Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘धर्मवीर संभाजीराजांचा आदर्श बाळगणे आवश्यक’
बेलापूर/वार्ताहर : स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता स्वधर्मापासून तसूभरही न ढळणाऱ्या धर्मवीर संभाजीराजांचा आदर्श आजच्या पिढीने बाळगणे गरजेचे असल्याचे मत हिंदू जनजागृती समितीचे

 

सानपाडा समन्वयक राजू पाटील यांनी येथे व्यक्त केले. २६ मार्च म्हणजेच धर्मवीर संभाजीराजांचा बलिदान दिन. यानिमित्त सानपाडा येथील विविध संघटनांनी एकत्र येऊन संघटनात्मक बांधणीची हाक दिली. वारकरी संप्रदाय, शिवसेना, मनसे, शिवतेज मित्रमंडळ आदी संघटनांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. धर्माधांनी संभाजीराजांची अतिशय क्रूरपणे हत्या केली. तत्पूर्वी महाराजांना विविध प्रलोभने दाखविण्यात आली, मात्र ते याला बळी पडले नाहीत. यातच संभाजीराजांचे श्रेष्ठत्व दिसून येते, असे पाटील म्हणाले. केंद्राच्या एनसीईआरटीच्या अभ्यास-क्रमातील इतिहास विषयात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या अन्य पराक्रमी राजांना अतिशय नगण्य स्थान देण्यात आले आहे. याबाबत सर्वानी संघटितपणे शासन दरबारी जाब विचारणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी शिवसेना उपविभाग प्रमुख विसाजी लोके, मनसे प्रभाग उपप्रमुख सुरेश कनवी, अनिल शिळकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी धर्मवीर संभाजी चौकातील नाम-फलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला.