Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९

बिकट वाट वहिवाट बने ती..
अभिजीत कुलकर्णी

नाशिक पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेची आपली दुसरी टर्म संपायला अद्याप वर्ष-दीड वर्षांचा अवधी असतानाच प्रतापदादा सोनवणे धुळे लोकसभा मतदारसंघातून खासदारकीच्या शर्यतीत उतरल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या बागलाण आणि मालेगाव बाह्य़ या दोन विधानसभा मतदारसंघावर भिस्त ठेऊन ते निवडणुकीला सामोरे जात असल्याचे वरवर पाहता दिसत असले तरी वास्तवातली स्थिती त्याहून काहिशी भिन्न आहे. शिवाय, तेथे त्यांचे विरोधक म्हणजे काँग्रेसी मंडळींमधील आपसातील पराकोटीची द्वेषभावना व अल्पसंख्याकांच्या मतांचे होऊ घातलेले विभाजन या बाबी विचारात घेता सुरूवातीला त्यांच्यादृष्टीने असलेली दिल्लीची बिकट वाट आता जणू वहिवाटीत रुपांतरीत होत असल्यासारखी स्थिती आहे.

‘विकासाचे निकष बदलावेत’
मालेगाव लोकसभा मतदार संघ सर्वसाधारण असताना या. ना. जाधव (१९५४) व अण्णासाहेब कवडे (१९५९) तेथून विजयी झाले. मात्र त्यानंतर हा मतदारसंघ राखीव झाल्यावर झेड. एम. कंहाडोळे, सीताराम भोये, हरिभाऊ महाले, कचरूभाऊ राऊत, हरिचंद्र चव्हाण यांच्या रुपाने वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांना प्रतिनिधित्वाची संधी मिळाली. पण एवढे करून देखील स्थानिकांच्या विकासाच्या अपेक्षा फोल ठरल्या. मालेगांव शहराचा भाग लोकसभा मतदार संघात तुलनेने मोठा असल्यामुळे त्याचा त्या प्रमाणात विकास होणे अपेक्षित होते.

‘डिमाण्ड’ शो!
भाऊसाहेब : काय भावडय़ा, आटपली म्हनायची का कालच्या बैटकांची गडबड..
भावडय़ा : हां, फार धावपळ झाली.
भाऊराव : अन् काय म्हणतीये तुमची ‘डिमांड’?
भावडय़ा : ‘तुमची डिमांड’वर एवढा जोर देण्याचं कारण नाही, डॅड. तुम्ही कितीही टोमणे मारा पण..
भाऊसाहेब : ..झाली का सुरू तुमची झिगझिग.

जळगावात मोरे यांच्या टीकास्त्रामुळे भाजपमध्ये खळबळ
जळगाव / वार्ताहर

‘आयात केलेल्या व्यक्तीबद्दल मतदारांमध्ये किती नाराजी असते हे निवडणुकीनंतर समोर येईलच’ असा पत्रकार परिषदेत आत्मविश्वास व्यक्त करणारे राष्ट्रवादीचे उमेदवार खा. वसंत मोरे यांच्या या विधानाने भाजप-सेना युतीसमोर किती अवघड वाट आहे, हे स्पष्ट केले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी खासदारकीचे २२ महिने पूर्ण करणाऱ्या मोरे यांनी आपण पुन्हा विजयी होणारच असा दावा केला आहे.

नंदुरबारमध्ये काँग्रेसच्या प्रचाराचे अनोखे तंत्र
नंदुरबार / वार्ताहर

गण व गटनिहाय बैठकांवर देण्यात आलेला भर, मान्यवर व्यक्तींच्या गाठीभेटी, शहरांमध्ये चौकसभा, अशा प्रकारे नंदुरबार लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार सुहास नटावदकर यांचा प्रचार सुरू असून याउलट काँग्रेसचे उमेदवार माणिकराव गावित यांच्या प्रचारात भव्यदिव्यपणाचा अधिक प्रभाव जाणवत आहे. काँग्रेसच्या प्रचारापासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी दूर असल्याने प्रचारात कोणतीही गफलत राहू नये याची दक्षता काँग्रेसकडून घेतली जात असून प्रचारापासून जाणीवपूर्वक दूर राहणाऱ्यांचीही नोंद घेण्यात येत आहे.

नागडे व बाळापूर ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना हादरा
येवला / वार्ताहर

तालुक्यातील दोन बहुचर्चित ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून प्रस्थापितांना हादरा देत ग्रामस्थांनी नवतरुणांना सत्तेची संधी दिली आहे. नागडे ग्रामपंचायतीत नवतरुणांचा ग्रामविकास पॅनेल सत्तारूढ झाला. भाजपचे तालुकाध्यक्ष एकनाथ सातळकर व माजी सरपंच पंढरीनाथ सातळकर यांच्या पॅनेलचा पराभव झाला. दरम्यान, बाळापूर-कासारखेडा ग्रुप ग्रामपंचायतीत तब्बल २५ वर्षांनंतर सत्तापालट झाला आहे. नागडे ग्रामपंचायतीतील विजयी उमेदवारांमध्ये विजय धिवर, दत्तात्रय काळे, अनिता खोजे, उत्तम मोरे, श्रावण साताळकर, सुनंदा गडाख, आवणकर योगेश, अरूण साताळकर, ज्योती काळे यांचा समावेश आहे. बाळापूर कसारखेडा ग्रुप ग्रामपंचायतीत राजेंद्र गायकवाड, सुरेश कोळगे, भिमाबाई गायकवाड, अरूण शिरसाठ, इंदूबाई खुरासणे, अंबादास भवर, कारभारी शिरसाठ हे विजयी झाले.

..तर त्यांना विधानसभेसाठी लोकसंग्रामचा पाठिंबा- अनिल गोटे
धुळे / वार्ताहर

लोकसंग्राम पक्षातर्फे आपण धुळे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असून जो राजकीय पक्ष आपणास निवडून आणण्यासाठी मदत करेल त्या पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत आपला पाठिंबा राहील, असे माजी आमदार अनिल गोटे यांनी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग, पिण्याचे पाणी, रोजगार, रस्ते आणि मतदार संघाचा सर्वागीण विकास हा पंचसूत्री जाहीरनामा गोटे यांनी पत्रकारांना वाचून दाखविला. यावेळी तेजस गोटे, दिलीप साळुंखे, कैलास हजारे यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी गोटे यांनी मतदार संघात आपण एक तर पदाधिकाऱ्यांनी दोन प्रचार फेऱ्या पूर्ण केल्याचे सांगितले.