Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९

महामार्ग चौपदरीकरण : प्रतीक्षा पूर्णत्वाची
प्रतिनिधी / नाशिक

राजकीय मैदानात भल्याभल्यांना कात्रजचा घाट दाखविणाऱ्या शरद पवार यांना जेव्हा कसारा घाटातील खिंडीत अडकून पडावे लागले, तेव्हा अकस्मात घडलेली ही घटना उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला नवे परिमाण देणारी ठरेल यावर बहुदा कुणाचा विश्वास बसला नसता. तथापि, ही बाब पुढील काळात खरी ठरल्याचे दिसून आले. या घटनेनंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी केवळ कसारा घाटातीलच नव्हे तर थेट मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील धुळे ते वडपे या टप्प्यातील रस्त्याचे चौपदीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला. केंद्रीय वाहतूक प्राधिकरणाच्या अखत्यारीतील या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मंजूर करवून आणले. एवढेच नव्हे तर एकूण कामापैकी तातडीने हाती घेण्यात आलेले दोन टप्प्याचे काम आज जवळपास पूर्णत्वाच्या दिशेने आहे. आता प्रश्न राहिला आहे तो, केवळ गोंदे ते पिंपळगाव या नाशिकमधून जाणाऱ्या महत्वपूर्ण तिसऱ्या टप्प्याचा.

ऐका दाजीबा..
कोणत्याही निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्यावर एकाला उमेदवारी मिळाल्यास इतर नाराज होणे साहजिक. ही खरे तर त्यांच्या पक्षनिष्ठेची परीक्षाच असते. परंतु अनेक जण या परीक्षेत अनुत्तीर्ण होत असल्याचे दिसते. अलीकडील काळात तर या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. दुर्देवाने हे प्रमाण का वाढत आहे, याचा विचार करण्याची राजकीय परिपक्वता कोणत्याही पक्षाकडून दाखविण्यात येत नसल्याने अंदाधुंदीला प्रोत्साहनच मिळत आहे. अशा प्रकारची उदाहरणे लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ठिकठिकाणी दिसत असून उत्तर महाराष्ट्रही त्यास अपवाद नाही.

नाशिकमध्ये ३ एप्रिलपासून ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय.!’
प्रतिनिधी, नाशिक

नाशिकने महेश मांजरेकर यांच्याशी संबंधित चित्रपटांना कायम चांगला प्रतिसाद दिला आहे. ‘आई’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाला, त्यानंतर अनेक हिंदी चित्रपटांसह ‘दे धक्का’ या चित्रपटांनी चांगलाच गल्ला जमवला. आता ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय.!’ या चित्रपटाकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे. शून्यातून जग निर्माण करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द व हिंमतीच्या आधारावर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज त्यांनी स्थापन केलेल्या या हिंदवी राज्यात मराठीचा, मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिकमध्ये मंजिरी कर्वे व मुग्धा भट यांची गायन मैफल
प्रतिनिधी, नाशिक

रागाची बढत लयकारी, तान, स्वरांना अचुक प्रकट करण्यासाठी नेमकेपणाने मांडणी करतांना स्वरांना लाभलेला देखणा डौल नाशिककरांना पुणे येथील मंजिरी कर्वे-आलेगांवकर व मुग्धा भट यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाच्या मैफलीमुळे अनुभवता येणार आहे. येथील विदर्भ सोशल फोरमतर्फे गंगापूररोड येथील कुसुमाग्रज स्मारकमध्ये शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता मंजिरी कर्वे यांची तर रविवारी कुसुमाग्रज स्मारकमध्ये सायंकाळी साडेसहा वाजता सप्तक संस्थेतर्फे मुग्धा भट-सामंत यांची मैफल होणार आहे.

चिन्हाविना मनसेच्या प्रचारात समस्या
नाशिक / प्रतिनिधी

युती, आघाडी व बसप उमेदवारांनी नाशिक लोकसभा मतदार संघात धडाक्यात प्रचार सुरू केला असताना मनसेपुढे मात्र निवडणूक चिन्ह अद्याप निश्चित न झाल्याने प्रचारात समस्या निर्माण झाली आहे. पक्षाला निवडणूक चिन्ह मिळाल्यावर ते मतदारांमध्ये रूजविण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांना युध्दपातळीवर परिश्रम घ्यावे लागणार असून इतर पक्षांपुढे मात्र ही समस्या नसल्याने उमेदवाराचा परिचय करून देण्याचे कामच त्यांना करावे लागत आहे.

दिंडोरी व नाशिक खो खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत
जिल्हास्तरीय अध्यापक क्रीडा स्पर्धा
नाशिक / प्रतिनिधी

दिंडोरी व नाशिकच्या आर. एम. मोगल विद्यालयाने येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये आयोजित जिल्हास्तरीय अध्यापक विद्यालयीन खो खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले असून दोन व तीन एप्रिल रोजी ही या फेरीचे सामने होणार आहेत. पुरूष गटात पहिल्या उपान्त्य सामन्यात मोगल विद्यालयाने अभोण्याच्या जानकाई विद्यालयाचा १५-२ असा दणदणीत पराभव केला. विजयी संघाकडून दीपक लभडे, हिरामण गाडर, जनार्दन वाघेरे, रघुनाथ गांगुर्डे, विष्णु जाधव यांनी उत्कृष्ट खेळ केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात दिंडोरीने नाशिकच्या बी. एड्. संलग्न विद्यालयाचा ७-६ असा अवघ्या एका गुणाने पराभव केला. महिलांमध्ये नाशिकच्या शासकीय विद्यालयाचा दिंडोरीने तर दुसऱ्या सामन्यात बी. एड्. संलग्न अध्यापक विद्यालयाने मोगल विद्यालयाचा एक डाव दोन गुणांनी पराभव केला. व्हॉलीबॉलमध्ये पुरूष गटात दिंडोरीने अभोण्याच्या जानकाई विद्यालयाचा १९-१७, १५-१३ असा तर दुसऱ्या सामन्यात नाशिकच्या इंदिरा गांधी अध्यापक विद्यालयाने वसाकाच्या डॉ. डी. एस. आहेर विद्यालयाचा १५-२, १५-११ असा पराभव केला. महिलांमध्ये सिन्नरने नाशिकच्या एस. एम. जोशी विद्यालयाचा १५-४, १५-११ असा पराभव केला. विजयी संघाकडून लता भाबड, योगिता सांगळे, दया आव्हाड, जयश्री घुगे, भाग्यश्री आव्हाड, दुर्गा ख्रिस्ते यांनी चांगला खेळ केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सातपूरच्या समर्थ विद्यालयाने इंदिरा गांधी विद्यालयावर १५-८, १५-७ अशी मात केली. विजयी संघाकडून शितल पवार, नीता पवार, साधना पवार, स्वीटी अहिरे, आशा हुलागडे, सविता जाधव यांनी बहारदार खेळ केला. अंतिम सामन्यात सिन्नरने सातपूरचा १५-९, १५-१२ असा पराभव केला. पुरूष गटात नाशिकच्या इंदिरा गांधी विद्यालयाने विजेतेपद मिळविले.

‘शिवलिंग’ विषयावर डॉ. वर्तक यांचे व्याख्यान
नाशिक / प्रतिनिधी

शिवलिंग म्हणजे शंकराची पिंडी सर्वानाच माहिती आहे. शिवलिंग हे दिव्य विज्ञानाचे प्रतीक आहे. लिंगाबद्दल पूर्वी जे वेदांत लिहीले आहे, ते आज विज्ञानाने मान्य केले आहे, असे प्रतिपादन डॉ. प. वि. वर्तक यांनी येथील पंचवटी सार्वजनिक वाचनालयाच्या ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ‘शिवलिंग-एक विज्ञान प्रतीक’ या विषयावर पुष्प गुंफताना केले. आजच्या काळातील विज्ञानापेक्षा महाभारत काळातील विज्ञान अधिक प्रगत होते, हे सर्वानी मान्य केले पाहिजे. महाभारतातील वर्णन आधुनिक शास्त्रज्ञांनी केलेल्या वर्णनाशी मिळतेजुळते आहे. पुराणातील कथांचा शोध घेऊन नवनवीन शोध लागू शकतात, असे सांगत इतर देशाप्रमाणे आपल्या देशाची प्रगती होत नसल्याची खंत डॉ. वर्तक यांनी दुसरे पुष्प ‘ब्रह्मास्त्र म्हणजे अ‍ॅटम बॉम्बच’ या विषयावर गुंफताना व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार अ‍ॅड. उत्तमराव ढिकले होते. व्यासपीठावर के. के. मुखेडकर, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. शांताराम रायते, प्रमुख कार्यवाह नथुजी देवरे उपस्थित होते. परिचय पांडूरंग माळी यांनी करून दिला. आभार प्रा. डॉ. शांताराम रायते यांनी मानले.

सातपूर औद्योगिक वसाहतीत आज वीज पुरवठा
प्रतिनिधी / नाशिक

सातपूर औद्योगिक वसाहतीतील फिडर क्रमांक १ ते ५ मध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठय़ाअभावी लघुद्योग व कारखानदारांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून शनिवारी वीजपुरवठा सुरू ठेवण्याची नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने केलेली मागणी वीज वितरण कंपनीने मान्य केली आहे. त्यानुसार शनिवारी सकाळी साडे नऊ ते सायंकाळी साडे सहा या कालावधीत वीज पुरवठा सुरू राहणार आहे. या पाश्र्वभूमीवर, निमाने सातपूर औद्योगिक वसाहतीत ज्या ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता, तिथे शनिवारचे साप्ताहिक वीज भारनियमन थांबवून वीज पुरवठा करण्याची मागणी केली होती. वीज वितरण कंपनीने शनिवारी वीज पुरवठा सुरू राहणार असल्याचे परिपत्रक काढले आहे. सातपूर औद्योगिक क्षेत्रातील फिडर क्रमांक १ ते ५ मधील उद्योजक व सभासदांनी याची नोंद घ्यावी.