Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

ट्रक सोडविण्यासाठी लाच घेणाऱ्या दलालास अटक
बेलापूर/वार्ताहर : ११ टन साखरेच्या पोत्यांचा ओव्हर लोडेड ट्रक सोडविण्यासाठी आठ हजार

 

रुपयांची लाच घेताना एका दलालास मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी वाशीत बुधवारी रंगेहाथ अटक केली. नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगली येथील वाहतूकदार जितेंद्र शहा याचा ओव्हर लोडेड ट्रक काही दिवसांपूर्वी पकडला होता. हा ट्रक सोडविण्यासाठी कुर्ला येथील दलाल राजू शर्मा याने आरटीओ कर्मचाऱ्यांच्या नावे आठ हजार रुपयांची मागणी शहाकडे केली होती. याबाबत शहा याने मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचेची रक्कम घेण्यासाठी शर्माने शहा यास आरटीओ प्रशिक्षण केंद्रावर नेले. तेथे बराच वेळ घुटमळत राहून नंतर त्याला आरटीओ कार्यालयात नेले, मात्र आरटीओ कर्मचाऱ्यांच्या नावे खोटा बनाव करून स्वत:चे उखळ पांढरे करू पाहणाऱ्या शर्मा याला कोणी आरटीओ कर्मचारी लाच देण्यासाठी मिळाला नाही. अखेर सापळा लावलेल्या अधिकाऱ्यांना शर्मावर संशय अधिक बळावला व लाचेची रक्कम घेऊन स्वत:कडे ठेवताना पोलिसांनी त्याला रंगेहाथ अटक केली.