Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९

मुख्यमंत्री आज ‘कानमंत्र’ देणार
नांदेड, २७ मार्च/वार्ताहर

कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला पाहिजे या दृष्टीने नियोजन करणाऱ्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ‘कानमंत्र’ देण्यासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उद्या (शनिवारी) शहरात येत आहेत. दुपारी एक वाजता नवा मोंढा मैदानावर होणाऱ्या सभेत त्यांचे भाषण होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी नांदेड मतदारसंघातून भास्करराव पाटील खतगावकर यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी दिली आहे.

सरंजामशाही संपविण्याची भाषा कुणासाठी?
जालना, २७ मार्च/वार्ताहर

आगामी निवडणुकीत जिल्ह्य़ातील सरंजामशाही संपवून टाकण्याचा आदेश शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव चोथे यांनी जिल्ह्य़ातील शिवसैनिकांना दिला आहे! काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाला नसताना आणि भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार जाहीर झालेला असताना श्री. चोथे यांनी हे आवाहन नेमके कशासाठी केले याबद्दल राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क व्यक्त केले जात आहेत.

आमदार काळे यांच्या नावाची औपचारिक घोषणाच बाकी!
जालना, २७ मार्च/वार्ताहर

लोकसभेच्या जालना मतदारसंघातून काँग्रेसकडून आमदार डॉ. कल्याण काळे यांची उमेदवारी निश्चित झाली असून, आता त्यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्य़ातील जबाबदार नेत्यांमध्येही आता याबाबत काही साशंकता नसल्याचे चित्र आहे. काँग्रेसकडून संजय लाखे, विलासराव खरात व आमदार काळे प्रमुख इच्छुक उमेदवार आहेत. प्रारंभी डॉ. काळे इच्छुक नव्हते.

सत्तावीस उपअधीक्षकांच्या बदल्या
नांदेड, २७ मार्च/वार्ताहर

राज्याच्या वेगवेगळ्या भागात कार्यरत असलेल्या २७ पोलीस उपअधीक्षकांच्या आज तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. त्यात मराठवाडय़ातील पाच अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
कंधार उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक कालिदास सूर्यवंशी यांच्या विनंतीवरून पुणे शहरात बदली करण्यात आली आहे.

विनासायास पंक्तिप्रपंच!
आसाराम लोमटे
परभणी, २७ मार्च

खासदार तुकाराम रेंगे यांनी गेल्या पाच वर्षांत केलेली सर्वात उल्लेखनीय कामगिरी म्हणजे त्यांनी पक्षाला केलेला ‘जय महाराष्ट्र’! या कारकिर्दीत त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटलेला विकासनिधी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरला. हा निधी हेसुद्धा रेंगे आणि शिवसैनिकांमध्ये नाराजी निर्माण करण्याचे कारण ठरले. विकासनिधीतून मतदारसंघातली जनतेची कामे करण्याची असतात, हे साधे सूत्र असले तरीही सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी आपले कार्यकर्ते टिकविण्यासाठी या निधीचा वापर करतात.

स्वत:च्या मनाचा एक्स-रे रिपोर्ट
मी लिहिलेल्या कथांपैकी माझ्या काही कथा स्वत:चा शोध घेणाऱ्या होत्या, त्याही विशीत असतानाच्या. एका कथेचं नाव होतं - ‘स्वत:च्या मनाचा एक्स-रे रिपोर्ट’. आज ही इतर कथा जेव्हा वाचतो, वाटतं स्वत:चा शोध ही माणूसपणाची निरंतर प्रतिक्रिया आहे. माझी आजही ती चालू आहे व त्यातच माझ्या माणूसपणाचं सार्थक आहे. बऱ्याच वर्षांपासून माझ्या संग्रही दोन पुस्तकं आहेत. ह्य़ूज प्राथेर यांची. एक ‘नोट्स टू मायसेल्फ’ आणि दुसरं त्यानं पत्नीसह लिहिलेलं ‘नोट्स टू इच-अदर’.

‘ताईं’च्या कामाबाबत नाराजी
विकासाभिमुख उमेदवारालाच निवडून देण्याचा निर्धार
सतीश टोणगे
कळंब, २७ मार्च

महिलांचे प्रश्न महिलाच सोडवू शकतात, असे म्हटले जाते. परंतु उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या महिला खासदाराने, या मतदारसंघातील महिलांसाठी काय केले याची चर्चा महिलांमध्ये आहे. या लोकसभा निवडणुकीत पुरुष मंडळी जे सांगतील त्यांनाच मतदान करण्याचा निर्धार महिलांनी केला आहे.

