गांधी भवनात मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

२५ मतदारसंघांमधील निवडणूक प्रक्रिया आजपासून सुरू
वर्चस्व कायम राखण्याचे राष्ट्रवादीपुढे आव्हान
मुंबई, २७ मार्च / खास प्रतिनिधी
दुसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील २५ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी उद्या अधिसूचना जारी होईल. पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व कायम राखण्याचे राष्ट्रवादीसमोर आव्हान असताना मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात जास्तीत जागा जिंकण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

खासदार गडाख बसपात दाखल
सदाशिव मंडलिक वाटेवर
मुंबई, २७ मार्च / प्रतिनिधी
बसपचा महाराष्ट्रातील आधार वाढत चालला असून आज नगरचे विद्यमान आमदार तुकाराम गडाख यांनी बसपात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. तर त्यांच्यापाठोपाठ शरद पवार यांनी दुखावलेले कोल्हापूरचे विद्यमान आमदार सदाशिवराव मंडलिक हेही बसपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत.

राजनाथ-जेटली मतभेद लवकरच मिटतील - स्वराज
नवी दिल्ली, २७ मार्च / पी.टी.आय.

भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण जेटली यांच्यात सुधांशू मित्तल यांच्या नियुक्तीवरून उद्भवलेले मतभेद लवकरच संपुष्टात येतील, असा विश्वास ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला. सुषमा स्वराज यांच्या विधानामुळे दोन्ही वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद नसल्याचा भाजपचा दावा उघडा पडला आहे.

सुशीलकुमार द्विधा मन:स्थितीत !
मुंबई, २७ मार्च / खास प्रतिनिधी

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची की नाही, यावरून केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे हे द्विधा मन:स्थितीत आहेत. स्वत: उमेदवार नसल्यास कन्या प्रणितीचे नाव त्यांनी पुढे केले आहे. राज्यसभा सदस्यांना लोकसभा निवडणूक लढविण्यास काँग्रेस पक्षाने आडकाठी केली आहे. कारण सदस्य लोकसभेवर निवडून आल्यास राज्यसभेतील संख्याबळ घटू शकते.

वरूण गांधी अटक करून घेणार?
नवी दिल्ली, २७ मार्च/खास प्रतिनिधी

मुस्लीमविरोधी भडक विधाने करून अडचणीत आलेले भाजपचे तरुण उमेदवार वरुण गांधी यांनी आज दिल्ली उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांना अटक करणे उत्तर प्रदेश पोलिसांना शक्य होणार आहे. वरुण गांधी पिलीभीत मतदारसंघात जाऊन अटक करवून घेण्याच्या विचारात असून त्याला भाजपनेही संमती दिली आहे. वरुण गांधी यांची अटकपूर्व जामीनाची मुदत शुक्रवारी संपत असतानाच त्यांनी जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतला.

उत्तर मुंबईत काँग्रेसकडून स्थानिक उमेदवार?
मुंबई, २७ मार्च / प्रतिनिधी

शिवसेना - भाजप युतीच्या राम नाईक यांच्याशी टक्कर देण्यासाठी उत्तर मुंबईत स्थानिक उमेदवारच द्यावा, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी असून पक्षश्रेष्ठींनीही ही बाब मनावर घेतल्याचे संकेत मिळत आहेत. या पाश्र्वभूमीवर माजी आमदार पी. यू. मेहता किंवा चंद्रकांत घोसालिया यांच्यापैकी एकाचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.

स्वीस बँकेतील १४५६ अब्ज डॉलर्स केंद्राने भारतात आणावे : शरद यादव
नवी दिल्ली, २७ मार्च/खास प्रतिनिधी

स्वीस बँकेत भारतीय नागरिकांचे तब्बल १४५६ अब्ज डॉलर्स म्हणजे ७२ लाख ८० हजार कोटी रुपये जमा आहेत. हा काळा पैसा कोणकोणत्या भारतीयांच्या नावांवर जमा आहे, याची केंद्र सरकारने स्वीस बँकेकडून माहिती मागवून तो भारतात परत आणावा आणि हा पैसा जमा करणाऱ्यांवर खटले भरावे, अशी मागणी आज जनता दल युनायटेडचे अध्यक्ष व रालोआचे संयोजक शरद यादव यांनी पत्रकार परिषदेत केली.

उद्धव-गडकरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई, २७ मार्च / प्रतिनिधी

शिवडी येथील युतीच्या प्रचाराच्या सभेत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अखेर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावरही सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या २० मार्च रोजी शिवडी येथील स्वान मिल कंपाऊंडमध्ये लोकसभा निवडणुकांसाठी युतीच्या प्रचाराचा नारळ फोडताना उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना केंद्र शासनावर जोरदार टीका केली होती. एवढेच नाही तर या सभेत ठाकरे यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या सभेला नितीन गडकरी हेही उपस्थित होते व त्यांनीही आपल्या भाषणात ठाकरे यांच्या भाषणाचे समर्थन केले होते. ठाकरे यांनी अशाप्रकारे पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार त्यानंतर निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेत मुंबई शहर जिल्हाधिकारी इदसेज कुंदन यांना प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. तीन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण पुढील चौकशीसाठी काळाचौकी पोलिसांकडे वर्ग करीत ठाकरे यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते. ठाकरे आणि गडकरी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा जामीनपात्र असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुलेखा कुंभारे यांना शिवसेनेची कवाडे उघडली नाहीत..
रामटेकसाठी कृपाल तुमाने
मुंबई, २७ मार्च / खास प्रतिनिधी

राज्याच्या माजी राज्यमंत्री आणि विदर्भातील रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या सुलेखा कुंभारे यांनी आज शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन रामटेक मतदारसंघातील उमेदवारीबाबत चर्चा केली. मात्र शिवसेनेत प्रवेश केला तरच शिवसेनेच्या चिन्हावर लढता येईल, असे स्पष्ट झाल्याने कुंभारे यांनी माघार घेतली आणि शिवसेनेची कवाडे कुंभारे यांच्यासाठी बंदच राहिली. या वाटाघाटीपाठोपाठ शिवसेनेने रामटेक मतदारसंघासाठी कृपाल तुमाने यांची उमेदवारी जाहीर केली. रामटेकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी कुंभारे इच्छुक होत्या. काँग्रेसने येथून मुकुल वासनिक यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेकडून लढण्याची इच्छा कुंभारे यांनी व्यक्त केली होती. शिवसेनेकडून तिकिट मिळू शकेल पण त्याआधी शिवसेनेत प्रवेश करावा लागेल, हे कुंभारे यांच्याकडे स्पष्ट करण्यात आल्यानंतर कुंभारे यांचा उत्साह मावळला.दरम्यान, कोपरगावचे आमदार अशोक काळे यांनी आज उद्धव ठाकरे यांना भेटून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आणि शिर्डी मतदारसंघात आपण शिवसेनेचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेचे आमदार असलेले अशोक काळे नारायण राणे यांच्या बंडानंतर त्यांच्यासोबत होते. आज मात्र आपण आपल्याच पक्षाबरोबर असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले.