Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९

गुढीपाडव्यालाही सराफा बाजारात मंदी
सोने १५ हजारावर

नागपूर, २७ मार्च/प्रतिनिधी

आर्थिक मंदी, वाढती महागाई आणि मार्च अखेर या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी गुढीपाडव्यानिमित्त इतवारी सराफा बाजारातही मंदीचे वातावरण होते. गुढीपाडव्याला सोने खरेदीला विशेष महत्व असते. मात्र, सोन्याच्या भावात सतत वाढ होत असल्याने ग्राहकांनी आज याकडे पाठ फिरवली. सोन्याबरोबरच इतरही वस्तूंच्या बाजारात समिश्र वातावरण होते.

मराठमोळ्या थाटात गुढीपाडवा
नागपूर, २७ मार्च / प्रतिनिधी

घरोघरी फुलांचे व आंब्याच्या पानांचे तोरण.. शहरातील विविध भागात काढलेल्या रंगबेरंगी रांगोळ्या..नऊवारी साडय़ात नटलेल्या तरुणी .. भगवा फेटा घालून मिरवणारे युवक.. शहरभर उभारलेल्या लहान मोठय़ा गुढय़ा. चौकाचौकात फटाक्यांची आतशबाजी.. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्याचे गुलाब फूल, भगवे ध्वज व पेढे देऊन स्वागत आणि शोभायात्रा काढत भारतीय नववर्षांचा पहिला दिवस आज उत्साहाच्या वातावरणात नागरिकांनी साजरा केला.

विदर्भातील संत्र्याला उठाव नाही
राजस्थानातील संत्र्याला अधिक मागणी
अपुऱ्या पावसामुळे उत्पादन घटले
डिंक्यामुळे बागा वाळल्या

नागपूर, २७ मार्च / प्रतिनिधी

अपुरा पाऊस, विहिरींनाही पाणी नाही, विविध कीडींमुळे घसरलेला दर्जा आणि बाहेरच्या संत्र्याचे अतिक्रमण या कारणांमुळे यंदा विदर्भातील संत्र्याला बाजारपेठेत मागणी नसल्याचे चित्र आहे.
यंदा विदर्भात सर्वत्र अपुरा पाऊस झाल्याने विहिरींच्या पाण्याची पातळी घटली. त्यामुळे संत्र्याला पुरेसे पाणी मिळू शकलेले नाही. त्याचा परिणाम संत्र्याच्या उत्पादनावर झाला असून यंदा अत्यल्प उत्पादन झाले आहे.

मामांच्या गावाची ओढ ओसरतेय
नागपूर, २७ मार्च / प्रतिनिधी

‘झुक झुक झुक अगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहू या, मामाच्या गावाला जाऊ या’ उन्हाळ्याच्या सुट्टय़ा लागताच मुलांना मामाच्या गावाची अर्थात ‘आजोळी’ जायची ओढ लागली असयची. मामाही भाचेकंपनीच्या स्वागतासाठी तयार असयचे. परंतु बदलत्या काळात ही ओढ काही प्रमाणात कमी झाली आहे. कुठे मुलांची उन्हाळी शिबिरे तर कुठे सहलीचा बेत आखल्या जात असल्यामुळे मामांच्या गावी जाणे काही प्रमाणात कमी झाले आहे.

रेल्वेची अशीही बनवाबनवी !
आरक्षण खिडक्यांवर कर्मचारी नाही

राजेश्वर ठाकरे, नागपूर, २७ मार्च

कर्मचारी नसल्याचे कारण देऊन आरक्षण खिडक्या बंद ठेवायच्या आणि दुसरीकडे कर्मचारी अतिरिक्त ठरतात म्हणून पदे रद्द करायची किंवा त्यांना इतरत्र तरी हलवायचे, अशी बनवाबनवी रेल्वेने सुरू केली आहे. या बनवाबनवीचा फटका मात्र आरक्षणासाठी येणाऱ्या प्रवाशांना बसला आहे.पुरेशा प्रमाणात कर्मचारी नसल्याने नागपूर रेल्वे स्थानक (पश्चिम व पूर्वद्वार) आणि अजनी येथील तिकीट रिझव्‍‌र्हेशन केंद्रावरील खिडकी बंद ठेवण्यात येत असल्याने प्रवाशांचा वेळ जात आहे तर, दुसरीकडे या विभागात कर्मचारी अतिरिक्त असल्याचे सांगून १७ कर्मचाऱ्यांना अन्यत्र हलविण्यात आले आहे.

