Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

नववर्ष स्वागताला जल्लोषाची गुढी
बेलापूर/वार्ताहर

ठाणे-डोंबिवलीपाठोपाठ येत्या काही वर्षांंपासून कॉस्मॉपॉलिटीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २१

 

व्या शतकातील आधुनिक नगरीत म्हणजेच नवी मुंबईतही नववर्ष शोभायात्रा काढण्यात आल्या, मात्र आचारसंहितेचा काहीसा परिणाम या शोभायात्रांवर दिसून आला. विश्व हिंदू परिषद, नागाई सेवा ट्रस्ट, संस्कार भारती, हिंदू जनजागृती समिती, धर्मजागृती प्रबोधिनी, सनातन संस्था, बजरंग दल आदी संघटनांनी शोभायात्रा व सार्वजनिक धर्मगुढी उभारण्यासारखे उपक्रम आज शहरात राबविले.
वाशी येथील जागृतेश्वर मंदिर ते छत्रपती शिवाजी चौकापर्यंत काढण्यात आलेल्या शोभायात्रेत शेकडो लोकांनी पारंपरिक वेशभूषा करून संस्कृतीचे दर्शन घडविले. या यात्रेत आदिवासी व कोळी नृत्याचा आविष्कार सादर करण्यात आला, तसेच पंढरीच्या वारकऱ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात संबंध परिसर हरिनामाने दुमदुमविला. ऐरोली येथे संस्कार भारतीतर्फे सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात सुमारे ५५ चौरस फुटांची चित्ताकर्षक रंगावली काढून हिंदू बांधवांना अनोख्या पद्धतीने नववर्षांच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. नेरुळ सारसोळे गणपती मंदिरात हिंदू जनजागृती समितीतर्फे सार्वजनिक धर्मगुढी उभारण्यात आली. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष भगवानराव ढाकणे, हावरे उद्योग समूहाचे संचालक सुरेश हावरे, समितीचे निमंत्रक डॉ. उदय धुरी व शिवसेना नगरसेवक विजय माने आदी उपस्थित होते. यावेळी हावरे यांनी आपल्या प्रथा-परंपरा यांचे पालन करून संस्कृतीचे रक्षण करण्याचे आवाहन उपस्थितांनी केले.
डॉ. धुरी यांनी धर्मावर होत असलेल्या आघातांविषयी प्रबोधन करून सर्वांनी संघटित होण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. देवी-देवतांचे विडंबन, मंदिर सरकारीकरण कायदा, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा यांना विरोध करून धर्महानी थांबविण्याचे आवाहन डॉ. धुरी यांनी उपस्थितांना केले.