Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९

ढोल बजने लगा!
लोकसभा निवडणुकांच्या राजकीय रणधुमाळीचा ढोल आता खऱ्या अर्थाने वाजायला प्रारंभ झाला आहे. आज राज्यपातळीवर विविध घडामोडींनी वेग घेतला आणि राजकीय वर्तुळात तर्कवितर्काना उधाण आले. ईशान्य मुंबईसाठी भाजपचे तिकिट न मिळालेल्या पूनम महाजन यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीपाठोपाठच राहुल महाजन यांनी भाजपवर थेट तोफ डागत आपल्या असंतोषाला वाट करून दिली. दुसरीकडे मुंबई दक्षिण मतदारसंघासाठी अ. भा. सेनेचे अरुण गवळी यांची उमेदवारी जाहीर झाल्याने तेथील चुरस अधिकच तीव्र झाली. तर ‘स्वबळावर लढायला हवे होते’ या भूमिकेशी पूर्ण असहमती दाखवताना मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना फटकारले!

पुनम-राज भेटीने राजकीय चर्चाना उधाण
मुंबई, २७ मार्च/प्रतिनिधी

ईशान्य मुंबईतून भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्याच्या पाश्र्वभूमीवर आज पूनम महाजन यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यामुळे पूनम महाजन या मनसेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्यांना ऊत आला. मात्र आपण मनसेमध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राज ठाकरे व आपल्या कुटुंबाचे गेली अनेक वर्षे जिव्हाळ्याचे संबंध असून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण त्यांची भेट घेतल्याचे पूनम महाजन यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानात मशिदीवर आत्मघाती हल्ला
५० ठार, १०० जखमी
इस्लामाबाद, २७ मार्च/वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या सध्या अस्वस्थ असलेल्या वायव्य सरहद्द प्रांतातील खैबर आदिवासी भागात एका दुमजली मशिदीत शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी सारे जमले असताना एका दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेला एक ट्रक मशिदीवर धडकवल्याने ५०जण जागीच ठार झाले असून १०० हून अधिक जखमी झाले आहेत. खैबर आदिवासी प्रांतातील जामरूद भागात ही मशीद असून पाकिस्तानातील हा सर्वात खतरनाक दहशतवादी हल्ला आहे.

भाजपने आम्हाला वनवासात पाठवले
मुंबई, २७ मार्च/प्रतिनिधी

ईशान्य मुंबईतून माझे वडिल प्रमोद महाजन यांनी तीन वेळा निवडणूक लढविली होती. १९९६ साली ते निवडून आले होते. आज ते हयात असते तर त्यांनी या मतदारसंघातून निश्चितपणे निवडणूक लढविली असती. पूनमला या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली असती तर ती निवडून आली असती व माझ्या वडिलांचे स्वप्न तिने पूर्ण केले असते. माझे वडील भाजपचे लक्ष्मण होते.

असाध्य कर्करोगाने पांढरी वाघीण बेजार!
मुंबई, २७ मार्च/ प्रतिनिधी

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रेणुका ही १२ वर्षांची पांढरी वाघीण त्वचेच्या असाध्य कर्करोगाने (कॅन्सर) ग्रस्त असल्याने तिथल्या कर्मचारी व डॉक्टरांमध्ये सध्या कमालीची अस्वस्थता पसरली आहे. रेणुका केवळ एक वर्षांची असताना तिला औरंगाबाद येथील प्राणीसंग्रहालयातून या उद्यानात आणले गेले. आता तिला कॅन्सरने ग्रासले असून तिच्या जगण्याची शक्यता धूसर होत असल्याने, शेवटपर्यंत प्रयत्नांची पराक ष्ठा करायची या ईष्र्येने डॉक्टर, तज्ज्ञ आणि तिच्यावर अपरंपार प्रेम करणारे उद्यानातील कर्मचारी तिची काळजी घेत आहेत. उपचारांमध्ये कुठेही काहीही कमी पडू नये याकडे ते कटाक्षाने लक्ष देत आहेत.