रॉकेल विक्रेत्याची हत्या
जुन्या वैमनस्यातून घडला प्रकार
पत्नीवरही हल्ला, तिघांना अटक
नागपूर, २७ मार्च / प्रतिनिधी
जुन्या वैमनस्यातून एकाच कुटुंबातील चौघांनी तलवारीने हल्ला करून रॉकेल विक्रेत्याचा खून केला. ही घटना तुळशीबागेत गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

शिक्षक सहकारी बँकेची उद्या निवडणूक
नागपूर, २७ मार्च / प्रतिनिधी

विदर्भातील अग्रगण्य शिक्षक सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत दोनच पॅनेल असल्याने थेट लढत होण्याची शक्यता आहे. रविवारी, २९ मार्चला होणाऱ्या या निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनेल आणि बहूजन पॅनेल यांच्यात लढत रंगणार आहे.

कामगार नेत्या मालती रुईकर यांचा कामठीत सत्कार
नागपूर, २७ मार्च/ प्रतिनिधी

कामगार नेते माजी खासदार अ‍ॅड. दादासाहेब कुंभारे यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ कामगार नेत्या मालती रुईकर यांचा कामठी येथे सत्कार करण्यात आला. ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या सभागृहात माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांच्याहस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन हा करण्यात आला. याप्रसंगी नारायण नितनवरे, प्रा. हरीश कांबळे, नुसरत कमाल अंसारी, राहुल घरडे, अजय कदम, मोहम्मद रफीक, सुरेश वाही उपस्थित होते.

महापालिका आयुक्तांना भाजपच्या नगरसेवकांचा घेराओ
नागपूर, २७ मार्च / प्रतिनिधी

आचारसंहिता सुरू असताना महापालिकेचे आयुक्त असीम गुप्ता यांनी वाढीव दराने कर आकारणीची घोषणा केल्याने संतापलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी त्यांना घेराओ केला. आयुक्तांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

कुही ज्येष्ठ नागरिक मंडळाची कार्यकारिणी
कुही, २७ मार्च / वार्ताहर

ज्येष्ठ नागरिक महामंडळाशी संलग्न कुही तालुका ज्येष्ठ नागरिक मंडळाची कार्यकारिणी हनुमान मंदिर (बारभाई) येथे झालेल्या बैठकीत निवडण्यात आली. अध्यक्ष- सुधीर भगत, कार्याध्यक्ष- घनश्याम धवड, संघटन सचिव- वसंतराव शंभरकर, उपाध्यक्ष- शोभा गांगलवार, डॉ. भाऊराव डोळस, सचिव- झिबल ढबाले, सहसचिव- अमृतराव पडोळे, कोषाध्यक्ष- खामेश्वर लेंडे, सदस्य- नथ्थु भिष्णुरकर, हरिश्चंद्र ठवकर, मेघश्यााम रोकडे, महादेव कानतोडे, सूर्यभान कातुरे, दौलतराव सोनसरे, नीळकंठ शहाणे, चिरकुट हारगुडे, श्रावण बुराडे, देवीदास तिरपुडे, भोजराज चारमोडे, शंकर पोहनकर, लक्ष्मी चौहान यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.

अण्णासाहेब पाटील यांना स्मृतिदिनी अभिवादन
नागपूर, २७ मार्च/प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रथम क्रांतीवीर व माथाडी कामगार नेते दिवंगत अण्णासाहेब पाटील यांचा स्मृतीदिन, २३ मार्चला बिडीपेठ येथील दिलीप जाधव यांच्या निवासस्थानी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा समाज समन्वय समितीचे सचिव अतुल लोंढे, एम्प्रेस मिल कामगार कर्मचारी सेनेचे सचिव पांडुरंग शेंडे उपस्थित होते. स्मृतीदिन कार्यक्रमात धनराज शिर्के, नरेंद्र कडू, विजया जाधव, चंद्रशेखर काटे, मालती जाधव, पुष्पा शिंदे, वंदना रोटकर आदी उपस्थित होते.

ग्राईंडवेलमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर, २७ मार्च/प्रतिनिधी
नॅशनल सेफ्टी सप्ताहानिमित्त बुटीबोरी येथील ग्राईंडवेल नॉर्टन लिमिटेड या कंपनीच्या वतीने २० मार्चला रक्तदान शिबीर घेण्यात आले. उन्हाळय़ात रक्ताची कमतरता असल्याने थॅलेसेमिया व सिकलसेलच्या रुग्णांना रक्त मिळावे या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात १२२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात ग्राईंडवेल नॉर्टन लिमिटेडचे व्यवस्थापक केदार टाकळकर, किरण मालभागे, गिरधारी मालभागे व दिनेश अडकणे यांच्यासह सर्व कर्मचारी व कामगारांनी रक्तदान केले. डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्यावतीने व्यवस्थापक प्रवीण पाटील व त्यांच्या चमूने मदत केली.

