Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
विशेष

भारतीय राजकारणाची उन्मादावस्था
‘‘दुर्दैवाचे दशावतार पाहण्यांची या सुधाकरात आता बिलकुल ताकद नाही.’’ दारूच्या पूर्ण आहारी गेल्यामुळे उन्मादावस्थेत गेलेल्या पश्चात्तापदग्ध सुधाकराच्या तोंडी हे वाक्य प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी यांनी आपल्या ‘एकच प्याला’ या नाटकात टाकलेले आहे. आपण सर्वानी वाचले आहे. आपल्या दारूच्या अतिरेकी व्यसनापायी सिंधूची दारुण दैनावस्था झाली याची जाणीव झाल्यावर सुधाकराने दारू सोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण तोपर्यंत सद्गुणी, विद्वान माणूस म्हणून समाजातील त्याची विश्वासार्हता पार कोसळली होती. त्यामुळेच त्याला उन्मादावस्था आली आणि त्याच्या कुटुंबाला सर्वनाशाकडे जावे लागले. भारतीय राजकारणाची आजची अवस्था समाजाला आणि राष्ट्राला सर्वनाशाकडेच घेऊन जाणारी आहे. सत्तेचा उन्माद शिखरावर पोहोचलाय. जबाबदारीच्या पदावरून जनतेच्या रेटय़ामुळेच पायउतार झालेल्या तथाकथित नेत्यांच्या बेजबाबदार बरळण्यामुळे आणि वागण्यामुळे आतंकवादाला प्रोत्साहन आणि बळ मिळू शकते याची साधी जाणीवही यांना राहिलेली नाही.

मुंबईतील ‘मराठी ताकद’ या वेळी काय करणार?
बहुरंगी, बहुढंगी मुंबईवर अद्यापही मराठी माणसाची पकड आहे की नाही, याबाबतचा खुलासा आगामी लोकसभा निवडणूक करणार आहे. पण त्याहीपेक्षा मराठी आणि अन्य भाषकांच्या मनातील एका औत्सुक्यपूर्ण प्रश्नाचे उत्तरही या निवडणुकीच्या मतपेटय़ांद्वारे दिले जाणार आहे. हा प्रश्न आहे तो शिवसेना आणि मनसे यांतील कोणता पक्ष मराठी माणसांची म्हणून अधिक मते मिळवणार ? परप्रांतीयांचे विशेषत: उत्तर भारतीयांचे लोंढे मुंबईत सातत्याने स्थिरावत असल्याने मराठी मुंबईकरच नव्हे तर आता सर्वसाधारणपणे साऱ्यांचाच असा समज झाला आहे की, मुंबईतील मराठी मतदारांचा टक्का हा कमी झाला आहे आणि उत्तर भारतीयांचा टक्का हा तुलनेने लक्षणीय आहे. मात्र अद्यापही मुंबईच्या सहाही लोकसभा मतदारसंघात मराठी मतदार हा अंदाजे पस्तीस टक्के एवढा आहे आणि त्याने जर कुठल्या एका पक्षामागे आपली ताकद उभी केली तर ती उमेदवाराच्या विजयासाठी सहजच निर्णायक ठरू शकते. मराठी मतदारांच्या तुलनेत उत्तर भारतीयांची टक्केवारी अधिक असली तरी ती अन्य भाषिक मतदारांपेक्षा अधिक नाही.

मारी सीटनचा अभ्यास दौरा
केंद्र सरकारने आपले चित्रपट धोरण १९५१ मध्ये जाहीर केल्यानंतर अंमलबजावणीला लगेच सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव व चित्रपटांना राष्ट्रीय पारितोषिके सुरू करण्यात आली. १९७७ साली शिक्षण मंत्रालयाने एनसीआरटीमार्फत ‘ऑडियो व्हिज्युअल’ तंत्रज्ञानाचा शिक्षणासाठी उपयोग करायचे ठरविले. त्यासाठी लंडनच्या ब्रिटिश फिल्म इन्स्टिटय़ूटच्या मारी सीटन या महिला फिल्म स्कॉलरला निमंत्रण देण्यात आले.
मारी सीटन इंग्लंडमधल्या फिल्म सोसायटी चळवळीशी संबंधित होती. लंडनच्या ब्रिटिश फिल्म इन्स्टिटय़ूटच्या संस्थापकांपैकी एक होती. रशियात जाऊन ती इझेनस्टाइनला भेटून आली होती. इंग्लंड, अमेरिकेत ती चित्रपट रसास्वादावर व्याख्याने द्यायची. पुस्तके लिहायची, शैक्षणिक अभ्यासक्रमात ‘ऑडियो व्हिज्युअल’ म्हणजे ध्वनी आणि प्रतिमा यांचा उपयोग करून अभ्यासक्रम तयार करण्यासाठी सल्लागार म्हणून तिला बोलाविण्यात आले होते. ते वर्ष होते १९७७! मारी सीटन येथे आल्यावर तिने प्रथम येथील चित्रपट संस्कृती वातावरणाचा आढावा घेतला. तेव्हा तिच्या लक्षात आले येथे फिल्म सोसायटी चळवळ फारशी अस्तित्वात नाही. हॉलीवूड व्यतिरिक्त अन्य देशातील चित्रपट येथे येतच नाहीत.
तिने अभ्यासक्रमाबाबत सल्ला दिलाच; पण पथेर पांचाली पाहून ती प्रभावित झाली कोलकात्याला जाऊन सत्यजित राय यांची तिने भेट घेतली. पुढे तिने सत्यजित यांचे इंग्रजीत चरित्रही लिहिले.
हॉलीवूड व्यतिरिक्त चित्रपट येथे आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘सेंट्रल फिल्म लायब्ररी’ दिल्ली येथे १९५४ ला स्थापन केली होती. त्यातून फिल्म सोसायटींना चित्रपट मिळायचे. मारी सीटनने तेथील चित्रपट यादी पाहिली तर ‘नानुक ऑफ दि नॉर्थ’ इ. फक्त डॉक्युमेण्टरीज होत्या. तिने सल्ला दिला जगातले अभिजात चित्रपटही फिल्म लायब्ररीत असायला हवेत. त्यानंतर बॅटलशिप पोटेम्कीन वगैरे चित्रपट विकत घेण्यात आले. एकूणच भारतात चित्रपट संस्कृतीचे वातावरण अत्यंत बाल्यावस्थेत होते. देशात अवघ्या ५/६ फिल्म सोसायटय़ा; त्याही २५/३० सदस्य असलेल्या होत्या. ‘ऑडियो व्हिज्युअल’चा उपयोग शिक्षणात करायचा तर चित्रपट संस्कृतीची ओळख समाजाला असली पाहिजे व त्यासाठी फिल्म सोसायटी चळवळीचा प्रसार झाला पाहिजे हे मारी सीटनने शिक्षण मंत्रालयाला पटवून दिल्यानंतर फिल्म सोसायटी प्रसारासाठी मारी सीटनची व्याख्याने दिल्ली, मुंबई, कोलकाता येथे आयोजित करण्यात आली. मुंबईत तेव्हा फक्त अमॅच्युअर फिल्म सोसायटी कार्यरत होती. कुलाब्याच्या बेस्ट हाऊसमधील छोटय़ा चित्रगृहात सोसायटीचे खेळ व्हायचे; पण अमॅच्युअर प्राय: डॉक्युमेण्टरीज दाखवायची. अंबालाल पटेल, डेव्हीड जाफरी, कोडॅकचा जनरल मॅनेजर असे मुंबईतील नामांकित लोक अमॅच्युअरशी संबंधित होते. त्यामुळे अमॅच्युअरने मारी सीटनचे व्याख्यान मुंबईत आयोजित केले. मारी सीटनच्या व्याख्यानांमुळे फिल्म सोसायटीची संकल्पना खूपशी या देशात प्रस्थापित झाली. उच्च विद्याविभूषितांचे लक्ष फिल्म सोसायटीकडे वेधले गेले.
मारी सीटननेनंतर १९६५ साली युनेस्कोच्या सहाय्याने देशातला पहिला फिल्म अ‍ॅप्रीसिएशन कोर्स पुण्यात फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये आयोजित करून चित्रपट रसास्वादाचा पाया घातला. फिल्म अर्काइव्हचा अप्रीसिएशन कोर्स नंतर १९७५ ला सुरू झाला. चित्रपट संस्कृतीचे वातावरण भारतात उभे करण्यासाठी मारी सीटनने हे जे प्रयत्न केले. त्यासाठी भारत सरकारने तिला ‘पद्मभूषण’ पुरस्कारही दिला. ‘पथेर पांचाली’चे प्रकाशन, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन, फेडरेशनची स्थापना आणि मारी सीटनची व्याख्याने यातून ५० च्या दशकात फिल्म सोसायटी चळवळीची या देशात पायाभरणी झाली. याच दशकात हिंदी सिनेमाही बदलू लागला.
सुधीर नांदगावंकर, फेडरेशन केंद्रीय सचिन
cinesudhir@gmail.com