Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
प्रादेशिक

हिंदू नववर्षांचे मुंबापुरीत जल्लोषात स्वागत
मुंबई, २७ मार्च/प्रतिनिधी

मराठी ‘अस्मिता’, मराठी ‘मन’ असा जयघोष करीत आज मुंबईसह राज्यभरात सर्वत्र गुढीपाडव्यानिमित्त मराठी परंपरा- संस्कृती दाखविणाऱ्या शोभायात्रा काढून नववर्षांचा जल्लोष साजरा करण्यात आला. दहशतवाद- जागतिक मंदीच्या छायेची झलक दाखविणारे चित्ररथ, देखावे हे यंदाच्या सर्वच शोभायात्रांचे मुख्य आकर्षण ठरले. सकाळीच घरोघरी गुढय़ा उभारून अनेकजण नंतर शोभायात्रांमध्ये सामील झाले होते. नाशिक बाजा, ढोल-ताशांच्या तालांवर जल्लोषात सकाळपासूनच शोभायात्रांना सर्वत्र सुरुवात झाली..

चैत्रोत्सवाच्या स्वागतयात्रेत बहरली डोंबिवली
डोंबिवली, २७ मार्च/प्रतिनिधी

नववर्षांच्या पूर्वसंध्येला लक्ष आवर्तन, दीपोत्सव, विविध स्पर्धा, रंगीबेरंगी आतषबाजी आणि रांगोळयांनी शहरातील वातावरण भारून गेलेले असतानाच, आज भल्या सकाळी विविध प्रकारचे रंगीबेरंगी पेहराव, पोशाखात शहरातील बालगोपाळ, महिला-पुरूष, तरूण-तरूणी, आजी-आजोबा मोठय़ा उत्साहाने नववर्ष स्वागतयात्रेत सहभागी झाले आणि तब्बल तीन तास विविध रस्त्यांवर आज डोंबिवली शहर फुलले, बहरले आणि बागडले. नववर्षांच्या या स्वागत्सोवाला शुभाशिर्वाद देण्यासाठी कोल्हापुर पीठाचे शंकराचार्य प.पू.श्री नृसिंह भारती उपस्थित होते.

हायकोर्टाने सेशन्स कोर्टाना करून दिले अधिकाराचे स्मरण
मुंबई, २७ मार्च/प्रतिनिधी

ज्या आरोपीस दंडाधिकाऱ्यांनी पोलीस रिमांड दिला आहे अशा आरोपीने त्या रिमांडच्या कालावधीत दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ४३९ अन्वये जामिनासाठी केलेला अर्ज आपण ऐकूही शत नाही हा मुंबईसह राज्याच्या इतरही अनेक जिल्ह्यांमधील सत्र न्यायालयांनी करून घेतलेला समज कायद्याला धरून नाही, असा खुलासा उच्च न्यायालयाने केला असून पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीच्या जामीनअर्जावर सुनावणी घेण्यास सत्र न्यायालय नकार देऊ शकत नाही, असा निर्वाळा दिला आहे.

चेक न वटल्याचे सात हजार खटले लोकन्यायालयांत सुटले
मुंबई, २७ मार्च/प्रतिनिधी

मुंबईत गेल्या रविवारी महानगर दंडाधिकारी न्यायालयांमध्ये एकाच वेळी भरविण्यात आलेल्या ४६ लोकन्यायालयांमध्ये चेक न वटल्याबद्दल ‘निगोशिएबल इन्स्ट्रमेंटस् अ‍ॅक्ट’च्या कलम १३८ अन्वये दाखल केलेल्या सात हजारांहून अधिक खटल्यांमध्ये यशस्वी तडजोड होऊन १५ कोटी रुपयांहून अधिक रुपये वसूल झाले. याखेरीज औपचारिकरीत्या फिर्याद दाखल न झालेली याच वर्गात मोडणारी आणखी ४५१ प्रकरणेही ‘प्री लिटिगेशन स्टेज’ला तडजोडीने मिटली व त्यांत दोन कोटी रुपयांहून अधिक रक्कम वसूल झाली.

उत्तम खोब्रागडे यांनी केले बेकादेशीर कार्यालयाचे उद्घाटन
मुंबई, २७ मार्च / प्रतिनिधी

‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक उत्तम खोब्रागडे यांनी बेस्ट बहुजन कामगार युनियनच्या बेकायदेशीर कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यामुळे खोब्रागडे वादाच्या भोवऱ्यात सापडले असून या प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करण्यात येणार आहे. वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सिद्धार्थ विहार या वसतीगृहात हे कार्यालय थाटण्यात आले आहे. विशेष म्हणजे या वसतीगृहाच्या इमारतीला पालिकेने धोकादायक इमारत म्हणून नोटीस बजावली आहे.

११ वर्षांच्या तुरुंगवासानंतर आरोपीची निर्दोष मुक्तता
मुंबई, २७ मार्च/प्रतिनिधी

उच्च न्यायालयाने दरोडय़ाच्या खटल्यात अपिलात निर्दोष मुक्त केल्यानंतर झहीरुद्दीन ताजुद्दीन शेख हा आरोपी तब्बल ११ वर्षांनंतर तुरुंगातून मुक्त झाला आहे. मुंबईत फोर्टमध्ये असलेल्या एशियाटिक ट्रॅव्हल सव्‍‌र्हिसेस या व्यापारी आस्थापनावर सशस्त्र दरोडा घातल्याच्या आरोपावरून झहीरुद्दीन यास १३ डिसेंबर १९९७ रोजी आझाद मैदान पोलिसांनी अटक केली होती.

खंडणी मागणारा फुलवाला गजाआड
ठाणे, २७ मार्च /प्रतिनिधी

सट्टेबाजीपायी झालेले कर्ज फेडण्यासाठी खंडणी वसुलीच्या मार्गावर गेलेल्या फुलवाल्याला खंडणीविरोधी पथकाने दोन लाखांची खंडणी घेताना रंगेहाथ पकडले. हिरानंदानी मेडोजमध्ये राहणाऱ्या एका व्यापाऱ्याकडे फळांच्या पिशवीतून दिलेल्या चिठ्ठीद्वारे त्याने १० लाख रुपयांची खंडणी मागितली. चिठ्ठीतील भाषा आणि मोबाईलवरील माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक भवारी व पथकाने बबलू गोरंग दलाई (२५) याचा शोध लावला. पवारनगरमध्ये नऊ वर्ष फुले विकणारा दलाई त्या व्यापाऱ्याकडे दररोज हार पोहचवित असे. एवढेच नव्हे तर गणपतीची सजावटही करत असे. मात्र त्याला लॉटरीचा नाद लागला आणि तो कर्जबाजारी झाला. हाताखालील नोकरांना पगारही देण्यास पैसा नसल्याने त्याने खंडणी उकळण्यास सुरुवात केली. अशाच प्रयत्नात तो रंगेहाथ सापडला. अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशांत बुरडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. दरम्यान कल्याणच्या गुन्हे अन्वेषण विभागाने बेनसोन जॉन मोटिस ऊर्फ नितीन पंडित सोनावणे याला चोरीच्या सहा मोटरसायकलसह अटक केली. पोलीस तपासात पाच गुन्हे उघडकीस आले. कोळसेवाडी, विठ्ठलवाडी आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल झालेले आहेत.

‘बार्बी डॉल’साठी ऐश्वर्याचा पुन्हा नकार
मुंबई, २७ मार्च/वृत्तसंस्था

‘बार्बी डॉल’ला आपला चेहरा देण्याला ऐश्वर्या रॉय-बच्चन हिने पुन्हा एकदा नकार दिला आहे. ऐश्वर्या ही सध्या कामात व्यग्र असून ‘बार्बी’ या बाहुल्यांच्या जागतिक ब्रँडला तिचे रुप देण्यासाठी करण्यात आलेली विनंती ऐश्वर्याने केवळ या कारणावरून अमान्य केली. मात्र ‘बार्बी’ निर्माती कंपनी अजूनही ऐश्वर्याच्या होकाराची अपेक्षा ठेवून असल्याचे समजते. मेटल टॉय ही कंपनी याबाबत ऐश्वर्याशी बोलणी करीत होती. हॉलीवूड आणि युरोपातील अनेक ‘सेलीब्रिटी’ चेहरे आजवर बार्बीच्या रुपात आले आहेत. ‘बार्बी’च्या निर्मितीला ५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने या कंपनीने ऐश्वर्याचा चेहरा बार्बीला देण्याचे ठरविले होते.

साध्वी प्रज्ञा सिंह रुग्णालयात दाखल
मुंबई, २७ मार्च / प्रतिनिधी
हातात गाठी झाल्याने तसेच अपचनाचा त्रास होऊ लागल्याने साध्वी प्रज्ञा सिंह हिला आज जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. साध्वी सध्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटकेत आहे. साध्वीची तब्येत अचानक बिघडल्याने तिचे वकील गणेश सोवनी यांनी आज ‘मोक्का’ न्यायालयात अर्ज करून साध्वीला रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश देण्याची विनंती ‘मोक्का’ न्यायालयाकडे केली होती. त्यावर न्या. वाय. डी. शिंदे यांनी साध्वीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. या आदेशानुसार साध्वीला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटाच्या आजारामुळे यापूर्वीही तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तुरूंगात दिल्या जाणाऱ्या जेवणात अंडी सापडल्याने साध्वीने तुरूंगातील जेवणाचा त्याग केला होता. त्यामुळे ती आजारी पडली होती व तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

दर्जाच्या निकषावरच मंत्र्यांच्या महाविद्यालयाला अनुदान
मुंबई, २७ मार्च / प्रतिनिधी

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्याशी संबंधित असलेल्या जालना येथील ‘मत्स्योदरी शिक्षण संस्थे’ला दर्जाच्या निकषावरच अनुदान देण्यात आले आहे. ‘आयसीएसएसआर’ने नेमलेल्या सल्लागार समितीने राज्यातील मागासलेल्या सात जिल्ह्यांतील प्रत्येकी एका महाविद्यालयाची या अनुदानासाठी निवड केली होती. यातील काही महाविद्यालये राजकीय व्यक्तींशी संबंधित असली तरी आमच्या सल्लागार समितीने केवळ समाजशास्त्रातील शैक्षणिक दर्जाचा निकष लावूनच या महाविद्यालयांची निवड केली आहे. या अनुदानातून मिळणारी पुस्तके विद्यार्थ्यांनाच उपयोगी पडणार आहेत; मंत्र्यांना नव्हे, असा खुलासा ‘आयसीएसएसआर’चे संचालक डॉ. व्यंकटेशकुमार यांनी केला आहे. ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या महाविद्यालयाला आयसीएसएसआरचे अनुदान’ या शिर्षकाखाली ‘लोकसत्ता’मध्ये २६ मार्च रोजी प्रकाशित झालेल्या वृत्तासंदर्भात व्यंकटेशकुमार यांनी सदर खुलासा केला आहे.