अरुण गवळी यांची अचानक दक्षिण मुंबईसाठी उडी !
मुंबई, २७ मार्च / प्रतिनिधी

अखिल भारतीय सेनेचे प्रमुख आणि चिंचपोकळीचे आमदार अरुण गवळी हे दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा गवळी यांची कन्या नगरसेवक गीता गवळी यांनी आज केली. यापूर्वी गवळी बसपाच्या हत्तीवर स्वार होणार असल्याची घोषणा बसपने केली होती. मात्र बसपासोबत गवळी यांचे जमले नाही. सध्या गवळी तुरुंगात आहेत. गवळी यांचा सामना शिवसेनेचे मोहन रावले आणि काँग्रेसचे मिलिंद देवरा यांच्याशी होणार असून गवळींच्या उमेदवारीमुळे रावले यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहिले असल्याचे स्पष्ट झाले आहे. आजच्या या आश्चर्यजनक निर्णयापूर्वी गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेचे बसपात विलीनीकरण करण्यात येणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र या शक्यतेचा गीता गवळी यांनी आज स्पष्टपणे इन्कार केला. गवळी सध्या तुरुंगात आहेत. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची हत्या केल्याचा आणि खंडणी मागितल्याचा गवळींवर आरोप आहे. गवळींवर ‘मोक्का’ लावण्यात आला असल्याने त्यांना प्रचारासाठी तुरुंगातून सोडण्यात येईल की नाही, याविषयी अनिश्चितता आहे. गवळी यांना मैदानात उतरविण्याची खेळी काँग्रेसनेच केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

गुजरात दंगलप्रकरणी राज्यमंत्री माया कोदनानी शरण
अहमदाबाद, २७ मार्च/पीटीआय.
धर्माधता ही दहशतवादाइतकीच निषेधार्ह आहे, असे स्पष्ट करीत गुजरात उच्च न्यायालयाचे न्या. डी. एच. वाघेला यांनी २००२ मधील नरोडा पटिया दंगल प्रकरणी अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर गुजरात मंत्रिमंडळातील राज्यमंत्री माया कोदनानी यांनी आज पदत्याग सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष तपास पथकासमोर शरणागती पत्करली. या घडामोडीमुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे स्टारकॅम्पेनर नरेंद्र मोदी यांना हा मोठाच हादरा मानला जात आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सायंकाळीत त्यांना अटक करण्यात येणार आहे. धार्मिक सलोखा हा लोकशाहीचा मुख्य आधार आहे, असे नमूद करीत न्यायाधीशांनी विश्व हिंदु परिषदेचे नेते जयदीप पटेल यांचाही अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला. या दंगलीच्या वेळी कोदनानी व पटेल हे सक्रीय होते, असा निष्कर्ष विशेष तपास पथकाने काढला आहे. नरोडा पटिया आणि नरोडा गावातील या दंगलीत १०६ लोकांची निर्घृण हत्या झाली. जमावाला रोखण्यासाठी स्थानिक नेत्यांनी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले. या दंगलीच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाने नव्याने विशेष पथक स्थापन केले आहे. या पथकाने कोदनानी व पटेल यांना हजर राहण्यासाठी वारंवार नोटिसा बजावल्या. तरीही ते गैरहजर राहिल्याने जानेवारी २००९ मध्ये त्यांना फरारी घोषित करण्यात आले होते. त्यानंतर या दोघांना पाच फेब्रुवारीला अहमदाबाद सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. हा जामीन रद्द करण्यासाठी विशेष पथकाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कोदनानी या सध्या मोदी मंत्रिमंडळात उच्चशिक्षण राज्यमंत्री असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

बारावीच्या परीक्षेपाठोपाठ अभियांत्रिकी-वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा समोर उभी ठाकली आहे. सीईटी आता केवळ शहरी भागातील विद्यार्थ्यांच्याच आवाक्यातील परीक्षा राहिलेली नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थीही उत्साहाने आणि तयारीने या परीक्षेला बसू लागले आहेत आणि चांगले यशही मिळवू लागले आहेत. परंतु ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक विद्यार्थ्यांना अद्याप मार्गदर्शनाच्या योग्य आणि पुरेशी संधी तसेच सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. आणि ज्या आहेत त्यासाठी हजारो अथवा लाखो रुपये मोजावे लागत आहेत. परिणामी असंख्य विद्यार्थी त्यापासून वंचितच राहतात. अशा विद्यार्थ्यांसाठी ‘लोकसत्ता’ येत्या सोमवारपासून ‘के.जी. टू पी.जी.’ या पानावर मार्गदर्शनपर लेख देत आहे. ’

अण्णांचे उपोषण स्थगित
पारनेर, २७ मार्च/वार्ताहर

गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या तीन मंत्र्यांना वगळावे या प्रमुख मागणीबरोबरच इतर प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून उपोषण करण्याचा घेतलेला निर्णय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ग्रामसभेच्या विनंतीनुसार लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपेपर्यंत स्थगित केला. राज्य मंत्रिमंडळातील मदन पाटील, स्वरूपसिंह नाईक, नवाब मलिक या गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांना वगळावे, तसेच इतर प्रलंबित मागण्यांसंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा, असे हजारे यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांना पत्र पाठवून कळविले होते. ग्रामस्थांनी लोकसभेची आचारसंहिता संपेपर्यंत उपोषणाचा निर्णय स्थगित करावा, अशी आग्रही मागणी केली. ग्रामस्थांच्या विनंतीला मान देत हजारे यांनी उपोषण स्थगित केले.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी