Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
राज्य

सप्रेम परिवारातर्फे पाडव्यापासून मराठी आत्मविश्वास जागृती अभियान
नाशिक , २७ मार्च / प्रतिनिधी

अलीकडील काळात मराठी अस्मिता वेगवेगळ्या मार्गाने प्रकट होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर, यंदाच्या मराठी नववर्षांरंभापासून म्हणजेच पाडव्यापासून मराठी अस्मिता व आत्मविश्वास जागृती अभियान सुरू करण्यात येत असल्याची माहिती सप्रेम परिवाराचे प्रवर्तक सतीश बोरा यांनी दिली. २०१२ हे कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे जन्मशताब्दी वर्ष मराठी वर्ष म्हणून साजरा करण्याचा संकल्पही सप्रेम परिवाराच्यावतीने सोडण्यात आला असून त्यानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे.

नाशिक जिल्हाधिकाऱ्यांविरोधात अधिकाऱ्यांचीच तक्रार
नाशिक, २७ मार्च / प्रतिनिधी

राज्यात नेमक्या कोणत्या प्रकारची नागरी सेवा शिकविली जाते असा प्रश्न अधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थित करून नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याचाच अवमान केल्याची टीका करीत जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीविरोधात येथील महसूल अधिकाऱ्यांनी थेट मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नाशिकमध्ये स्वागतयात्रांनी नववर्षांचे स्वागत
नाशिक, २७ मार्च / प्रतिनिधी

संगीत मैफलींनी सूरमयी बनलेली पहाट, स्वागत यात्रेच्या निमित्ताने निर्माण झालेला जल्लोष, प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मराठी नववर्ष दिन अर्थात गुढीपाडवा मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. मंदीच्या छायेखाली सापडलेल्या बाजारपेठांमध्ये पाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केल्यामुळे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.

पालघरच्या उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये पेच
शिंगडा यांच्याबद्दल नाराजी
पालघर, २७ मार्च/वार्ताहर
अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळविण्यासाठी विद्यमान खासदार दामू शिंगडा बरोबरीने राजेंद्र गावितही रिंगणात उतरल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठींपुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, दोघेही उमेदवारी मिळविण्यासाठी दिल्लीत तळ ठोकून आहेत, इतकेच नव्हे तर महत्त्वाच्या पालघर नगर परिषद निवडणुकीकडे खासदार दामू शिंगडा यांनी पूर्णत: पाठ फिरविल्याचे चित्र निवडणुकीदरम्यान पाहावयास मिळाले.

हत्ती पकडण्याची मोहीम अयशस्वी!
अभिमन्यू लोंढे
सावंतवाडी, २७ मार्च

‘हत्ती कॅच मोहीम’ हे लोकांना भुलविणारे नाटक होते, असे जनतेत बोलले जात आहे. या मोहिमेंतर्गत ३० लाख रुपयांचा चुराडा करूनही पुन्हा हत्तींचे आगमन झाले आहे. तसेच मोहिमेंतर्गत पकडलेल्या दोन हत्तींना मरणही पत्करावे लागले. लोकांचे सुमारे १० कोटींचे नुकसान होऊनही शासनाच्या ठोस कृतीच्या अभावामुळे बागायतदार शेतकरी नाराज आहेत. सिंधुदुर्गात फलोद्यान अंतर्गत फळबागायती फुलल्या. या बागांचे उत्पन्न आता मिळू लागले असताना हत्तींच्या हैदोसामुळे नारळ, सुपारी व केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

महाड पालिका वृक्ष लागवड योजनेंमध्ये लाखोंचा गैरव्यवहार
महाड, २७ मार्च/वार्ताहर

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महाड नगरपालिकेने मागील वर्षी सुरू केलेली वृक्ष लागवड योजनेवर आतापर्यंत लाखो रुपये खर्च केले. या योजनेंतर्गत पालिकेच्या आणि खासगी मालकीच्या जागांमध्ये एक हजार झाडांची लागवड करण्यात आली. आज प्रत्यक्षात निम्मी झाडेदेखील अस्तित्वात नसून जी झाडे अस्तित्त्वात आहेत, तीदेखील कालांतराने नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने या योजनेमध्ये लाखो रुपयांचा अपहार करण्यात आला असल्याची चर्चा शहरामध्ये करण्यात येत असल्याने योजनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाडकर नागरिकांकडून करण्यात येत आहे.

प्रकाश अकोलकर यांना जांभेकर पुरस्कार
नाशिक, २७ मार्च / प्रतिनिधी

येथील सार्वजनिक वाचनालयाच्या बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर पुरस्कारासाठी महाराष्ट्र टाइम्सचे सहसंपादक प्रकाश अकोलकर यांची निवड झाली आहे. सात हजार रूपये, शाल, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर झेंडे व कार्याध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी ही घोषणा केली. वाचनालयाचे माजी कार्याध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य भगवान कृष्ण तथा नानासाहेब पानसे यांच्या स्मृत्यर्थ दिलेल्या देणगीतून मराठीतील आद्य पत्रकार व दर्पणकार जांभेकर यांच्या नावाने हा पुरस्कार दरवर्षी दिला जाणार आहे. १२ एप्रिल रोजी सायंकाळी साडे सहाला परशुराम साईखेडकर नाटय़गृहात ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक विजय कुवळेकर यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. अकोलकर गेली तीन दशके पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून जय महाराष्ट्र तसेच भ्रष्टांगण (अनुवाद), डॉक्टरांच्या कथा आणि व्यथा तसेच गंगा आदी त्यांची पुस्तके गाजलेली आहेत.

