Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९

नववर्ष स्वागताला जल्लोषाची गुढी
बेलापूर/वार्ताहर

ठाणे-डोंबिवलीपाठोपाठ येत्या काही वर्षांंपासून कॉस्मॉपॉलिटीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २१ व्या शतकातील आधुनिक नगरीत म्हणजेच नवी मुंबईतही नववर्ष शोभायात्रा काढण्यात आल्या, मात्र आचारसंहितेचा काहीसा परिणाम या शोभायात्रांवर दिसून आला. विश्व हिंदू परिषद, नागाई सेवा ट्रस्ट, संस्कार भारती, हिंदू जनजागृती समिती, धर्मजागृती प्रबोधिनी, सनातन संस्था, बजरंग दल आदी संघटनांनी शोभायात्रा व सार्वजनिक धर्मगुढी उभारण्यासारखे उपक्रम आज शहरात राबविले.

बोगस मच्छीमार संस्थांना कर्जपुरवठा
व्यावसायिकांचा आरोप

मधुकर ठाकूर

बोगस सभासदांची नोंदणी करून राज्यात अनेक मच्छीमार संस्था स्थापन करण्यात आल्या असून, अशा संस्थांना एनसीडीसीकडून मच्छीमार बोट बांधण्यासाठी कर्जपुरवठा केला जात आहे. यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप मच्छीमार व्यावसायिकांकडून केला जात आहे.राज्यभरात मच्छीमारांच्या सुमारे २५० सहकारी संस्था आहेत.

पनवेलमध्ये नारीशक्तीचा आविष्कार!
पनवेल/प्रतिनिधी- मराठी नववर्षांचे स्वागत करण्यासाठी पनवेलमध्ये आज काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये नारीशक्तीचा बहुरंगी आविष्कार घडला. लेझिम पथक, नृत्य, टिपऱ्या आदी पारंपरिक प्रकारांसह महिलांनी मोटारसायकल रॅली काढून अष्टपैलूत्वाचे दर्शन घडविले.

ट्रक सोडविण्यासाठी लाच घेणाऱ्या दलालास अटक
बेलापूर/वार्ताहर : ११ टन साखरेच्या पोत्यांचा ओव्हर लोडेड ट्रक सोडविण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच घेताना एका दलालास मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी वाशीत बुधवारी रंगेहाथ अटक केली. नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगली येथील वाहतूकदार जितेंद्र शहा याचा ओव्हर लोडेड ट्रक काही दिवसांपूर्वी पकडला होता.

कुंडेवहाळ, कर्नाळा ग्रामपंचायतीत शेकापची सरशी
पनवेल/प्रतिनिधी - पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ आणि कर्नाळा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाची सरशी झाली आहे. या ग्रामपंचायतींसाठी बुधवारी मतदान होऊन गुरुवारी मतमोजणी पार पडली. यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असणाऱ्या कुंडेवहाळ ग्रामपंचायतीच्या नऊपैकी नऊ जागा जिंकत शेकाप आणि ग्रामविकास आघाडीने काँग्रेसला धूळ चारली. आमदार विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या जनसेवेचा हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया शेकापचे ओवळे विभाग चिटणीस जी. के. म्हात्रे यांनी व्यक्त केली.

‘धर्मवीर संभाजीराजांचा आदर्श बाळगणे आवश्यक’
बेलापूर/वार्ताहर : स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता स्वधर्मापासून तसूभरही न ढळणाऱ्या धर्मवीर संभाजीराजांचा आदर्श आजच्या पिढीने बाळगणे गरजेचे असल्याचे मत हिंदू जनजागृती समितीचे सानपाडा समन्वयक राजू पाटील यांनी येथे व्यक्त केले. २६ मार्च म्हणजेच धर्मवीर संभाजीराजांचा बलिदान दिन. यानिमित्त सानपाडा येथील विविध संघटनांनी एकत्र येऊन संघटनात्मक बांधणीची हाक दिली.

नेरुळ येथे घरफोडी
बेलापूर : घराचा दरवाजा उघडा ठेवून निष्काळजीपणे झोपा काढणाऱ्याच्या घरात शिरून चोरटय़ांनी आतील ३६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी फिर्यादी राजा अन्सारी यांनी नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. सोमवारी दुपारी १ ते ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

सीबीडीत पावणे दोन लाखांची चोरी
बेलापूर : बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी आतील रोख रक्कम व दागिने असा एक लाख ७१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी चोरून नेल्याची घटना सीबीडी सेक्टर तीन येथे नुकतीच घडली. या प्रकरणी फिर्यादी अजिंदरसिंग गुमान यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कैद्याने केला हवालदारावर हल्ला
पनवेल : अलिबाग कारागृहातून तळोजा मध्यवर्ती कारागृहात हस्तांतरित करण्यासाठी आणलेल्या नऊ आरोपींपैकी धनंजय हरिप्रकाश दुबे (२७) या कैद्याने गुरुवारी महादेव धर्मा पाटील या हवालदारावर हल्ला केला. तळोजा कारागृहाबाहेर ही घटना घडली. कारागृहात भरती करण्यास विलंब होत असल्याचा कांगावा करून दुबेने पाटील यांच्या गालावर जोरात ठोसा मारला. या हल्ल्यात पाटील यांच्या गालाला तीन टाके पडले. खारघर पोलीस ठाण्यात दुबेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन घरत पुढील तपास करीत आहेत. दुबेला चोरीच्या तीन प्रकारांमध्ये यापूर्वी अटक करण्यात आली आहे.

उरणमध्ये शोभायात्रा
उरण/वार्ताहर : हिंदू नववर्षांच्या स्वागतासाठी येथील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या नेतृत्वाखाली उरण शहरातून शोभायात्रा काढण्यात आली होती. शुक्रवारी काढण्यात आलेल्या शोभायात्रेप्रसंगी उरणचे नगराध्यक्ष परमानंद करंगुटकर, राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस प्रशांत पाटील, नगरसेवक चिंतामण घरत, शाळेचे विद्यार्थी व विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यामध्ये महिलाही बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या. पेन्शनर पार्क येथून सुरू झालेली शोभायात्रा शहरभर फिरविण्यात आली. त्यानंतर उनपच्या प्राथमिक शाळेच्या प्रांगणात शोभायात्रेची सांगता करण्यात आली.