Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
लोकमानस

हॅलो, आठवणीतली गाणी

 

हॅलो, हॅलोऽऽ, ‘आठवणीतली गाणी’ ना? मुंबई आकाशवाणी ना? अहो मी बोलतेय, ओळखलं नाय? कमाल आहे. मी मी कर्जतहून बोलतेय. तुमचं नाव काय? अहो, अजून ओळखलं नाय? मी परवा पण तुम्हाला फोन केला होता, पण नशीबच फुटकं, कट झाला. बरं झालं बाई, एकदाचा लागला. कित्ती आनंद झाला म्हणून सांगू? अजून ओळख पटली नाही? कमाल आहे. हो परवा तुम्ही दादरला फुलमंडईत भेटला होता, गुलाबी शर्ट तुम्हाला छान दिसतो हो. हातात जड पिशवी होती, कांदे-बटाटे दादरहून नेता वाटतं. फोन कट. (कुकरपण करपला वाटतं)..
हॅलो, मी साताऱ्याहून पोपटरावऽ बोलतोयऽऽ, बोला पोपटराव- तुमची गाणी लय झकास असतात, पण आमच्या आवडीचं गाणं लागत नाय, तवा ते जरा एकदा लावून टाका, लय मजा येईल, अहो पण कोणतं.
हॅलो, हॅलो, आठवणीतली गाणी? हो हो बोला, नाव काय तुमचं? अहो, अहो, परवा तुम्ही डोंबिवली स्टेशनात भेटला, पण बोलताच आलं नाही. अबोली रंगाची साडी तुम्हाला छान दिसते हो. गाडीला मेली गर्दी किती? तर मी काय सांगते, तुम्ही ते यांचं हो भावगीत लावा हो. लहान असताना मी पण गायचे, पण कोकणात. त्यामुळे पुढे जमलंच नाही. तशी मी कधी तरी पिकनिकला वगैरे गाते. सर्वाना खूप आवडते ते भावगीत. कोणतं? अहो, अहो, कोणतं भावगीत? धन्यवाद.
हॅलो, मी पंढरपूरहून यशवंतराव नारायणराव पंढरपूरकर बोलतोय, ओळखलंत ना? मला पंढरपूरला राहूनसुद्धा विठ्ठल रखमाईचं दर्शन तब्येतीमुळे घेता येत नाही. आयुर्वेदिक औषध चालू आहे. थोडा हलकासा खोकला आहेच. (तो दिसतोच आहे, पुढे बोला) तर ते ते, ते हो ‘उभा विटेवरी लावाच’. पंढरपूरला आलात तर जरूर भेटू. धन्यवाद, धन्यवाद! धन्यवाद. हॅलो, ओळखलं ना? नाव काय तुमचं? मी सिंधुदुर्गातून बोलतेय. गाणं मस्त लावलं. आंब्याला मोहोरपण मस्त आलाय, काय सुगंध सुटलाय, सासूबाईंना पण आवडतात हो तुमची गाणी. किती आनंद झाला (कुठे ठेवू?) तर मग दादा कोंडकेचं ‘ढगाला लागली कळ’ लावाच. अशी चर्चा आम्हाला आता सगळ्याच वाहिन्यावर पाहायला आणि ऐकायला मिळते. तेव्हा सर्वांच्या आठवणीतील गाणी सर्वांनाच ऐकायला मिळाली तर किती बरे होईल. गाणी ऐकायला आणि पाहायला (तीही जुनी) किती बरे वाटते. जुन्या काळातील संदर्भही व्यवस्थित मिळतात आणि खऱ्या अर्थाने जुन्या काळातील आठवणींनी मन पुन्हा ताजेतवाने होते.
किशोर राऊत, डहाणू

स्वरभास्करचे वाचन व्हावे
आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवर डॉ. रवी बापट यांच्या ‘वॉर्ड नं. ५ केईएम’ या पुस्तकाचे क्रमश: वाचन राजेंद्र पाटणकर यांच्या आवाजात झाले. फार उत्कृष्ट उपक्रम आहे. भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या चरित्राचे सवाई गंधर्व महोत्सवात विद्यावाचस्पती शंकर वासुदेव अभ्यंकर यांनी लिहिलेल्या वा प्रकाशित झालेल्या ‘स्वरभास्कर’ या पुस्तकाचे क्रमश: वाचन केल्यास सर्वानाच त्यांचेही जीवनानुभव कळतील.
द. वि. उपासनी, दहिसर, मुंबई