खंडणीसाठी बालकाचे अपहरण
नाशिक, २७ मार्च / प्रतिनिधी

खंडणीसाठी एका व्यावसायिकाच्या पुतण्याचे दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला असून या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे. वाडिवऱ्हे शिवारात गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी ही घटना घडली. या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश सपकाळे असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. वाडिवऱ्हे शिवारातील बजरंगनगरमधील घरासमोर तो खेळत असताना अपहरणकर्त्यांनी त्याला आमिष दाखवून पळवून नेले. रात्री उशिरापर्यंत आकाशचा शोध कुटुंबियांना लागला नाही. शुक्रवारी सकाळी आकाशचे काका सोपान सपकाळे यांच्या भ्रमणध्वनिवर तुमचा पुतण्या आमच्या ताब्यात असल्याचे सांगून २० लाख रूपयांची खंडणी देण्याची मागणी करण्यात आली. या प्रकारामुळे भयभीत झालेले आकाशचे वडील शंकर सपकाळे यांनी पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सपकाळे कुटुंबियांचा खडी क्रशरचा व्यवसाय आहे. वडील व काका अशी घरची मंडळी आपापल्या कामानिमित्त घराबाहेर गेली असताना अपहरणाचा हा प्रकार घडला.

हापूस ३०० रुपये डझन
संगमेश्वर, २७ मार्च/वार्ताहर

अवेळी पडलेला पाऊस, ढगाळ वातावरण अशा हवामानाच्या दुष्टचक्राला तोंड देऊन बाजारपेठेत दाखल झालेल्या हापूस आंब्याचा डझनाचा दर ३०० रुपये असून, मुंबई बाजारपेठेतही अद्याप हापूसचा चढा दर टिकून असल्याचे बागायतदारांनी स्पष्ट केले. यावर्षी हापूस आंबा कमीच असून, थंडीचा हंगाम केवळ आठवडाभराचा राहिल्याने खाडी व समुद्रकिनाऱ्याव्यतिरिक्त अन्य भागांतील हापूसला अपेक्षित मोहोर आला नाही. तद्नंतर अवेळी पडलेला पाऊस, ढगाळ हवामान यामुळे काही भागांतील मोहोर काळा पडला व त्याचा परिणाम थेट उत्पादनावर झाला आहे. उत्तम प्रतीच्या चार डझनच्या पेटीला मुंबई बाजारपेठेत १२०० रुपये दर मिळत असल्याचे आंबा बागायतदार व विक्रेते भास्कर भागवत यांनी सांगितले. या दराच्या तुलनेनुसार हापूसच्या शेकडय़ाचा दर २५०० रुपये होत आहे. संगमेश्वर येथे नुकताच दाखल झालेला उत्तम प्रतीचा हापूस ३०० रुपये डझन एवढा दर मिळवून गेला आहे. मात्र अद्याप हापूसची आवक तुरळक असून, संगमेश्वर तालुक्यातील हापूस फळाचा आकार लहान असल्याचे दिसून येते. मार्च महिना संपत आला तरी हापूसची मोठय़ा प्रमाणावर आवक होत नसल्याने, प्रत्यक्ष रसिक हापूसच्या चवीला अद्यापही पारखेच आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी चौघांनाच प्रवेश
रत्नागिरी, २७ मार्च/खास प्रतिनिधी

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारासह फक्त चार जणांना प्रवेश देण्यात येणार आहे. अर्ज भरतेवेळी उडणाऱ्या गोंधळ-गडबडीला पायबंद घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मधुकर गायकवाड यांनी या मतदासंघातील निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला. ते म्हणाले की, येत्या २३ एप्रिल रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी २८ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दरवेळी याप्रसंगी विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमते. त्यामुळे कामकाजामध्ये अडथळा येतो. तो टाळण्यासाठी अर्ज भरण्याच्या वेळी संबंधित उमेदवारासह फक्त चौघांनाच प्रवेश दिला जाणार आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी ६ एप्रिल रोजी होणार असून, उमेदवारी मागे घेण्याची मुदत ८ एप्रिलपर्यंत आहे. निवडणुकीची मतमोजणी अन्य ठिकाणांप्रमाणेच १६ मे रोजी रत्नागिरीमध्ये होणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदासंघातील मतदारांची एकूण संख्या १२ लाख ४६ हजार ७०१ असून, संपूर्ण मतदारसंघात एकूण एक हजार ५६२ मतदान केंद्रे राहणार आहेत. सुमारे आठ हजार कर्मचारी या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडणार आहेत.