पर्यावरणशास्त्रावरील स्वाध्यायमाला उपलब्ध
नागपूर, २७ मार्च / प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरणविषयक अभ्यासक्रम सर्व विद्यापीठात सक्तीचा केला असून विद्यापीठ अनुदान आयोगाने पदवी स्तरासाठी अभ्यासक्रमही निश्चित केला आहे. पर्यावरणशास्त्राचा हा अभ्यासक्रम अधिक सोपा व्हावा, सुलभरित्या समजावा यासाठी पाठय़क्रमावर आधारित स्वाध्यायमाला सोनाली कोलारकर-सोनार यांनी तयार केली आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या(कला, वाणिज्य व विज्ञान शाखा) महाविद्यालयांनी व विद्यापीठांनी निर्देशित केलेल्या पॅटर्ननुसार हा प्रश्नोत्तर संच मराठी माध्यमासाठी तयार करण्यात आला आहे. सेंट्रल टेक्नो पब्लिकेशनद्वारा प्रकाशित हे पुस्तक सीताबर्डीवरील सेंट्रल बुक स्टॉल येथे उपलब्ध आहे.

पतीच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या
नागपूर, २७ मार्च / प्रतिनिधी

पतीच्या छळाला कंटाळून एका महिलेने जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना खापरखेडा येथे घडली. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी तिच्या पतीस अटक केली आहे. प्रफुल्ल केशव बेले (२१) असे पतीचे तर, ज्योती (१९) असे पत्नीचे नाव आहे. दीड वर्षांपूर्वी दोघांचे लग्न झाले. प्रफुल्ल हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. लग्नानंतर काही दिवसांनी प्रफुल्लने पत्नीचा छळ सुरू केला. सतत होणाऱ्या या छळाला कंटाळून १९ मार्चला सकाळी तिने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. उपचारादरम्यान, मेयो रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. ज्योतीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून खापरखेडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून प्रफुल्ल बेले याला अटक केली.

ट्रकच्या धडकेने सायकलस्वार ठार
नागपूर, २७ मार्च / प्रतिनिधी

वेगात असलेल्या ट्रकची धडक लागल्याने एकाचा मृत्यू झाला. हा अपघात कामठी मार्गावरील मारुती शो-रुमसमोर आज सकाळी घडला. टेका नाका येथील शकुर अली रसुल अली (६०) हा वृद्ध आज सकाळी ११ वाजताचा सुमारास सायकलने कामठी मार्गाकडून टेका नाकाकडे येत असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकची (क्र.एमएच ३४ ए-२५४१) सायकलला धडक लागली. या धडकेत शकुर अली हा गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मरण पावला. जरीपटका पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून ट्रक चालक शेख गौस शेख लाल (३५) रा. सुरेंद्रगड याला अटक केली आहे.

बसच्या धडकेत ऑटोचालक जखमी
सुरादेवी मार्गावरील कोराडी रेल्वे स्थानकाजवळ शहर बसची ऑटोला लागलेल्या धडकेत ऑटोचालक गंभीर जखमी झाला तर त्याचा मुलगा किरकोळ जखमी झाला. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी बसचालकाला अटक केली आहे. महादुला, संभाजीनगरातील अनिल प्रकाश पसिने (३५) हा गुरुवारी सायंकाळी ६ वाजता त्याचा ऑटो (एमएच ३४ डब्ल्यू ८२७३) घेऊन कोराडीकडे येत असता रेल्वे स्थानकाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या शहर बसची (क्र. एमएच १२ यूए ९१५६) ऑटोला धडक लागली. त्यात ऑटोचालक अनिल पसिने हा गंभीर जखमी झाला तर त्याचा बारा वर्षांचा मुलगा पवन किरकोळ जखमी झाला. अनिलला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोराडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून बस चालक किशोर विश्वनाथ खटोले (५४) रा. मारुतीनगर याला अटक केली आहे.

खड्डय़ात पडून बालिकेचा मृत्यू
एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राजीवनगरातील नीलम राजेश शर्मा ही चार वर्षांची बालिका खड्डयातील पाण्यात पडून मरण पावली. आज सकाळी ९ वाजता तिचा मृतदेहच बघायला मिळाला. राजीवनगरातील शांतीनिकेतन शाळेजवळ खोल खड्डा असून त्यात पाणी आहे. खेळता खेळता तिचा तोल गेल्याने ती खड्डय़ात पडली व त्यातच ती बुडून मरण पावली. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदवला आहे.

आजाराला कंटाळून आत्महत्या
यशोधरानगरातील श्रावण परसराम फुणकर (५५) यांनी गुरुवारी सकाळी आजाराला कंटाळून परिसरातील हनुमान मंदिराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांना गेल्या दोन वर्षांपासून क्षयरोगाचा त्रास होता, असे कळते. यशोधरानगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.