Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पुनम-राज भेटीने राजकीय चर्चाना उधाण
मुंबई, २७ मार्च/प्रतिनिधी

 

ईशान्य मुंबईतून भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्याच्या पाश्र्वभूमीवर आज पूनम महाजन यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यामुळे पूनम महाजन या मनसेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्यांना ऊत आला. मात्र आपण मनसेमध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राज ठाकरे व आपल्या कुटुंबाचे गेली अनेक वर्षे जिव्हाळ्याचे संबंध असून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण त्यांची भेट घेतल्याचे पूनम महाजन यांनी स्पष्ट केले.
पूनम महाजन यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्यामुळे संपूर्ण मुंडे-महाजन कुटुंबीयच नाराज आहेत. त्यामुळे पूनम महाजन यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यावर राजकीय गोटांमध्ये चर्चेला उधाण आले. ईशान्य मुंबईमधून आता मनसे शिशिर शिंदे यांच्याऐवजी पूनम महाजन यांना लढविणार असल्याच्याही बातम्या राजकीय वर्तुळात चघळल्या जाऊ लागल्या. मात्र राज ठाकरे यांची भेट घेऊन बाहेर पडल्यावर पूनम महाजन यांनी पत्रकारांना ही भेट निव्वळ व्यक्तिगत मैत्रीपोटी असल्याचे सांगितले.
शिवसेना-भाजपा यांच्यातील संबंध तुटेपर्यंत ताणले गेल्यावर राज ठाकरे यांचा मनसे हा पुढील निवडणुकांमध्ये भाजपाचा मित्रपक्ष होऊ शकतो, असे भाजपचे अनेक नेते खाजगीत सांगत होते. आता पूनम महाजन यांनाच उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या घेतलेल्या भेटीतून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. स्वत: पूनम महाजन यांनी ही भेट पाडव्यानिमित्त होती, असे सांगितले तरीही राजकीय वर्तुळात मात्र त्यांच्या या खुलाशावर विश्वास ठेवण्यास कोणीही तयार नाही.