स्वत:भोवती घेता गिरक्या
व्यक्तिमत्त्व विकास

अनेकांना मित्रमंडळींशी किंवा नातेवाईकांशी गप्पागोष्टी करताना स्वत:बद्दल आणि स्वत:च्या कुटुंबीयांबद्दल सतत बोलत राहण्याची सवय असते. स्वत:चे कर्तृत्व, वैभव, सुख-दु:ख याखेरीज त्यांना कशातच रस वाटत नाही. दुसऱ्यांचे यशापयश, सुख-दु:खे, कार्य, कौशल्ये हे सारे त्यांच्या दृष्टीने दुय्यम असते. आणि अशा एखाद्या गप्पांच्या मैफलीत ते कधीच रममाण होत नाहीत.

लाच घेताना तलाठय़ाला अटक
उस्मानाबाद, २७ मार्च/वार्ताहर

परंडा न्यायालयाच्या सूचनेनुसार भावाच्या नावाचा फेरफार करण्यासाठी ओढून उतारा देण्याकरिता कंडारी (तालुका परंडा) सज्जाचा तलाठी मधुकर भिकाजी ठोसर याला २ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना काल उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पकडले. त्याच्या मुलालाही अटक करण्यात आली.कंडारी येथील शेतकऱ्याने दिवाणी न्यायालयात आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर भावाचे व आई-वडिलांचे नाव लावण्यासाठी दावा दाखल केला होता. जमिनीवर नावे लावण्याचा हुकूमनामा न्यायालयाने दिला. त्याची प्रत देऊन त्यांनी तलाठी मधुकर ठोसर याला फेर ओढण्याची विनंती केली. त्यासाठी ठोसर याने १० हजार रुपये लाच मागितली. तडजोडीनंतर २५०० रुपये देण्याचे मान्य करून ती रक्कम देण्याकरिता काल परंडा येथील आपल्या घरी बोलावले होते. दरम्यान, या शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याशी संपर्क साधून तक्रार केली. पोलीस उपअधीक्षक युनूस शेख यांच्या सहाय्याने सापळा रचला. लाच घेताना ठोसर व त्यां मुलगा राहुल ठोसर यांना पकडण्यात आले. दोघांना अटक करून परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तापाचे चार रुग्ण
सोयगाव, २७ मार्च/वार्ताहर

गुढीपाडव्याच्या निमित्ताने सुरू होणाऱ्या नूतन वर्षांच्या स्वागतासाठी सर्वत्र गुढी उभारून स्वागत होत असताना, या सणावर हिवरी गावात मात्र तापाच्या साथीचे सावट होते. दरम्यान, आज गावातील चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.आज गुढी पाडवा असताना गोडधोड करायचे तर दूर राहिले; गावात घराघरात शाळकरी विद्यार्थी रुग्णांची सेवा करीत होते. डॉक्टरांचे एक पथक सर्व साधनसामग्रीसह गावात आहे.

पाणीपुरवठा सुरळीत!
औरंगाबाद, २७ मार्च/प्रतिनिधी

मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे काल सायंकाळी विस्कळित झालेला पाणीपुरवठा आज सायंकाळपासून सुरळीत होऊ लागला. वेळापत्रकानुसार विलंबाने पाणी येत असले तरी आज पाणी मिळाले. बिडकीन येथे १४०० मिलीमीटर व्यासाची वाहिनी फुटल्यामुळे दुपारपासूनच शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. काल रात्री दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर या वाहिनीतून शहरात पाणी येण्यास सुरुवात झाली. वेळापत्रकानुसार काल दुपारी जेथे पाणी द्यायला हवे होते तेथे रात्री पाणी देण्यात आले. शुक्रवारी सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होऊ लागल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

रुग्ण महिलेचा मृत्यू; डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
जालना, २७ मार्च/वार्ताहर

रुग्ण महिलेस चुकीचे इंजक्शन देऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून जिल्ह्य़ातील बदनापूर येथील डॉ. सुरेश कासट यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
पार्वताबाई भाऊसाहेब काटे असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. उपचारासाठी आल्यानंतर इंजेक्शन दिल्यानंतर या महिलेच्या अंगावर सूज आली होती. प्रकृती आणखी खालाविल्यानंतर तिला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिथे तिचा मृत्यू झाला. बदनापूर पोलिसांनी या प्रकरणी डॉ. कासट यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

