Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पाकिस्तानात मशिदीवर आत्मघाती हल्ला
५० ठार, १०० जखमी
इस्लामाबाद, २७ मार्च/वृत्तसंस्था

 

पाकिस्तानच्या सध्या अस्वस्थ असलेल्या वायव्य सरहद्द प्रांतातील खैबर आदिवासी भागात एका दुमजली मशिदीत शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी सारे जमले असताना एका दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेला एक ट्रक मशिदीवर धडकवल्याने ५०जण जागीच ठार झाले असून १०० हून अधिक जखमी झाले आहेत. खैबर आदिवासी प्रांतातील जामरूद भागात ही मशीद असून पाकिस्तानातील हा सर्वात खतरनाक दहशतवादी हल्ला आहे. जेव्हा हा स्फोट झाला तेव्हा जवळपास ३०० जण मशिदीत प्रार्थनेसाठी जमले होते.
खैबर एजन्सीचा सहाय्यक राजकीय प्रतिनिधी फिदा बंगश यांनी सांगितले की, या हल्ल्यामध्ये एकूण १५जण ठार झाले असून त्यामध्ये स्थानिक प्रशासन व खसादार पथकातील १५ जणांचा समावेश आहे. स्फोट झाल्यानंतर त्याच्या तडाख्याने भिंती कोसळल्या व त्या ढिगाऱ्याखाली अनेक माणसे अडकलेली असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. खसादार पथकाचे एकूण ३० सैनिक या स्फोटाच्या वेळी मशिदीत होते व त्यांना लक्ष्य करण्यासाठीच हा आत्मघाती हल्ला झाला असावा, असे मानण्यात येत आहे. काही मृतदेह ओळखता न येण्याइतके भाजले गेले असून जखमींना पेशावर व जामरूद येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
जामरूद हे पाकिस्तानच्या अफगाणिस्तानला लागून असलेल्या खैबर प्रांतात असून तेथे दहशतवाद्यांनी आपले हल्ले तीव्र केले आहेत. नाटो आणि अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या फौजांना रसद पुरविणाऱ्या ट्रक्सवर या भागात नेहमीच हल्ले चढविले जातात. आदिवासी अनेक गट तेथे कार्यरत असून प्रत्येक गटांत प्रचंड दुश्मनी आहे. या दुश्मनीतूनच हा हल्ला झाला असावा, असे मानण्यात येत आहे.