Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पनवेलमध्ये नारीशक्तीचा आविष्कार!
पनवेल/प्रतिनिधी- मराठी नववर्षांचे स्वागत करण्यासाठी पनवेलमध्ये आज काढण्यात आलेल्या

 

शोभायात्रेमध्ये नारीशक्तीचा बहुरंगी आविष्कार घडला. लेझिम पथक, नृत्य, टिपऱ्या आदी पारंपरिक प्रकारांसह महिलांनी मोटारसायकल रॅली काढून अष्टपैलूत्वाचे दर्शन घडविले.
पनवेलमध्ये गेली आठ वर्षे गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेला यंदाही चांगला प्रतिसाद लाभला. मिडलक्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानावर सकाळी साडेसात वाजता सूर्याचे स्तवन आणि गायत्री मंत्राचे पठण करून या शोभायात्रेला सुरुवात झाली. या फेरीचा मार्ग दरवर्षी बदलण्याची प्रथा असल्याने यावर्षी ही शोभायात्रा तक्का गाव, टपाल नाका, महाराष्ट्र बँक परिसर येथून नेण्यात आली. शोभायात्रेच्या आघाडीवर असलेला राम-सीता आणि वानरसेनेचा रथ लक्षवेधी ठरला. त्यापाठोपाठ घोडय़ावर स्वार झालेल्या जिजाबाई आणि बाल शिवाजी यांचे रूप धारण केलेल्या कलाकारांनीही वाहवा मिळविली.
वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे लेझिम पथक, महिलांचे लेझिम पथक-टिपऱ्या, नऊवारी साडय़ा नेसलेल्या महिला आणि मोटारसायकलवर स्वार झालेल्या महिलांनी या यात्रेची शोभा वाढविली. पनवेल रिक्षा विद्यार्थी वाहक संघटना, शुभंकरोती मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, एकवीरा मित्र मंडळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ज्येष्ठ नागरिक सघ, हिंदू जनजागृती समिती आदी संस्थांच्या सदस्यांनी, तसेच शेकडो स्त्री-पुरुषांनी या शोभायात्रेत सहभाग नोंदविला. आमदार विवेक पाटील, माजी नगरसेवक जे.एम. म्हात्रे, नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर आदी नेत्यांचा सहभागही लक्षणीय ठरला. तीन तासांच्या परिक्रमेनंतर सोसायटीच्या मैदानातच या यात्रेचा समारोप झाला.