गादीचे दुकान जळाले; दीड लाखांचे साहित्य भस्मसात
गंगाखेड, २७ मार्च/वार्ताहर

शिवाजी चौकातील नया गादी घर हे दुकान दुपारी जळाले. यात सुमारे दीड लाखांचे साहित्य जळाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असे अग्रिशामक दलाचे म्हणणे आहे. शेख जमाल शेख महेमूद यांच्या मालकीचे हे दुकान आहे. दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. यात चायना आणि पांढरी रुई तसेच गादी तयार करण्याचे साहित्य जळून खाक झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

कॉपीमुक्तीच्या प्रयत्नाबद्दल अधिकाऱ्यांचा सत्कार
लातूर, २७ मार्च/वार्ताहर

कॉपीमुक्त बोर्ड परीक्षेसाठी प्रयत्न केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा शाखेच्या वतीने जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांचा गौरव करून अभिनंदन करण्यात आले. जिल्हाधिकारी एकनाथ डवले व जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या प्रेरणने व प्रयत्नामुळे लातूर जिल्ह्य़ातील दहावी, बारावी बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडल्या. या चांगल्या उपक्रमाबद्दल लातूर जिल्ह्य़ातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या वतीने शिक्षक सेनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी कल्याण सोनवणे, शिवाजी चंदनशिवे, गटशिक्षणाधिकारी रामराव पाटील, विस्तार अधिकारी पन्हाळे यांचा गौरव करून अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमास प्रभाकर बंडगर, मच्छिंद्र गुरमे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मालमोटार उलटली; मोटारीतील निम्मी द्राक्षे गायब
लोहा, २७ मार्च/वार्ताहर

सोलापूरहून नांदेडमार्गे ओरिसाकडे द्राक्षे घेऊन जाणारी मालमोटार आज पहाटे लातूर-लोहा रस्त्यावरील खेडकरवाडीजवळ उलटली. या अपघाताचा ‘फायदा’ घेत परिसरातील गावकऱ्यांनी द्राक्षाचे घड पळवून नेले. माळाकोळी -लोहा रस्त्यावर खेडकरवाडी जवळ एका पुलाच्या कठडय़ास मालमोटर (क्रमांक ओआर ०१जी ८६९६) धडकली व उलटली. द्राक्षांची मालमोटर उलटल्याची बातमी परिसरात पसरली. रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनधारक, गावकरी यांनी या गोड-आंबट द्राक्षांचा स्वाद घेत मिळेल तेवढी पळविली. निम्मी मालमोटर यात रिकामी झाली. चालक देवाशीष पिरपाळ अनंतकुमार मोहंती (वय २५, जोहमोंडा, बल्लारपूर) याने माळाकोळी पोलिसात त्यांनी तक्रार दिली. दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यात म्हटले आहे.

शरद पवार यांची सोमवारी सभा
उस्मानाबाद, २७ मार्च/वार्ताहर

डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची शहरातील पुष्पक मंगल कार्यालयाजवळील पुष्पक मैदानात शरद पवार यांची जाहीर सभा सोमवारी (दि. ३०)होणार आहे. तुळजापूर येथे तुळजाभवानीचे दर्शन घेऊन श्री. पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत प्रचारास प्रारंभ करतील. उस्मानाबाद जिल्ह्य़ात त्यांच्या दोन सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. दुसरी सभा औसा तालुक्यातील किल्लारी येथे होणार आहे.

मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन
अंबाजोगाई, २७ मार्च/वार्ताहर

लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन युतीच्या बूथप्रमुखांच्या बैठकीत करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र लोमटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात निवडणूक प्रचारयंत्रणेची आढावा बैठक घेण्यात आली. यात तालुक्यातील २०० बूथप्रमुख उपस्थित होते.

