Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नगरमध्ये दुचाकी वाहनांची मोठी विक्री झाली. सराफी पेढय़ा गजबजल्या होत्या.

मंदीतही वाहनबाजार फुलला, सुवर्णखरेदीसाठी गर्दी!
नगर, २७ मार्च/प्रतिनिधी

जागतिक मंदीचे सावट असूनही गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तामुळे आज बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली. नगरचा वाहनबाजार व सराफबाजार सणामुळे चांगलाच फुलला होता. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने नागरिक आवर्जून सोन्याची खरेदी करतात. आज सराफ बाजारातील नामांकित पेढय़ांवर मोठी गर्दी दिसत होती. मात्र, तुलनेत वाहन खरेदीकडे लोकांचा कल अधिक होता. विशेषत मोटरसायकलींची मोठय़ा प्रमाणात विक्री झाली. शहरातील विविध शोरूममधून सुमारे दोन हजारांवर गाडय़ांची विक्री झाल्याचा अंदाज आहे.

नगर, शिर्डी जिंकण्याचा निर्धार
नगर, २७ मार्च/प्रतिनिधी

विरोध, मतभेद यांना तिलांजली देऊन फक्त नगरच नाही, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघावरही विजयाचे निशाण रोवण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा पदाधिकारी मेळाव्यात आज करण्यात आला. नगरची उमेदवारी न मिळालेल्या अभय आगरकर यांनी विरोधाची तलवार म्यान करत असल्याचे सांगितले, तर उमेदवारी मिळालेल्या दिलीप गांधी यांनी मनात कोणतीही कटूता नसल्याचे जाहीर केले. प्रथम आगरकर व नंतर गांधींबरोबर असलेले जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी मुळात मतभेद कधी नव्हतेच, असे सांगून टाकले.

स्वप्नातलं गाव (भाग १)
वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळं आमचं बिऱ्हाड सतत हलतं असायचं. त्यामुळे एकच एक गावचा ठसा मनावर आणि बालपणावर उमटला नाही. न आठवण्याच्या वयातलं अगदी धूसर काही तरळतं, पण स्पष्ट नाही. बालपणातल्या ठसठशीतपणे आठवणाऱ्या माझ्या काही गोष्टी कोल्हार गावातल्या आहेत. आठवणीतलं क ोल्हार नितांत रमणीय आहे. खूप देवळं, मशीद, नदीवरचा घाट, डोह, पाण्यातले भोवरे, पूर आणि त्या भोवतालच्या दंतकथा.. या सगळ्यांभोवतीचे दरवळ आजही माझ्या मनात भिनलेले आहेत. आमचे पहिली-दुसरीचे वर्ग गावापासून थोडंसं लांब असलेल्या महादेवाच्या देवळाच्या परिसरात भरायचे. इथं मोठ्ठं, जुनं खोड असलेलं भोकराचं झाड होतं. या झाडाखालीच आमची शाळा भरायची.

पोलीस अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांना मारहाण; चौघे जखमी
रिलायन्स गॅसवाहिनी
कर्जत, २७ मार्च/वार्ताहर
शेतकऱ्यांचा विरोध असतानाही पोलिसांच्या मदतीने दडपशाहीचा वापर करून रिलायन्स गॅस कंपनीने थेरवडी येथे आज काम सुरू केले. या वेळी जमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना जबर मारहाण केली गेली. त्यात चारजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी महिलेची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे.

काळेंच्या निर्णयास निष्ठावंतांचा विरोध
कोपरगाव, २७ मार्च/वार्ताहर

आमदार अशोक काळे यांनी शिवसेना म्हणजे स्वगृही राहण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत तालुक्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. जिल्हाप्रमुख (उत्तर) बाबासाहेब डमाळे, जिल्हा उपप्रमुख बाळासाहेब जाधव, तालुकाप्रमुख श्रीरंग चांदगुडे, विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र शेटे आदी निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी काळे यांच्या निर्णयास तीव्र विरोध दर्शविला. या संदर्भात त्यांनी येत्या सोमवारी (दि. ३०) कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे.

आरोग्य उपकेंद्रांवर अतिक्रमण!
एकात पोलीस चौकी, दोन ठिकाणी खासगी बिऱ्हाडे
नगर, २७ मार्च/प्रतिनिधी

जिल्हा परिषदेने नव्याने बांधलेल्या आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती अतिक्रमण करून बळकावल्या जात आहेत. पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील उपकेंद्र पोलीस खात्याने, तर जामखेड तालुक्यातील दोन इमारतींत खासगी व्यक्तींनी संसार थाटला आहे.

माजी उपआरोग्याधिकारी डॉ. गायकवाड यांचे निधन
नगर, २७ मार्च/प्रतिनिधी
महापालिकेचे माजी उपआरोग्याधिकारी डॉ. विल्यम रत्नाकर गायकवाड यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, ३ मुली असा परिवार आहे. गायकवाड २४ वर्षे पालिकेच्या सेवेत होते. चर्चच्या कामात त्यांचा सक्रिय सहभाग असे. किल्लारी भूकंपाच्या वेळी करण्यात आलेल्या मदतकार्यातही त्यांचे योगदान होते.

अपंगांच्या प्रश्नांसाठी तहसील कार्यालयात गुढी
कोपरगाव, २७ मार्च/वार्ताहर

अपंग, मतिमंद नागरिकांना सन्मान व सहिष्णूतेची वागणूक मिळावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी तहसील कार्यालयात गुढी उभारली. अपंग व मतिमंदांची संख्या वाढते आहे. त्यांना सरकारी कागदपत्रे आवश्यक असतात. मात्र, ती मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागतात. परिणामी अपंगांची ससेहोलपट होते. जिल्हा शल्यचिकित्सकांनी प्रत्येक तालुक्यातील अपंग व्यक्तीस दाखले देण्यासाठी महिन्यातून एक वार निश्चित करून अपंगांना जागेवर दाखले द्यावेत, अशी मागणी श्री. काळे यांनी आरोग्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.

पारनेरचे ‘होईक’ आणि कर्जतच्या ‘संवत्सरी’ने केले बळीराजाला आश्वस्त!
नगर, २७ मार्च/प्रतिनिधी - होईक हे नगर जिल्ह्य़ाच्या ग्रामीण संस्कृतीचे वैशिष्टय़. तसेच कर्जत येथील गोदडमहाराजांच्या संवत्सरीलाही त्या परिसरात विशेष महत्त्व आहे. हिंदू नववर्षदिनी गुढीपाडव्याला जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी होईक होतं, तर कर्जतला संवत्सरीचे वाचन होते. प्रामुख्याने आगामी हंगामातील पावसाची भाकिते त्यात वर्तवली जातात. आज झालेल्या अशा परंपरागत सोहळयांमध्ये जिल्ह्य़ात आगामी पावसाळा व अन्नधान्याचे उत्पादन याबाबत आशादायक भाकिते वर्तविण्यात आली आहेत.

एकाच नाण्याच्या दोन बाजू!
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी व भाजपने नगर मतदारसंघातील उमेदवार जाहीर केल्यानंतर गावागावांतील पारांवर उमेदवारांच्या ‘कर्तृत्वा’ची चर्चा चांगलीच झडते आहे. दोन्ही पक्षांचे उमेदवार राज्यमंत्री होते. त्यांच्या कामांचा लेखा-जोखा कार्यकर्ते मांडू लागताच सर्वसामान्य मतदार दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगून कार्यकर्त्यांना निरूत्तर करीत आहेत.

घुले बंधूंवर कर्डिलेंची मदार
विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेमुळे शेवगावची राजकीय समीकरणे पूर्ण बदलली. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप व राष्ट्रवादीला नवीन डावपेचांची आखणी करावी लागेल. तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सामर्थ्यांविरुद्ध भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांना झगडावे लागेल, असेच सध्याचे चित्र आहे.

