Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
नवनीत

जी व न द र्श न
सर्व वस्तू अनित्य

सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मानणे म्हणजे धम्म. अनित्यतेच्या सिद्धांताला तीन पैलू आहेत. अनेक तत्त्वांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत. व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहे. प्रतीत्य समुत्पन्न वस्तूचे आत्मतत्त्व अनित्य आहे. अनेक तत्त्वे मिळून बनलेल्या वस्तूंची अनित्यता बौद्धतत्त्ववेत्ता असंग याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केली आहे.
असंग म्हणतो, ‘‘सर्व वस्तू या हेतू आणि प्रत्यय यामुळे उत्पन्न होतात. त्यांना त्यांचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते. हेतू प्रत्ययांचा उच्छेद झाला, की वस्तूंचे अस्तित्व ठरत नाही. सजीव प्राण्याचे शरीर म्हणजे पृथ्वी, आप, तेज आणि वायू या चार महाभूतांचा परिणाम होय आणि या चार भूतांचे पृथक्करण झाले, की हा प्राणी, प्राणी म्हणून उरत नाही.
अनेक तत्त्वे मिळून झालेली वस्तू अनित्य आहे या वचनाचा अभिप्राय वरील प्रकारचा आहे.
सजीव प्राण्याच्या अनित्यतेचे वर्णन ‘तो नाही, तो होत आहे’, (Being is Becoming) या शब्दांत करता येईल. या अर्थाने पाहिले असता, जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करीत होता तोच प्राणी वर्तमानकाळात असू शकत नाही आणि तोच प्राणी भविष्यकाळात असू शकणार नाही. भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पूर्वी नव्हता आणि तोच आजही नाही. वर्तमानकाळी जो प्राणी आहे तोच पूर्वी नव्हता आणि पुढेही तोच असणार नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे मनुष्यप्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे. आपल्या जीवनाच्या कोणत्याही दोन क्षणी तो तोच असू शकत नाही. हे परिवर्तन कसे शक्य आहे? याला भगवान बुद्धाचे उत्तर असे : ‘सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे.’ याच विचारसरणीतून पुढे शून्यवादाचा उदय झाला. बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अनास्तित्ववाद नव्हे. त्याचा अर्थ एवढाच, की या ऐहिक जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू आहे. शून्यतेमुळेच सर्व अस्तित्व शक्य होते ही गोष्ट फार थोडय़ांच्या लक्षात येते. शून्यतेशिवाय काहीही शक्य झाले नसते. शून्य म्हणजे अभाव असे मानले असते तर मोठीच अनवस्था उद्भवली असती.परंतु तसे मानलेले नाही. शून्य हा एक बुद्धिमान पदार्थ असून, त्याला आशय आहे; परंतु त्याला लांबी नाही. भगवान बुद्धाचा उपदेश असा, की सर्व वस्तू अनित्य आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बुद्ध आणि त्याचा धम्म)

कु तू ह ल
सेटी
‘सेटी’ ही प्रत्यक्षात कसली मोहीम आहे?
मानवाप्रमाणे अंतराळात रेडिओ लहरींचे प्रक्षेपण करू शकणाऱ्या प्रगत संस्कृतींचा शोध घेण्यासाठी असलेले प्रयत्न हे संयुक्तपणे ‘सेटी’ (सर्च फॉर एक्स्ट्रा टेरेस्ट्रीयल इंटेलिजंस) या नावाने ओळखले जातात. या प्रयत्नांची सुरुवात १९५९ साली ओझ्मा प्रकल्पाद्वारे झाली. सेटी या शोधमोहिमेत फ्रँक ड्रेक आणि कार्ल सागनसारख्या खगोलज्ञांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रेडिओ दुर्बिणींद्वारे रेडिओ लहरींच्या माध्यमातून विश्वाचं सर्वेक्षण करणे हा सेटी प्रकल्पाचा मुख्य भाग आहे. विश्वात हायड्रोजन सर्वत्र आहे. हायड्रोजनचे उत्सर्जन वर्णपट वापरून आपण आपल्या दीर्घिकेचा आकार शोधला आहे. इतर प्रगत संस्कृतींनादेखील या वर्णपटाचे महत्त्व कळले असेल व तेसुद्धा याच लहरींचे प्रक्षेपण करीत असतील असे गृहीत धरून हायड्रोजनच्या वर्णपटातील एका विशिष्ट वारंवारितेच्या लहरींचा वेध या सर्वेक्षणात घेतला जातो. इतर ठिकाणच्या संस्कृतींची माहिती मिळविण्याबरोबरच इतर संस्कृतींना आपल्या संस्कृतीची माहिती मिळावी हा देखील सेटीचा उद्देश आहे. इ.स. १९७४ साली एक रेडिओसंदेश अरिसिबो वेधशाळेतून शौरी तारकासमूहातील एका तारकागुच्छाच्या दिशेने प्रक्षेपित केला गेला आहे. (हा संदेश या तारकागुच्छापर्यंत पोहोचण्यास २५,००० वर्षे लागणार आहेत.) फीनिक्स, सेरेन्डीप व सेटी ऐट होम हे सेटीशी संबंधित असलेले मुख्य प्रकल्प आहेत. सेटी ऐट होम या कॅलिफोर्निया विद्यापीठाद्वारे चालविल्या जाणाऱ्या प्रकल्पात गोळा होणाऱ्या माहितीच्या विश्लेषणात सर्वसाधारण खगोलप्रेमींनासुद्धा सामील करून घेतले गेले आहे. प्रगत संस्कृती रेडिओलहरींव्यतिरिक्त दृश्य (ऑप्टीकल) स्वरूपाचे शक्तिमान लेझर वापरूनदेखील अंतराळात संदेशांचे देवाणघेवाण करू शकतात हे लक्षात घेऊन ऑप्टीकल सेटीचीही सुरुवात झाली आहे. अजून तरी सेटी या शोधमोहिमेला यश आलेले नाही. परंतु सतत शोध घेत राहिल्यास कधीतरी कोणीतरी आपल्याशी दूर अंतराळातून संवाद साधेल अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.
सुजाता देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
राजा गोसावी
दिग्दर्शक राजा परांजपे यांचा ‘लाखाची गोष्ट’ हा चित्रपट पुण्याच्या भानुविलास थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा तिकीट फाडणाराच चित्रपटाचा नायक असल्याचे पाहून प्रेक्षक चकीत झाले. पुढे नावारुपाला आलेले अभिनेते राजा गोसावी हे त्या थिएटरमध्येच चक्क डोअरकीपरचे काम करत होते. २८ मार्च १९२८ रोजी साताऱ्यातील सिद्धेश्वर कुरोली या गावी एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. नाचगाण्याच्या वेडापायी शाळेच्या चार इयत्ता कशाबशा पार पाडून राजाभाऊंनी मुंबई गाठली. ऑफिस बॉय म्हणून मास्टर विनायकांच्या कंपनीत काम केले. दामुअण्णा मालवणकर हे त्यांचे गुरू. दामुअण्णांच्या प्रभाकर नाटय़मंदिरात ते प्रॉम्टरची नोकरी करत. याच कंपनीच्या ‘भावबंधन’ या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीशी त्यांचे भावबंध जुळले ते कायमचेच. ‘अखेर जमलं’ या चित्रपटातील त्यांची भूमिका पाहून राजा परांजपेंनी ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटात त्यांना घेतलं. हा चित्रपट त्यांच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरला. ‘चिमणी पाखरं’, ‘सौभाग्य’, ‘देवघर’, ‘उतावळा नवरा’ मिळून अडीचशे चित्रपटातून त्यांनी काम केले. केवळ विनोदी नव्हे तर गंभीर भूमिकाही त्यांनी केल्या. ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटातील त्यांची खलनायकाची भूमिका विशेष लक्षात राहते. त्यांच्या जीवनावर निर्माते वाडिया यांनी ‘राजा गोसावींची गोष्ट’ हा चित्रपट काढला. चित्रपटसृष्टीत यश मिळवूनही ते रंगभूमीला विसरले नाहीत. ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘प्रेम संन्यास’, ‘एकच प्याला’, ‘नटसम्राट’ ही त्यांची गाजलेली नाटके. १९९५च्या अखिल भारतीय नाटय़संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नाटय़ परिषदेने ‘बालगंधर्व’ हा पुरस्कार देऊन त्यांच्या अभिनयाचा गौरव केला. आपल्या सहजसुंदर अभिनयाने अचूक संवादफेकीने निखळ विनोद निर्माण करून जवळजवळ पाच तपे मराठी रसिकांवर अधिराज्य करणाऱ्या राजा गोसावी यांचे १ मार्च १९९८ रोजी मुंबईत निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
शेखरचा सुंदर राजा

शेखरसाठी आईने कुठल्या तरी मासिकात पाहून टॉवेलच्या गडदनिळ्या कापडाचा कुत्रा शिवला. त्यात चिंध्या भरल्या. कॅमलीन रंगाने त्याच्यावर ठिपके रंगवले. कॅनव्हसच्या कापडाचे नाक, तोंड केले. काचेचे डोळे आणून चिकटवले. झक्क कुत्रा तयार झाला. तो शेखरला देऊन आई म्हणाली, ‘‘शेखर हे बघ तुला खेळायला मित्र तयार केलाय मी.’’ शेखर खूष झाला. त्याने कुत्र्याचे नाव ‘सुंदर’ ठेवले. त्याला सदान्कदा काखोटीत मारून तो हिंडत असे. जेवताना तो शेजारी लागे, झोपताना कुशीत पाहिजे असे. अभ्यास करताना शेखर सुंदरला खुर्चीत बसवून त्याच्यासमोर पुस्तक ठेवे. मित्रांकडे जाताना तो सुंदरला नेई. इतकेच नाही तर दफ्तरात घालून त्याला शाळेलासुद्धा नेई. सुंदरशिवाय राहणे त्याला अशक्यच झाले होते. एके दिवशी गावाच्या दुसऱ्या टोकाला राहणाऱ्या बेबी मावशीचा फोन आला, ‘‘अरे शेखर, तू माझ्याकडे पिल्लू मागायचास ना? आमच्या गौरीला दोन छान बाळे झाली आहेत. त्यातले एक पांढरेशुभ्र पिल्लू वेदवतीबरोबर तुला पाठवते आहे.’’ शेखरला एक छोटुकला जिवंत मित्र मिळाला. त्या दिवशी दिवसभर त्या खेळकर पिल्लाशिवाय त्याला काही सुचत नव्हते. शेखरने त्याचे नाव ठेवले ‘राजा’. शेखर सुसाट धावे, पिल्लूही त्याच्यामागे वेगाने धावायचे. शेखरजवळ आला की त्याला बघून खोटे खोटे भुंकून मग शेपूट हलवत कान ताठ करून उभे राही. शेखरने त्याला बशीत दूध दिले तर अधाशासारखे त्याने बशीत पाय ठेवले. सगळी बशी अंगावर उपडी झाली आणि दुधाची अांघोळ करून भिजलेले पिल्लू विनोदी चेहेऱ्याने कूऽऽकू करत उभे राहिले. ‘राजा..राजा..’शेखरने हाक मारली की मान वळवून पिल्ले जणू म्हणे,‘‘काय रे मित्रा, कशाला बोलावलेस.’’ रात्री झोपताना शेखरने राजाला कुशीत घेतले अन् त्याच्या पांघरुणात राजाला पाहून आई चांगलीच रागावली, ‘‘अरे त्या कुत्र्याला पलंगावर ठेवलं आहेस. त्याच्या अंगावर पिसवा असतील. त्याच्यासाठी टोपली केलीय त्यात झोपू दे त्याला. नसले लाड नकोत. दुरूनच खेळ त्याच्याशी. फार अंगाअंगाशी करू देऊ नकोस. आणि हे बघ! जेवणाच्या वेळी तर तो ताटाजवळ मुळीच चालणार नाही मला. त्याच्या अंगावरचे केस जेवणात जाणं वाईट.’’ शेखर हिरमुसला. दिवसभरात नव्हती ती सुंदरची आठवण आता त्याला झाली. अंथरुणावर एकटय़ाला झोप येईना. रोज सुंदर प्रत्येक वेळी त्याच्याबरोबर असायचा. जेवताना, झोपताना, खेळताना, शाळेतसुद्धा. तो उठला आणि सुंदरला त्याने घट्ट मिठ्ठी मारली. आईने जवळ घेत म्हटले,‘‘सोन्या, खेळातल्या कुत्र्यासारखे सगळ्या गोष्टी खऱ्या कुत्र्याबरोबर करता येत नाहीत, पण तू बऱ्याच गोष्टी त्याच्या बरोबर करू शकशील. त्याला जेवायला देणे, शी-शू साठी नेणे, फिरवून आणणे आंघोळ घालणे तो आजारी पडला तर काळजी घेणं.’’..आई बोलत होती. सुंदरला कुशीत घेऊन शेखर बोलणे ऐकताना झोपून गेला होता. प्रत्येक गोष्टीचे उपयोग वेगवेगळे असतात. त्यांची सरमिसळ करू नये आणि प्रत्येक गोष्टीला पर्यायही असतो हे विसरू नये. आजचा संकल्प: प्रत्येक गोष्टीचा उपयोग मी विचारपूर्वक करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com