Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

भाजपने आम्हाला वनवासात पाठवले
मुंबई, २७ मार्च/प्रतिनिधी

 

ईशान्य मुंबईतून माझे वडिल प्रमोद महाजन यांनी तीन वेळा निवडणूक लढविली होती. १९९६ साली ते निवडून आले होते. आज ते हयात असते तर त्यांनी या मतदारसंघातून निश्चितपणे निवडणूक लढविली असती. पूनमला या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली असती तर ती निवडून आली असती व माझ्या वडिलांचे स्वप्न तिने पूर्ण केले असते. माझे वडील भाजपचे लक्ष्मण होते. पण त्याच भाजपने आम्हाला वनवासात पाठवले, अशी अस्वस्थता आज राहुल महाजन यांनी प्रकट केली.
‘राहुल महाजन निवडणुकीच्या आखाडय़ात’ या ‘लोकसत्ता’तील वृत्तामुळे राजकीय वर्तुळात उडालेल्या खळबळीनंतर राहुल महाजन यांनी दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला आणि आपण निवडणूक लढण्याचा अद्याप विचार केलेला नाही. मात्र आपण लढणार नाही, असेही नाही, असे सांगत किरीट सोमय्या यांच्यासाठी अचानक उपटलेली डोकेदुखी कायम ठेवली. पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारल्यामुळे राहुल महाजन अत्यंत नाराज असून आज त्यांनी ती प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली.
पूनमला उमेदवारी मिळाली असती तर मी तिचा नक्कीच प्रचार केला असता, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या किरीट सोमय्या यांचा प्रचार करणार नाही, असेही स्पष्ट केले. पूनम भविष्यातील २० वर्षांचा विचार करून राजकीय क्षेत्रात आली आहे. त्यामुळे तिने राज ठाकरे यांच्या घेतलेल्या भेटीचे दुसरे कोणतेही अन्वयार्थ काढू नयेत. ती मनसेमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही, या पूनम महाजन यांच्या वक्तव्याचाच राहुल यांनी पुनरुच्चार केला.
महाजन यांच्या हत्येनंतर त्यांची पत्नी रेखा महाजन यांना राज्यसभेवर पाठविण्याची मागणीही भाजपाने धुडकावून लावली होती. आता त्यांची मुलगी पूनम महाजन यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. एकीकडे जसवंत सिंग, वसुंधरा राजे, राजनाथ सिंग, शिवराजसिंग चौहान, येडीयुरप्पा यांच्या मुलांना, जावयांना भाजपने तिकीटे दिली आहेत. अगदी संजय गांधी यांच्या घराण्यातही मनेका गांधी व त्यांचा मुलगा वरुण गांधी या दोघांना उमेदवारी देण्यात आली आहे. मग भाजपाला आता महाजन यांच्या कुटुंबापेक्षा संजय गांधी यांचे कुटुंब महत्त्वाचे वाटू लागले आहे का, असा सवाल राहुल यांचे निकटवर्तीय करीत आहेत. घराणेशाही नको असेल तर ज्या गांधी घराण्याच्या विरोधात आणीबाणीत आंदोलन केले त्या संजय गांधी यांच्या घराण्याला विरोध करावा व नंतर प्रमोद महाजन यांच्या कुटुंबीयांना, असे आता महाजन कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.