अडवाणी यांची ४ एप्रिलला सभा
नगर, २७ मार्च/प्रतिनिधी

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांची ४ एप्रिलला नगर लोकसभा मतदारसंघात सभा होणार असल्याचे समजते. भाजप-सेना युतीचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या प्रचारार्थ ही सभा होईल. नगर शहर विधानसभा मतदारसंघातून गांधी यांना मतांची आघाडी मिळणारच हे गृहित धरून अडवाणी यांची ही प्रचारसभा अन्य तालुक्यात घेण्याचा पदाधिकाऱ्यांचा विचार आहे.

निवडणुकनामा
त्याच तिकिटावर तोच खेळ!

लोकसभेच्या निवडणुकीतच विधानसभेच्या निवडणुकीची बांधणी सुरू आहे. कोपरगावचे आमदार अशोक काळे यांनी आज मुंबईत ठाकरे पिता-पुत्रांची भेट घेऊन आपण शिवसेना सोडणार नाही, अशी ग्वाही देऊन मागच्या दोन-तीन वर्षांतील स्वतविषयीची संदिग्धता संपुष्टात आणली.

विखेंच्या निर्णयाची प्रतीक्षा
निवडणूक कुठलीही असो तालुक्यातील मतदारांनी पक्षाचा विचार न करता विखे घराण्याचीच सातत्याने पाठराखण केली. लोकसभेसाठी शिर्डी मतदारसंघातून रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासदार बाळासाहेब विखे यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

समाजवादी पक्षाचीही राजळे यांना ‘ऑफर’!
नगर, २७ मार्च/प्रतिनिधी

समाजवादी पक्षाच्या जिल्ह्य़ातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे आमदार राजीव राजळे यांची आज सायंकाळी भेट घेऊन लोकसभेच्या नगर मतदारसंघासाठी उमेदवारीची ऑफर दिली. दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही अशीच ऑफर दिली होती.

वाकचौरे यांच्या प्रचारासंदर्भात आज पुणतांब्यात बैठक
राहाता, २७ मार्च/वार्ताहर
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचार नियोजनासाठी उद्या (शनिवारी) पुणतांबे येथे बैठक आयोजित केली असल्याची माहिती शिवसेनेचे नेते सुहास वहाडणे यांनी दिली. पुणतांबे जिल्हा परिषद गटातील युतीचे कार्यकर्ते बैठकीस उपस्थित राहणार असून, या वेळी आमदार अनिल राठोड व वाकचौरे संपर्क दौऱ्याच्या निमित्ताने प्रचारास सुरुवात करणार आहेत. गणेश मंगल कार्यालयात दुपारी ४ वाजता ही बैठक होईल.

‘जिल्ह्य़ातील जागावाटपाचा काँग्रेसने फेरविचार करावा’
राहुरी, २७ मार्च/वार्ताहर
काँग्रेसने लोकसभेच्या दोन्ही जागा मित्रपक्षांना सोडल्याने कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे. जिल्ह्य़ातून काँग्रेस संपवण्याचा मित्रपक्षांचा डाव पक्षश्रेष्ठींनी ओळखून जागावाटपाबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी तालुका दूध संघाचे अध्यक्ष काँग्रेस कार्यकर्ते तानाजी धसाळ यांनी केली आहे.
प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, नगरची जागा राष्ट्रवादीला, तर शिर्डीतून रिपाईंचे रामदास आठवले यांना उभे केल्यास काँग्रेसचे जिल्ह्य़ात अस्तित्व राहणार नाही. आठवले उपरे उमेदवार असल्याचे शिर्डीत त्यांच्याविषयी मतदारांना आपुलकी नाही. त्यांचा पराभव झाल्यास आश्चर्य वाटायला नको. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या पराभवाचे खापर खासदार बाळासाहेब विखे यांच्यावर फोडू नये. अद्यापि वेळ गेली नसल्याने पक्षनेतृत्वाने जागावाटपाचा पुनर्विचार करावा. खासदार विखे यांचा जिल्ह्य़ातील तळागाळातील लोकांशी व कार्यकर्त्यांशी संपर्क आहे. लोकहिताची अनेक कामे त्यांनी केली आहेत. त्यामुळे श्रेष्ठींनी नगरची जागा राष्ट्रवादीकडून घेऊन विखे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी धसाळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली आहे.