Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९

महाडिक यांची तलवार म्यान
कोल्हापूर, २७ मार्च / राजेंद्र जोशी

पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर केलेला ताकदीचा अवास्तव अंदाज आणि बंडखोरीच्या घोषणेनंतर अपेक्षितांनी फिरवलेली पाठ यामुळे वास्तवाचे भान आलेल्या धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांनी आपली तलवार म्यान केली. त्यांच्या माघारीने राष्ट्रवादीचे उमेदवार संभाजीराजे छत्रपती यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर होत चालला असून खासदार मंडलिक यांच्या बंडखोरीकडे साऱ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ज्या पध्दतीने धनंजय महाडिक यांची बंडखोरी टाळण्यात राष्ट्रवादीला यश आले त्या पध्दतीने मंडलिकांनाही थांबवता आले तर छत्रपतींच्या औपचारिक विजयाची घोषणाच फ क्त बाकी राहील, असे सध्या तरी चित्र आहे.

यंदाचा पाऊस खरिपाला चांगला, रब्बीला जेमतेम
पाडव्याला पारावरचे पंचांग वाचन
मिरज, २७ मार्च/दिगंबर शिंदे
माळ्याच्या घरात निघणारा यंदाचा पाऊस मध्यम स्वरूपाचा असला तरी खरिपाला चांगला व रब्बीला जेमतेम होईल, असा अंदाज पाडव्याला करण्यात आलेल्या पंचांगवाचनात सांगण्यात आला. गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर गावगाडय़ातील मानकऱ्यांच्या उपस्थितीत लिंबाच्या पारकट्टय़ावर गावच्या भटजींकडून आज हे पंचांगवाचन झाले. सरत्या वर्षांच्या आठवणींची उजळणी होत असतानाच आगामी साल कसं जाणार, याची तीव्र उत्सुकता ग्रामीण जीवनाला लागलेली असते.

आवाडे-माने गटाने उभारली पाडव्याला मनोमिलनाची गुढी
इचलकरंजी, २७ मार्च / वार्ताहर

आवाडे-माने या मातब्बरात दहिहंडीपासून सुरू झालेला राजकीय कलह शुक्रवारी मनोमिलनाची गुढी उभी करून संपवताना आवाडे कुटुंबीयांनी निवेदिता मानेंच्या विजयाचे तोरण बांधण्याचा निर्धार केला. काहीशी हुरहूर, काहीशी कालवाकालव अशा वातावरणात दोन राजकीय घराण्यांनी गळाभेट घेतली. पण आवाडे कुटुंबीयांनी केलेले मनमोकळे व भारदस्त स्वागत आणि आश्वासक शब्द यामुळे निवेदिता माने परतताना बऱ्याचशा निश्चिंत झाल्या होत्या.

ताराराणी आघाडीला खिंडार पडता पडता वाचले..
कोल्हापूर, २७ मार्च/विशेष प्रतिनिधी

काँग्रेस-शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असा बहुआयामी प्रवास करून पुन्हा काँग्रेस आघाडीविरुद्ध बंडाचे निशाण रोवण्याच्या प्रयत्नात असलेल्या आमदार महादेवराव महाडिक यांच्या गटाला गुरुवारी सायंकाळी लोकसभेच्या िरगणात पहिला झटका बसला. महाडिकांचे काटाजोड वर्चस्व असलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेत त्यांच्या ताराराणी आघाडीला खिंडार पाडण्यात जनसुराज्य आघाडी यशस्वी झाली. तथापि सायंकाळी राष्ट्रवादीचे बंडखोर मुन्ना महाडिक यांनी आपली बंडखोरी मागे घेतल्याने महापालिकेत ताराराणी आघाडीची अवस्था पूर्ववत राहिली आहे.

सांगलीत कोटय़वधीची सोने खरेदी
सांगली, २७ मार्च / प्रतिनिधी

वाढती महागाई व आर्थिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सांगलीच्या सराफी पेठेत कोटय़वधी रूपयांची सोने खरेदी झाली. सोने खरेदीबरोबरच संगणक, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व वाहन खरेदीकडे वळत असलेला मध्यमवर्गीय ग्राहकवर्गही मोठय़ाप्रमाणात दिसून आला. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून सांगलीच्या बाजारपेठेत कोटय़वधी रूपयांची उलाढाल झाली. मंदीचे सावट व महागाई असली तरी मध्यमवर्गीय आज दिवसभर बाजारात दिसून आला.

आंतरराज्य सीमा नाक्यासाठी जमिनीला जादा भावाची मागणी
सोलापूर, २७ मार्च/प्रतिनिधी

सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे आंतरराज्य सीमा तपासणी नाक्याच्या आधुनिकीकरणासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंस १३० मीटरप्रमाणे ४० एकर जमीन संपादन करण्यात येणार आहे. या भागात सात ते आठ लाख प्रति एकरी जमिनीला भाव आहे; परंतु शासकीय भाव खूपच कमी आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पुढाकाराने दक्षिण सोलापूर तालुक्यात होटगी, फताटेवाडी, आहेरवाडी येथे होत असलेल्या राष्ट्रीय औष्णिक ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी भूसंपादनाचा कायदा लागू न करता प्रति एकरी सहा लाखांपर्यंत जमिनीला भाव देण्यात येत आहे, तसेच बोरामणी परिसरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीही संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीला भरघोस दर दिला जात आहे. त्याप्रमाणे सोलापूर-विजापूर महामार्गावर नांदणी येथे आंतरराज्य सीमा तपासणी नाक्याच्या आधुनिकीकरणासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीला शासकीय भाव न आकारता जादा भाव देण्यात यावा. त्यात दुजाभाव करू नये, अशी मागणी संभाव्य विस्थापित शेतकऱ्यांकडून होत आहे.

प्राचार्य चव्हाण, गवळी, प्रा. शहाणे यांना ‘सैनिक मित्र’ पुरस्कार
सोलापूर, २७ मार्च/प्रतिनिधी
आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष योगदान देणारे प्राचार्य डी. जी. चव्हाण, रामचंद्र गवळी व प्रा. संदेश शहाणे यांना सोलापूर जिल्हा भारतीय माजी सैनिक संघटनेतर्फे ‘सैनिक मित्र’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. या पुरस्काराची घोषणा संघटनेचे उपाध्यक्ष सुभेदार बाबुराव पेठकर यांनी पत्रकार परिषदेत केली. पुरस्कार वितरण सोहळा रविवारी २९ मार्च रोजी सकाळी ९.४५ वाजता विजापूर रस्त्यावरील सैनिक नगरात बहुद्देशीय सभागृहात संपन्न होणार आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. स्व. सुमन यशवंत शिंदे यांच्या स्मरणार्थ गेल्या चार वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे मानकरी प्राचार्य चव्हाण (वय ८९) हे माजी सैनिक आहेत. तर दुसरे मानकरी गवळी हे नौदलातून निवृत्त झालेले पेट्टी ऑफिसर आहेत. प्रा. शहाणे हे सुध्दा वायूसेनेतून निवृत्त झालेले ज्युनियर वॉरंट ऑफिसर आहेत. वायूसेनेचे निवृत्त ग्रुप कॅप्टन प्रतापसिंह परदेशी, ग्रुप कॅप्टन श्रीकांत कुलकर्णी व कर्नल प्रभाकर लांडगे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, असे सुभेदार पेठकर यांनी सांगितले.

खून करून मृतदेह नदीत फेकला
आटपाडी, २७ मार्च / वार्ताहर
डोके व कपाळावर धारदार शस्त्राने वार करून मृतदेह येरळा नदीपात्रात फेकून देण्याची घटना खानापूर तालुक्यातील बलवडी- भाळवणी येथे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाची ओळख पटली नसून पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे. विटा- कुंडल रस्त्यावर बलवडी (भाळवणी) गावानजीक नदीपात्रात हा मृतदेह आढळून आला. चेहरा, कपाळ व डोक्यावर वार झाल्याने कवटी फुटली आहे. याबाबत पोलिस पाटील सुनील पवार यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी सकाळी साडे आठ वाजता येरळा नदी पुलावरून जाणाऱ्यांना छिन्नविचिन्न झालेला मृतदेह आढळला. त्यानंतर पोलीस पाटलांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तपास केला असता अनोळखी व्यक्तीचा खून केल्याचे उघडकीस आले. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक बाळासाहेब वाघमोडे व पोलिस उपअधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पवार करीत आहेत.

सर्पदंशाने ३ वर्षांच्या बालकाचा मृत्यू; अंधश्रद्धा नडली
माळशिरस, २७ मार्च/वार्ताहर
अंधश्रद्धेतून घरातच ठेवलेल्या वारुळातील सर्पाने दंश केल्याने ३ वर्षांच्या बालकाला जीव गमवावा लागला. तालुक्यातील मगराचे निमगाव येथे हा प्रकार घडला.
निमगाव पासष्ट फाटा भागात महादेव गाडेकर हे रानातील वस्तीत राहतात. त्यांच्या तणघरातच असणाऱ्या वारुळाची गाडेकर कुटुंबीय दररोज मनोभावे पूजाअर्चा करत. अंधश्रद्धेतून त्यांनी हे वारूळ काढले नव्हते. दोन दिवसांपूर्वी दुपारी गाडेकर यांचा मुलगा भैया खेळत असतानाच या वारुळातील सापाने त्यास दंश केला. उपचारास हलविण्यापूर्वीच या बालकाचा करुण अंत झाला. गाडेकर कुटुंबीयांच्या या अंधश्रद्धेमुळे बालकाचा बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ जप्त
आटपाडी, २७ मार्च / वार्ताहर
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज छापा टाकून रेशनिंगचा ४५ हजार ५०० रुपये किंमतीचे ५० क्विंटल तांदूळ बेकायदेशीररित्या कब्ज्यात ठेवल्याबद्दल तिघाविरोधात गुन्हा दाखल करून तांदूळ जप्त केला. याबाबत पुरवठा अधिकारी शांताराम किरवे यांनी गुन्हा दाखल करूनसुध्दा माहिती देण्यास टाळाटाळ केली.प्रभारी तहसीलदार व्ही. एम. रेंदाळकर, मंडल अधिकारी यशवंत जमादार, पुरवठा अधिकारी एस. एन. किरवे व तलाठी आर. एच. रेड्डी यांनी खासगी धान्य व्यापाऱ्यांवर छापा टाकला. या छाप्यात इसाक फत्तूबाई पटेल यांच्या ब्राह्मण गल्लीतील घरातील एका खोलीत बेकायदेशीररित्या काळ्याबाजारात विक्रीच्या उद्देशाने ठेवलेले ५० क्विंटल तांदूळ मिळून आले. ही खोली सील करून महसूल विभागाने तांदूळ पोलीस बंदोबस्तात ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक शांताराम किरवे यांनी इसाक फत्तूबाई पटेल व सुनील मल्लिकार्जुन भिंगे व राहुल कांतिलाल घोंगडे (रा. आटपाडी) यांच्याविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

पाणपोईवरून दोन गटांच्या परस्परविरोधात तक्रारी
आटपाडी, २७ मार्च / वार्ताहर

भिंगेवाडी येथे नुकत्याच झालेल्या पाणपोईवरून सरपंच गट व विरोधी गटाकडून परस्पराविरोधात फिर्यादी दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी भिंगेवाडीचे सरपंच गणेश भुते व वसंत तळे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पाणपोईवरून मारहाण केल्याबाबत राहुल कांतिलाल घोंगडे यांनी सरपंच गणेश भुते व वसंत तळे यांनी मारहाण केल्याची, तर सरपंच गणेश भुते यांनी राहुल घोंगडे व तानाजी श्यामराव पाटील यांनी मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे. यामुळे भिंगेवाडी येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. दोन्ही गटाकडून फिर्याद देण्याच्या मुद्दय़ावर पोलिसांनी संदिग्ध भूमिका घेतल्याने वातावरण अधिकच बिघडले आहे.

‘वारणा’त पावणेअकरा लाख पोती साखर उत्पादन
पेठवडगाव, २७ मार्च / वार्ताहर
उसाचे गळीत व साखर उत्पादन यामध्ये महाराष्ट्रातील उच्चांक नोंदवून वारणानगर येथील श्री तात्यासाहेब क ोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची सुवर्णमहोत्सवी गळीत हंगामाची यशस्वी सांगता झाली. १३७ दिवसात वारणेच्या युनिट एकमधून १० लाख ७५ हजार ४१९ टन उसाचे गाळप झाले. वारणा सहकारी साखर कारखान्याच्या या पन्नासाव्या गळीत ंहगामात १३ लाख ४० हजार ९०० क्विंटल साखरेचे उत्पादन होऊन १२.२० टक्के साखर उतारा राहिला. या गळीत हंगामापूर्वी निमित्ताने कारखान्याच्या प्रांगणात कार्यकारी संचालक व्ही.एस. चव्हाण यांच्या हस्ते पूजा झाली.

बाबा महाराज सातारकरांची उद्यापासून कर्देहळ्ळीत कीर्तने
सोलापूर, २७ मार्च/प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी येथे ग्रामदैवत श्री नृसिंह यात्रेनिमित्त दि. २९ ते ३१ मार्चपर्यंत तीन दिवस ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांची कीर्तने होणार असल्याची माहिती श्री नृसिंह यात्रा पंच समितीचे प्रमुख लक्ष्मण पौळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. यात्रेस शनिवार दि. २८ रोजी पहाटे ‘श्री’ च्या मूर्तीला अभिषेक करुन यात्रेस प्रारंभ होणार आहे. रात्री काठय़ांसह पालखीची मिरवणूक निघणार आहे. दि. २९ रोजी भारुडाचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी कुस्त्यांचा फड होणार आहे. दि. २९, ३० व ३१ रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचे कीर्तन होणार असल्याचे पौळ यांनी सांगितले.

धनादेश न वटल्याने महिलेला ६ महिने कैद, साडेसहा लाखांचा दंड
माळशिरस, २७ मार्च/वार्ताहर
खोटा धनादेश दिल्याचा आरोप सिद्ध झालेल्या अकलूजच्या वहिदा शेख या महिलेस येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एम. सुंदाळे यांनी ६ महिने साधी कैद व साडेसहा लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अकलूज येथील या महिलेने सुमित्रा सहकारी पतसंस्थेकडून व्यापारासाठी २००१ साली ५ लाख रुपये कर्ज घेतले होते. त्याच्या परताव्यासाठी अकलूजच्या युनायटेड वेस्टर्न बँकेवरील साडेतीन लाख रुपयांचा धनादेश तिने पतसंस्थेस दिला. मात्र खात्यावर रक्कम नसल्याने धनादेश वटला नाही. म्हणून पतसंस्थेने न्यायालयात खटला दाखल केला होता. पतसंस्थेच्या वतीने अ‍ॅड. रमेश जाधव यांनी काम पाहिले.

सोलापुरात आजपासून अस्थिरोग तज्ज्ञांची दोन दिवसीय परिषद
सोलापूर, २७ मार्च/प्रतिनिधी

महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनच्यावतीने दक्षिण महाराष्ट्र स्तरावर अस्थिरोग तज्ज्ञांची दोन दिवसीय परिषद उद्या शनिवारपासून सोलापूरच्या हॉटेल त्रिपुरसुंदरीमध्ये सुरु होत असल्याची माहिती सोलापूर ऑर्थोपेडिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विलास जोग यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. राजेंद्र अभ्यंकर आणि डॉ. संजय खैरनार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या परिषदेचा प्रारंभ शनिवारी दुपारी दोन वाजता होणार आहे. पहिल्या सत्रात अस्थिरोगाच्या विषयावर विविध शोधनिबंध सादर केले जाणार आहेत. कृत्रिम सांधारोपण, ऑर्थोस्कोपी, हाताच्या आजारासंबंधी प्रबोधन आणि मणक्याचे आजार, तसेच आधुनिक उपचारावर चर्चासत्र आयोजित करण्यात आल्याचे डॉ. मेतन यांनी सांगितले.