कर भरणीसाठी सुटीच्या दिवशीही कार्यालय सुरू
औरंगाबाद, २७ मार्च/प्रतिनिधी
आज शुक्रवारसह शनिवार आणि रविवारी अशा सलग तीन दिवस सुटय़ा आल्या आहेत. मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सुटीच्या दिवशीही मालमत्ता आणि पाणीपट्टी भरता यावी, यासाठी कार्यालये सुरू राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. आर्थिक वर्षे संपण्यासाठी आता चारच दिवस बाकी आहेत. गेल्या काही दिवसांपासून कराचा भरणा करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

जवाहर विहिरी वाटपाच्या आदेशाला आव्हान
औरंगाबाद, २७ मार्च/खास प्रतिनिधी

तालुक्यात मंजूर झालेल्या जवाहर विहिरीच्या प्रशासकीय मान्यतेला आव्हान देणारी आणखी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आली आहे. पंचायत समितीच्या सभापती संगीता घोडके यांनी ही याचिका केली आहे. न्यायालयाने याही याचिकेत सर्व प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले जाणार नाही, अशी हमी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या वतीने देण्यात आली. घोडके यांनी तत्कालीन संपर्कमंत्र्यांवर आक्षेप घेतला आहे.बैठका न घेता लाभार्थीची निवड करण्यात आली आहे आणि प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता अयोग्य आहे असे म्हटले आहे.

आशावादी दृष्टिकोन ठेवून चळवळ जिवंत ठेवावी - बावगे
निलंगा, २७ मार्च/वार्ताहर

सामाजिक व विधायक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जनतेकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल निराशवादी होण्यापेक्षा आशावादी दृष्टिकोन ठेऊन उपक्रमशीलतेच्या माध्यमातून सामाजिक चळवळ जिवंत ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह माधव बावगे यांनी केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बैठकीत श्री. बावगे बोलत होते. या वेळी डॉ. निंबाळकर, पंढरीनाथ जाधव, डॉ.भिकाणे, शिरमाळे आदी उपस्थित होते. श्री. बावगे म्हणाले की, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची लातूर जिल्हा शाखा संघटनात्मक कार्यक्रमात व उपक्रमशीलतेत राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. चळवळीला संघटनात्मक बांधणी आवश्यक असून यामुळे चळवळीला बळ प्राप्त होते. विधायक चळवळीमुळे कार्यकर्त्यांला व संघटनेला दोघांनाही प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. नियोजनपूर्वक कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी केल्यास चळवळीच्या कामास यश प्राप्त होऊ शकते.

ग्रामपंचायत पोटनिवडणुकांत भाजपचे वर्चस्व
बीड, २७ मार्च/वार्ताहर

केज तालुक्यातील बनसारोळा व माजलगाव तालुक्यां तील शिंदेवाडी ग्रामपंचायत पोटनिवणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले. लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीलाच ग्रामीण भागात भा. ज. प.चे वर्चस्व सिद्ध झाले आहे. केज तालुक्यातील बनसारोळा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भा. ज. प.च्या छाया विष्णू सरवदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश आडसकर गटाच्या सरवंदा दत्तू डोणे यांचा ८८ मतांनी पराभव केला. मेघराज आडसकर गावात तळ ठोकून होते, पण उमेदवाराचा विजय झाला नाही. माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकालही भा. ज. प.च्या बाजूने लागला. पक्षाचे सखाराम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्ता शिंदे यांचा पराभव केला. गावकऱ्यांनी शिंदे यांची विजयी मिरवणूक काढली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पोटनिवडणुकीत भा. ज. प.च्या उमेदवाराने विजय मिळविल्याने कार्यकर्त्यांत उत्साह वाढला आहे.

‘कार्यकर्त्यांची भावनाच विलासरावांनी व्यक्त केली’
लातूर, २७ मार्च/वार्ताहर
‘स्वबळावर लढलो असतो तर काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या असत्या,’ असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केले होते. विलासरावांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केली आहे, असे सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दायमा यांनी आज पत्रकार बैठकीत सांगितले. श्री. दायमा म्हणाले की, आपला विदर्भ व मराठवाडय़ाचा दौरा पूर्ण झाला असून उर्वरित महाराष्ट्रात सेवादलाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण जात आहोत. सव्वीस जागांपैकी काँग्रेस १९ जागा जिंकील. त्यात विदर्भातून ५, मराठवाडय़ातून ४, पश्चिम महाराष्ट्रातून ४, मुंबईतून ४ व कोकणातील ३ जागांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस १२ जागांवर विजय मिळवील, असे सांगून श्री. दायमा म्हणाले की, जालन्याची जागा खेचून आणण्यासाठी प्रयत्न करावा लागतो आहे. उर्वरित दोन्ही जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील. सेवादलाचे कार्यकर्ते मतदान केंद्रांवर लक्ष देऊन काम करीत आहेत. आता काँग्रेसमध्ये कोणतीही गटबाजी शिल्लक नाही. पत्रकार बैठकीस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबकदास झंवर, नगराध्यक्ष व्यंकट बेद्रे उपस्थित होते.

अशोक आघाव अपघातातून बचावले
परतूर, २७ मार्च/वार्ताहर
तालुक्यातील रायपूर गावानजीक जीप उलटून झालेल्या अपघातातून जालना जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अशोक आघाव सुदैवाने बचावले. हा अपघात आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास झाला. तालुक्यातील खांडवी येथे एका दुकानाच्या उद्घाटनासाठी श्री. आघाव हे जीपमधून खांडवीकडे निघाले होते. रायपूर गावानजीक जीपचे टायर फुटल्याने त्यांची गाडी उलटली. या वेळी झालेल्या अपघातात ते जखमी झाले. त्यांना तातडीने परतूरच्या श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आघाव यांच्या छातीला डाव्या बाजूला मार लागल्याचे डॉ. संदीप आ. चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान त्यांना पुढील उपचारार्थ जालन्याला हलविण्यात आले आहे. अपघाताचे वृत्त कळताच आमदार सुरेशकुमार जेथलिया, शिवसेनेचे तालुकाप्रमुख माधवराव कदम, संजय गोंडगे, नगरसेवक अशोकराव उबाळे, राजू भुजबळ, बाबूराव हिवाळे, अशोक बरकुले, अविनाश शहाणे यांनी दवाखान्यात येऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आघाव यांच्यासह गाडीचा चालक बिभिषण ननवरे व गणेश माने यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.

काँग्रेसचे नगरसेवक मंडलेचा यांच्याविरूद्ध मारहाणीचा गुन्हा
सिल्लोड, २७ मार्च/वार्ताहर
काँग्रेसचे नगरसेवक विनोद मंडलेचा यांनी कैलास सोनवणे (खामगाव, तालुका फुलंब्री) यांना मारहाण करून डांबून ठेवल्याप्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. कैलास सोनवणे यांचा भाऊ काकासाहेब याच्यावर ९ फेब्रुवारीला डॉ. बी. जी. मंडलेचा यांनी उपचार केले होते. डॉ. मंडलेचा यांनी केलेल्या उपचारानंतर काकासाहेब यास रिअ‍ॅक्शन झाल्याने त्यास औरंगाबादला डॉ. हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी मंडलेचा यांनी केलेल्या उपचाराची माहिती मागितली. ही माहिती घेण्यासाठी कैलास सोनवणे डॉ. मंडलेचा यांच्याकडे गेले असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिल्याने कैलास व डॉक्टरांमध्ये वाद झालायाबाबत नगरसेवक विनोद मंडलेचा यांना समजल्यानंतर त्यांनी कैलासला शिविगाळ करून मारहाण केली व डांबून ठेवले,अशी तक्रार शहर पोलीस ठाण्याला दिल्याने काल रात्री त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

लातूरमध्ये नववर्षांनिमित्त एक हजार दिवे प्रज्वलित
लातूर, २७ मार्च/वार्ताहर

नववर्षांच्या पूर्वसंध्येस आयोजित करण्यात आलेल्या ‘जागो हिंदुस्तानी’ कार्यक्रमास लातूरकरांचा मोठाप्रतिसाद मिळाला. यावेळी एक हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले. नववर्षांचे स्वागत करण्यासाठी रणसम्राट क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने बंकटलाल इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात भव्य रांगोळी काढण्यात आली होती. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर ‘जागो हिंदुस्तानी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन स्वातंत्र्यसैनिक चंद्रशेखर बाजपाई यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात मंदार भाटे, विजय वलिवंडे, श्वेता जोग, अर्चना नलावडे, मोनाली यांनी गीते सादर केली. अतुल नाईक, गिटारवर गणेश भोसले, ढोलकी संदेश, तबल्याची साथ स्वप्नानंद जाधव, ट्रीपलवर रघुनंदन येतीवडेकर, साईड ऱ्हीदमवर श्रीधर येतीवडेकर यांनी साथ दिली.

मारुती ससाणे यांचे निधन
लोहा, २७ मार्च/वार्ताहर

आष्टूर येथील ज्येष्ठ नागरिक मारोती ससाणे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्यावर उद्या (शनिवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, पाच मुलगे, एक मुलगी, स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे.