Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९

बार्बीने घडवला इतिहास!
प्रतिनिधी

जगभरातील लहान मुलींचे कायम आकर्षण ठरलेल्या बार्बीने आज लॅक्मे फॅशन वीकमध्ये चक्क रॅम्पवॉक करत एक वेगळाच इतिहास घडवला ! गेल्या ५० वर्षांंत बार्बीने केलेला हा पहिलाच रॅम्पवॉक होता! जगभरातील सर्वच लहान मुलांना गेली ५० वर्षे या बार्बीने वेड लावले आहे. ५० वर्षांंत बदलत गेलेले जग आणि बदलत गेलेली फॅशनही पाहिली. त्यानुसार तिनेही तिचे रूप बदलले. गेल्या काही वर्षांत तर तिने जगभरातील विविध राष्ट्रांमध्ये प्रवेश केला आणि त्या त्या प्रांतांतील रूपही तिने धारण केले. भारतात प्रवेश केल्यानंतर इथेही तिने चांगलीच लोकप्रियता मिळवली.. पण एवढय़ा वर्षांत बार्बी काही केवळ लहान मुलांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही तर ती आबालवृद्धांचे आकर्षण होवू पाहाते आहे. यंदा बार्बी तिचा अमृतमहोत्सव साजरा करते आहे. गेल्या काही वर्षांत तिला बाजारपेठेतील स्पर्धेलाही चांगलेच तोंड द्यावे लागले आहे.

चिंचपोकळी स्कायवॉकचा अट्टाहास कशासाठी?
कैलास कोरडे

रेल्वे स्थानकांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर ना वाहनांची गर्दी आहे; ना फेरीवाल्यांची. रस्त्यांवर चालताना पादचाऱ्यांना रहदारीचा फारसा अडथळाही होत नाही. भविष्यात रेल्वे स्थानक परिसरातील रहदारीत कोणताही आमुलाग्र बदल होण्याची शक्यताही नाही. मग चिंचपोकळी रेल्वे स्थानकाच्या दक्षिण टोकाला, पूर्व व पश्चिम दिशांना दोन स्कायवॉक कशासाठी बांधण्यात येत आहेत, याबद्दल स्थानिकही आश्चर्यचकीत झाले आहेत. या स्कायवॉकच्या उभारणीमागे नक्की काय गौडबंगाल आहे, असा प्रश्न स्थांनिकांना पडला. चिंचपोकळी रेल्वे स्थानकाबाहेरील दोन्ही स्कायवॉक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून बांधण्यात येत आहेत.

पोलिसांचा ‘जीवनरंग’ बदलतोय!
प्राजक्ता कदम

मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पोलिसांच्या समस्या आणि त्यांचे आयुष्य सर्वासमोर आले आणि अनेक संस्थां त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सरसावल्या. आजघडीला अनेक जण आपापल्या परीने त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र ‘जीवनरंग’ ही स्वयंसेवी संस्था त्यात उजवी ठरली आहे.

बचाव राणीची बाग..
शुभदा पटवर्धन

झाडांशी ओळख करून घेण्यासाठी, माहिती मिळविण्यासाठी अनेक दुर्मिळ वृक्ष बघण्यासाठी राणीच्या बागेला भेटी देणाऱ्या वृक्षप्रेमींची संख्या गेल्या काही वर्षांत निश्चितच वाढली आहे. जवळजवळ २२६ प्रकारची सुमारे तीन हजाराहून अधिक झाडे असणारी राणीची बाग म्हणजे वृक्षप्रेमंींच्या दृष्टीने नंदनवनच. साहजिकच वनस्पतीशास्त्राचे विद्यार्थी तर इथे येतातच, पण आजकाल सामान्य वृक्षप्रेमी आणि अभ्यासकही येथे आवर्जून भेट देऊ लागलेत.

‘इंडियन बकरा लीग’
सुनील िडगणकर

‘एप्रिल फुल डे’ला कोणाला ‘बकरा’ करता येईल, याविषयी सध्या विविध ग्रुपमध्ये काही छुपे प्लॅन सुरू असतील. मग एमटीव्हीची टीम कशी मागे राहील? सध्या ‘बकरा’चे एपिसोड सुरू नसले तरी १ एप्रिलसाठी एमटीव्ही बकरा किंग सायरस ब्रोचाने जोरदार तयारी सुरू केली. आयपीएलप्रमाणे एमटीव्हीवर आयबीएल (इंडियन बकरा लीग) आयोजित करण्यात आली आहे. बक ऱ्याचे लक्ष्य मुख्यत: क्रिकेटपटू असणार आहेत. राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, पार्थिव पटेल, मंदिरा बेदी, विनोद कांबळी यांना बकरा केलेले एपिसोड्स १ एप्रिलला दाखविण्यात येणार आहेत.

