Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

असाध्य कर्करोगाने पांढरी वाघीण बेजार!
मुंबई, २७ मार्च/ प्रतिनिधी

 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रेणुका ही १२ वर्षांची पांढरी वाघीण त्वचेच्या असाध्य कर्करोगाने (कॅन्सर) ग्रस्त असल्याने तिथल्या कर्मचारी व डॉक्टरांमध्ये सध्या कमालीची अस्वस्थता पसरली आहे. रेणुका केवळ एक वर्षांची असताना तिला औरंगाबाद येथील प्राणीसंग्रहालयातून या उद्यानात आणले गेले. आता तिला कॅन्सरने ग्रासले असून तिच्या जगण्याची शक्यता धूसर होत असल्याने, शेवटपर्यंत प्रयत्नांची पराक ष्ठा करायची या ईष्र्येने डॉक्टर, तज्ज्ञ आणि तिच्यावर अपरंपार प्रेम करणारे उद्यानातील कर्मचारी तिची काळजी घेत आहेत. उपचारांमध्ये कुठेही काहीही कमी पडू नये याकडे ते कटाक्षाने लक्ष देत आहेत.
‘मॅलिग्नंट मेलानोमा’ या अत्यंत असाध्य अशा त्वचेच्या कर्करोगाची रेणुका बळी ठरली आहे. माणसांमध्ये गोऱ्या कातडीच्या व्यक्तींना हा कर्करोग होतो. गोऱ्या त्वचेत मेलानिनची कमतरता असते. त्यामुळे खास करुन युरोप, अमेरिकेतील माणसांना हा विकार होतो. राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यक डॉ. विनया जांगळे म्हणाल्या की, ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदा आम्हाला तिच्या डोळयाखाली या कर्करोगाची लागण झाल्याचे आढळून आले. हे लक्षात येताच तिला लेझर उपचार देण्यात आले. पण आता तिच्या घशात पुन्हा याच कर्करोगाची लागण झाल्याचे आढळून आले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, आता ही लागण रेणुकाच्या फुफ्फुसापर्यंत पसरल्याचे एक्स-रेमध्ये लक्षात आले. सध्या तिला केमोथेरपी देण्यात येत आहे. गुरुवारी टाटा मेमोरिअल रुग्णालयातील तज्ज्ञांनी संजय गांधी उद्यानाला भेट देऊन रेणुकाची तपासणी केली. या रुग्णालयाच्या ‘अ‍ॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अ‍ॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर’ या विभागातील डॉक्टर प्रदीप चौधरी यांनी रेणुकाची तपासणी केली आणि दुर्दैवाने तिची स्थिती फारशी आशादायक नसल्याचे सांगितले. त्यांच्याच मताला दुजोरा दर्शवत डॉ. जांगळे यांनी सांगितले की, आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. केमोथेरपी सुरु आहे. पण रेणुकाच्या जगण्याची आशा मात्र मावळत आहे. तिला सांभाळणारे मुकेश मोरे यांना तर खूपच धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून रेणुकाला सतत कोणत्या ना कोणत्या उपचाराला सामोरे जावे लागत आहे. तिला भूल देण्यात आली आहे. मात्र घशात कर्करोग होऊनही तिच्या खाण्यावर या उपचारांचा काहीच परिणाम न झाल्याचे मोरे यांना आश्चर्य वाटत आहे. सध्या सगळेचजण प्रचंड ताणाखाली असल्याचे त्यांनी सांगितले. बॉम्बे व्हेटरनरी कॉलेजचे माजी प्राध्यापक डॉ. चंद्रकांत वाकणकर यांनी सांगितले, की रेणुका उपचारांना कसा प्रतिसाद देते यावरच सगळे अवलंबून आहे.