कधी सुरू होणार पुनर्विकास
शहर व उपनगरांत असलेल्या ५६ म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास रखडला आहे हे या स्तंभातून बऱ्याच वेळा लिहिले आहे. परंतु आता अनेक रहिवाशीही आपल्याला नवा पुनर्रचित फ्लॅट कधी मिळेल या आशेवर गेली दीड-दोन वर्षे आहेत. आता तरी म्हाडाने लवकरात लवकर प्रक्रिया सुरू करावी, अशी फक्त बिल्डरांचीच नव्हे तर तमाम रहिवाशांशी मागणी आहे. या सर्वांना एकच प्रश्न पडला आहे की, कधी सुरू होणार पुनर्विकास?

सरकारी विभागांना टेन्शन ‘टार्गेट’चे!
राजीव कुळकर्णी

सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीबरोबरच सरकारी-निमसरकारी कार्यालयांमध्ये ‘मार्च एंडिंग’ची धावपळ सुरू असून जागतिक मंदीच्या तडाख्यामुळे अनेक विभागांमध्ये महसूल वसुलीची उद्दिष्टपूर्ती होईल की नाही, याबद्दल अधिकारी धास्तावले आहेत.

मनोवृत्ती परिवर्तनाकडे लक्ष दिले पाहिजे -डॉ. गोपी मेनन
प्रतिनिधी

‘वनवासी आणि वंचित गटांच्या विकासासाठी कागदोपत्री बऱ्याच शासकीय योजना आहेत, पण त्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी गाव पातळ्यांवर चळवळ आणि जनजागृती झाली पाहिजे. बालविवाहास प्रतिबंध, सार्वत्रिक शिक्षण, लशीकरण, बालकांचे सुपोषण ही ध्येये गाठायची, तर गावागावांत, पाडय़ापाडय़ांत ते संकेत पाळण्याची मनोवृत्ती तयार झाली पाहिजे.

मिलिटरी स्कूलची प्रवेश प्रक्रिया सुरू
चालू शैक्षणिक वर्षांत सातारा जिल्ह्यातील देवीबाई नारायणदास छाबडा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या स्व. नारायणदास भावनदास छाबडा मिलिटरी स्कूल रायगांव येथे इयत्ता ५ वी १२ वी इंग्रजी माध्यम प्रवेश प्रक्रियेसाठी सुरुवात झाली असून अर्ज विक्री सुरू आहे. प्रवेश फॉर्म मिळण्यासाठीचा विहीत नमुन्यातील अर्ज विनामूल्य संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध आहे. शासनाच्या नियमानुसार अनुसूचित जाती १३%, अनुसूचित जमाती १८% इतर मागासवर्गीय १९%, विशेष मागासवर्गीय २% जागा राखीव आहेत.

जागतिक तापमान वाढीविरोधात वसुंधरा घटिका..
प्रतिनिधी

जागतिक तापमान वाढीविरोधात गेल्या दोन वर्षांपासून वसुंधरा घटिका (अर्थ अवर) हा कार्यक्रम राबविण्यात येत असून, यंदाही शनिवार २८ मार्च रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊ या वेळेत घरात, तसेच उद्योगधंद्याच्या ठिकाणी आवश्यक नसणारे दिवे, विजेवर चालणारी उपकरणे बंद करावी, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यांचे कर्मचारी, पर्यावरणप्रेमी आणि हरितसेनेचे विद्यार्थी या योजनेत सहभागी होत आहेत. २००७ मध्ये या उपक्रमात २२ लाख नागरिक सहभागी झाले होते. गेल्यावर्षी या मोहिमेला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. जगभरातून पाच कोटी नागरिक या मोहिमेत सहभागी झाले होते. यंदा ७४ देशांमधील एक अब्ज नागरिक या मोहिमेत सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. गुगल होम पेजही त्यादिवशी संपूर्ण काळ्या पाश्र्वभूमीवर इंटरनेटवर उपलब्ध असेल. या उपक्रमामुळे दिवसातील एकूण वीजवापर ५ ते १५ टक्क्यांनी कमी होणार आहे. एक तास वीजवापर कमीतकमी करून नागरिकांनी जागतिक तापमानवाढीविरोधात आपले मत नोंदवावे, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

उद्या रंगणार अनोखा फ्यूजन सोहळा
प्रतिनिधी
तबला-ड्रम्स या वाद्यांचे फ्यूजन आपण अनुभवले असेल पण नृत्य, सतार आणि ड्रम्स यांचे फ्यूजन हा आगळावेगळा प्रकार आहे. उद्या, रविवारी वांद्रे येथील शारदा संगीत विद्यालयात ड्रम्सवादक मुकुल डोंगरे, सुप्रसिद्ध नृत्यांगना अदिती भागवत आणि सतारवादक रवी चारी यांचे फ्यूजन ‘तालात्मा’ अनुभवण्याची संधी रसिकांना उपलब्ध होणार आहे. तालवाद्यांच्या सुश्राव्य संगीताबरोबरच किराना घराण्याचे गायक व संगीतविषयक लेखन करणारे अमरेंद्र धनेश्वर यांचे गायनही सादर होणार आहे. स्वर संस्कृती म्युझिक अ‍ॅकॅडमी आणि शारदा संगीत विद्यालय यांच्या वतीने २९ मार्चला शारदा संगीत विद्यालय, कला नगर, वांद्रे येथील डी. व्ही. पलुस्कर हॉलमध्ये हे दोन्हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहेत. यात सहभागी होण्यासाठी रसिकांनी २६५९०४३३/९८९२४१६६९८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजक संस्थांनी केले आहे.

प्रभात भ्रमण मंडळाचा आज सुवर्णमहोत्सव
प्रतिनिधी

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे साठय़े महाविद्यालय आणि प्रभात भ्रमण मंडळ (मॉर्निग वॉक क्लब) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, २८ मार्च रोजी मंडळाचा सुवर्णमहोत्सवी सोहळा साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळा सायंकाळी ५.३० वाजता साठय़े महाविद्यालय सभागृह, साठय़े महाविद्यालय, दीक्षित मार्ग, विर्लेपार्ले (पूर्व) येथे होणार असून ‘महाराष्ट्र टाईम्स’चे कार्यकारी संपादक अशोक पानवलकर हे सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित
राहणार आहेत. याशिवाय साठय़े महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कविता रेगे याही या सोहळ्यात मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात एक लघुपटही दाखविण्यात येणार आहे.

गोमंतक मराठी समाजातर्फे उद्या महिला मेळावा
प्रतिनिधी
गोमंतक मराठी समाजातर्फे महिलादिनाचे औचित्य साधून २९ मार्च रोजी महिला मेळावा भरविण्यात आला आहे. हा मेळावा सकाळी ११ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत अंधेरी येथील संस्थेच्या सभागृहात भरणार आहे. या मेळाव्यात ताण-तणाव मुक्ती व्यवस्थापन, आहार संतुलन तसेच आर्थिक नियोजनासंदर्भात आहार तज्ज्ञ लीना पेडणेकर, अर्थतज्ज्ञ नीता फातर्पेकर मार्गदर्शन करणार आहेत. समारोपाच्या कार्यक्रमाला पत्रकार सारिका भोईटे-पवार या प्रमुख पाहुण्या म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी हिरकणी पुरस्कार विजेत्या कांचन सोनटक्के, शास्त्रीय गायिका मीना फातर्पेकर तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. दिलखुश किशनचंदानी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

निवडणूकविषयक पत्रकारिता कार्यशाळा
ज्ञानशक्तीमंचाच्या वतीने येत्या ३० मार्च रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे ‘लोकसभा-विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी’ या विषयावर प्रशिक्षणार्थी, पत्रकार, वृत्तपत्रलेखक आदींसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे. निवडणूकविषयक लेखन व संपादन कसे करावे यावर लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी, खासदार व पत्रकार भारतकुमार राऊत, दै. ‘नवशक्ति’चे संपादक प्रकाश कुलकर्णी, ‘स्टार माझा’चे राजीव खांडेकर, प्रकाश अकोलकर, हेमंत देसाई आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी ९८३३८९५३७२ ते ७५ या क्रमांकांवर संपर्क साधावा.